हे साप बहुधा झाडांवर किंवा झुडपांवर राहतात. जमिनीवर ते आढळत नाहीत असे नाही; पण बहुतकरुन झाडांच्या खाली किंवा झाडांच्या आसपासच्या जमिनीवरच ते असतात. हे सर्प एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर पक्ष्यांप्रमाणे उडत जातात, अशी एक सार्वत्रिक समजूत आहे, पण ती चुकीची असून ते एका झाडावरुन अगदी जवळच्या दुसऱ्या झाडावर फक्त उडी घेऊ शकतात. सामन्यतः यांचे शरीर सडपातळ आणि लांब असते. शेपटी बरीच लांब व परिग्राही म्हणजे एखादी वस्तू (झाडाची फांदी वगैरे) घट्ट पकडण्याकरिता उपयोगी पडणारी असते.
शरीराचा रंग तपकिरी किंवा फिकट हिरवा असतो. तो बाह्य परिस्थितीशी जुळणारा असल्यामुळे हे साप सहज दिसून येत नाहीत मायावरण. ते फार चपळ असतात आणि भक्ष्य मिळविण्याकरिता दिवसा (एक दोन जातींचे अपवाद सोडून) बाहेर हिंडत असतात. सरडे, पाली, पक्षी व झाडांवर राहणारे बेडूक वृक्षमंडूक खाऊन हे आपली उपजीविका करतात. या प्रकारचे बहुतेक साप बिनविषारी आणि निरुपद्रवी असतात. काहींच्या लाळेमध्ये विष असते, पण ते सौम्य असल्यामुळे त्याचा माणासाच्या शरीरावर गंभीर परिणाम होत नाही. वृक्षसर्पामध्ये ड्रायोफिस, डिप्सॅडोमॉर्फस, डेंड्रिलॅफिस डेंड्रोफिस, क्रायसोपेलिया इ. प्रजातींतील (वंशातील) सर्पांचा समावेश होतो. त्रिशूल सर्प, नानेटी, रुका ही वृक्षसर्पांची उदाहरणे म्हणून देता येतील.
सोनेरी वृक्षसर्प हा उडणारा साप म्हणूनही ओळखला जातो. क्रायसोपेलिया ऑर्नेटा असे त्याचे शास्त्रीय नाव असून तो अंदमान बेटे, श्रीलंका, पश्चिम घाटात गोव्याच्या दक्षिणेस, उत्तर बिहार, प. बंगाल व ईशान्य भारतात आढळतो. तो सापुतारा (गुजरात) येथे आढळल्याची नोंद आहे. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे सुंदर पट्टे असतात. आकर्षक असल्यामुळे पाश्चिमात्य देशांत तो पाळतात. ईशान्य भारतातील उडणारे साप प्राणिसंग्रहालयांत अधूनमधून विकत घेतले जातात; पण बंदिवासात ते जास्त काळ जगत नाहीत. या वृक्षवासी सापांना सदाहरित जंगलातील थंड वातावरणाची सवय असते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयांत त्यांची जास्त काळजी घेतली जाणे गरजेचे आहे.
लेखक - ज. नी. कर्वे / ज. वि.जमदाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020