অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वन संरक्षणासाठी 'हॅलो फॉरेस्ट'

वनाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. प्रशासन लोकाभिमुख होऊन वन विभागाशी निगडीत असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे नागरिकांना तत्काळ मिळावित म्हणून वन विभागातील अधिकारी, कर्मचारी व जनता यांच्यामध्ये संवादावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणजे सामान्य नागरिकांना वनाबाबतची अचूक आणि शास्त्रशुद्ध >माहिती सतत मिळावी, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शासन सरसावले असून शासनाच्या महसूल व वन विभागाने यासाठी ५ जानेवारी २०१७ रोजी 'हॅलो फॉरेस्ट' या कॉल सेंटरची (हेल्प लाईन) स्थापना केली आहे. १९२६ हा टोल फ्री क्रमांक असणारे हे कॉल सेंटर बोरीवली (मुंबई) येथे सुरु करण्यात आले आहे. याविषयी जाणून घेऊया...

पर्यावरणीय जीवनचक्रातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्याप्रमाणेच मानव हा आधीपासूनच जंगलांवर अवलंबून होता. पूर्वी तो कंदमुळे खाऊन जगत होता तर आज कृषी घटकांवर. मानवी जीवन सुखकर करायचे असेल तर मानवाला बदलावे लागेल. वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण, मुलभूत सोयीसुविधा यासाठी वनांवर दिवसेंदिवस ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी, मानवाच्या अस्तित्वासाठी वन संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.

संत तुकाराम यांनी आपल्या अभंगात चारशे वर्षांपूर्वी समाजाला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा संदेश दिला असून यातूनच सर्वांचे हित आहे. सर्वांचे भवितव्य सुधारेल आणि जीवन सुलभही होईल. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असायला हवे. यामुळे आपल्या राज्यावर येणारी अनेक नैसर्गिक संकटे रोखता येतील आणि शाश्वत विकासही प्रत्यक्षात साधता येईल.

राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३ लाख ७ हजार ७१३ चौ.कि.मी. असून त्यापैकी ६१ हजार ६५२ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. भौगोलिक क्षेत्राशी पडताळा केल्यास एकूण क्षेत्रफळाच्या २०.०४ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे. राज्य शासनाच्या वन विभागाने राज्यात ३३ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष लागवड केली असून ते जगवण्यासाठी शासन कष्टही घेत आहे. या कार्याची दखल गिनीज बुकने घेतली आहे. यापुढे तीन वर्षात ५० कोटी वृक्ष वन विभागाकडून लावण्यात येणार आहेत. पर्यावरणाचा समतोल, वनांची वाढ आणि ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी शासनाच्या वन विभागाकडून उचललेले हे मोठे पाऊल आहे.

वन विभागाच्या बोरीवली येथील कॉल सेंटरवरून नागरिकांच्या वन विभागाशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे १९२६ या हेल्प लाईनद्वारे दिली जात आहेत. जनतेच्या तक्रारींचे निवारण व्हावे म्हणून या कॉल सेंटरमधील अधिकारी २४ तास काम करतात. एखाद्या व्यक्तीला अधिकची माहिती हवी असेल तर सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक/ वन्यजीव), मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक/ वन्यजीव) यांच्याकडून माहिती पुरवली जाते.

कॉल सेंटरची कार्य प्रणाली


सर्वसामान्यपणे १९२६ वर कॉल करताना आपल्याला भाषा निवडण्याचा मार्ग मोकळा असतो. त्यामुळे भाषेचा प्रश्न निर्माण होत नाही.
  1. मराठी भाषा निवडण्यासाठी-१
  2. हिंदी भाषा निवडण्यासाठी-२
  3. इंग्रजी भाषा निवडण्यासाठी-३
याप्रमाणे पर्याय निवडावे लागतात. पर्याय निवडल्यानंतर कॉलकर्त्याला हवी असणारी सर्व माहिती घेता येते.

१९२६ वरून काय घ्याल

'0' तत्काळ माहिती साठी


माहिती घेताना जर जंगलात वनवा, अवैध वृक्षतोड, जंगलात अतिक्रमण, वन्यजीव शिकार, जंगलात अवैध चराई, रहिवासी क्षेत्रात वन्यजीव आढळून आल्यास किंवा एखाद्या कारणासाठी गोपनीय माहिती देण्याची असेल तर आपण कॉल करू शकतो.

'१' हरित सेना / हरित महाराष्ट्र अभियान


शासनाच्या वन विभागाकडून राज्यातील ३३ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. हे कार्य करण्यासाठी वनीकरण, सामाजिक वनीकरण, CSR अंतर्गत, FDCM यांच्याकडून होणारे वृक्ष रोपणासाठी आपण नाव नोंदवू शकतो.

'२' निसर्ग पर्यटन


आपल्या राज्याला सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. असाच वारसा वनांच्या बाबतीत ही लाभलेला आहे. यामुळे वन सफारी / वन पर्यटनाकडे लोक वळत आहेत. महाराष्ट्रातील अशा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, अतिथिगृह, विश्रामगृह, आरक्षण याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला घेता येते.

'३' वनोपजाचा व्यापार


आज जंगलात राहणाऱ्या अनेक जाती जमाती आहेत. त्या पूर्णत: जंगलांवर अवलंबून आहेत. अशासाठी वनोपजाचा व्यापार म्हणून इमारतीचे लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, गवत व वन औषधी वनस्पती यांची लागवड करायला प्रोत्साहित करून त्यांना उदरनिर्वाहाच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाते.

'४' सर्व साधारण माहिती


सर्वसाधारण माहिती म्हणजे वृक्षारोपण, वन संशोधन, वन शिक्षण आणि प्रशिक्षण याचबरोबर वन विभागाच्या दैनंदिन कामकाजाच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते.

१९२६ च्या कॉलची स्थिती

आजच्या घडीला शासनाच्या विविध विभागांसाठी हेल्पलाईन सुरू आहेत. प्रत्येक विभागाची माहिती किंवा तक्रार या हेल्पलाईन वरून नागरिक शासन दरबारी मांडतात. योग्य माहिती देण्यासह तक्रारी सोडविण्याचे काम कॉल सेंटरमध्ये हेल्पलाईनवरून केले जाते. अशाप्रकारे १९२६ या हेल्पलाईनवरून करण्यात आलेल्या कॉल्सचा हा आढावा.

१४ मार्च २०१७


या कॉल सेंटरला प्रत्यक्ष भेट दिली त्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजी एकूण १३७ कॉल्स आले होते. तर, हेल्पलाईन सुरु झाल्यापासून आजपर्यंत १२०६८ कॉल्स आले आहेत. आज आलेल्या १३७ कॉल्सपैकी ११३ कॉल्सना उत्तरे (प्रतिक्रिया) दिलेली आहेत. तर, आतापर्यंत ६६४९ इतक्या कॉलना उत्तरे दिली आहेत. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना वनाबाबतची माहिती मिळाली असून ते समाधानी आहेत.या हेल्पलाईनमुळे अनेक पर्यटकांनाही याचा लाभ झालेला आहे. या हेल्पलाईनमुळे वन विभाग आज सर्व सामान्य जनतेच्या जवळ गेलेला असून वनांच्या बाबतीत जनमानसात जागृती होत आहे.

लेखक - अस्लम शानेदिवाण.
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate