एप्रिल महिना सुरु झाला कि निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे आकाशातील वीज. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिला आपण थांबवू शकत नाही, किंबहुना ती न घडल्यास त्रास पण होऊ शकतो. विजा का चमकतात… चमकण्याचे काय फायदे याविषयी जाणून घेऊया या लेखातून.
वीज पडू नये असे आपल्याला म्हणताच येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती प्रक्रिया समजून घेणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून होणारे नुकसान ठरवतात. अज्ञानामुळे आपत्तीविषयी भीती निर्माण होते आणि भीतीमुळे जास्त नुकसान घडते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात आपत्तीविषयी ज्ञानाला फार महत्व आहे. आकाशातील वीज ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. तिचा अभ्यास करणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे.
आकाशातील वीज ही आपल्या घरातील विद्युत प्रवाहासारखी आहे, त्याची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. ( उदा. 100 मिलियन ते एक बिलियन) बरेचदा आपण एखाद्या प्लास्टिक खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला शॉक लागतो. कारण घर्षणामुळे विद्युत भार तयार होतो आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा अर्थिंगमुळे तो भार जमिनीत जातो. असेच काही आकाशात घडते. हवा जेव्हा गरम तापलेल्या जमिनीवरून जाते तेव्हा ती गरम होते आणि हलकी झाल्यामुळे वर जाते. ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात, आणखी थंड झाल्यावर त्याचे हिमकण तयार होतात. थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू लागते. वरती जाणारा वारा आणि खाली येणारा वारा यामुळे पाण्याचे थेंब आणि हिमकण यात घर्षण होते. घर्षणामुळे विद्युत भार तयार होतात. ऋण भार हिमकणासोबत खाली येतो आणि धन भार आभाळाच्या वरील भागात जमा होतात.
जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धन भार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते, पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनाझेशन होऊन ती विद्युत वाहक होते. दोन्ही भार एकमेकाकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्याठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटाच्या अंतरावर ठरते. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95 टक्के विजा आकाशातच असतात, फक्त 5 टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगामधील वीज सर्वात धोकादायक असते. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. येवढ्या मोठ्या तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो. वीज तीन प्रकारे आघात करू शकते. ती सरळ अंगावर पडू शकते अथवा ती बाजूच्या वस्तूवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर येवू शकतो किंवा ती लांब कुठे तरी पडल्यानंतर जमिनीखाली असलेल्या तारा, पाईपद्वारे तिचा धक्का बसू शकतो.
विजा पावसाळ्यापूर्वी जास्त पडतात म्हणजे एप्रिल ते जूनच्या काळात. तसेच विजा पडण्याचे प्रमाण दुपारनंतर जास्त असते. वीज पडून मरण्याचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा पुरुषामध्ये जास्त आहे. २००३ ते २०१३ मध्ये भारतात विजेमुळे मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये 71.48 टक्के पुरुष तर 28.51 टक्के स्त्रीया होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण अशाच प्रकारचे प्रमाण दिसून येते. भारतात मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त वय वर्ष 30-44 (34.5%) या वयोगटात आहे, त्यापाठोपाट 15-29 वर्षे (37.8%) आणि 45-59 (21.51 %) वयोगटात आहे. भारतात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण मध्यप्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सर्वात कमी प्रमाण चंडीगढ आणि लक्षद्वीपमध्ये आहे. मराठवाड्यात 2004 ते 2011 मध्ये वीज पडून मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये साधारणतः 40 टक्के लोक जालना आणि लातूर जिल्ह्यातील होते.
जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण फक्त 10 ते 30% आहे व उर्वरित वाचलेल्या लोकांवर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत, त्यामुळे वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात (27%) नंतर झाडाखाली (16%) व पाण्याजवळ (13% ) आहे. साधारणत: 56% वेळेस व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी (डोंगर) किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडल्या आहेत.
हे चूक आहे. वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. चुकीच्या समजामुळे पायाळू माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कड्यामुळे त्यांच्यावर वीज पडते. विजा चमकत असताना सोबत कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये.
चूक, वीज एकाच ठिकाणी अनेक वेळेस पडू शकते.
वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगात विद्युत भार (करंट) असतो व त्यास स्पर्श करणे धोकादायक असते.
विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्ही वादळाच्या आवाक्यात आहात, तुम्हाला विजेपासून धोका आहे, तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ही 80% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशावेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.
जनजागृती कार्यक्रमाद्वारे लोकांना आपत्तीविषयी वेळेवर माहिती देता येते. शैक्षणिक संस्था यात महत्वाची भूमिका निभावू शकतात. उदाहरणार्थ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र लातूर येथील विद्यार्थ्यांनी सन २०१२ मध्ये लातूर तालुक्यातील विजेपासून प्रभावित गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविला होता. त्यामुळे त्या भागात विजेपासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले.
लेखक - डॉ. प्रमोद ह. पाटील,
आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र लातूर.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/29/2020
आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी...
इतर कुठल्याही अवकाशीय गोष्टीने इतके गांभीर्य आणि र...
आकाश आणि अवकाश या मधील फरक.
रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त...