सँफायर
[सी-फेनेल; लॅ. क्रिथ्मम मॅरिटिमम; कुल-अंबे-लिफेरी (एपिएसी)]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ह्या मांसल, गुळगळीत, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार ग्रेटब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर, प. यूरोप खंडात व भूमध्य सामुद्रिक प्रदेशात आहे. क्वचित तिची बागेत व वाफ्यांच्या कडेने लागवड करतात; तिची उंची सामान्यतः ३० सेंमी. पेक्षा जास्त नसते व बुंध्याशी ती काहीशी कठिण (काष्ठयुक्त) असते. संयुक्त पाने द्विगुण-त्रिदली किंवा त्रिगुण-त्रिदली (दोनदा किंवा तीनदा विभागलेली असून प्रत्येक भाग त्रिदली असतो); खंड जाड व रेखीय (अरुंद व लांबट) असून फुले संयुक्त चामरकल्प [चवरीसारख्या; ⟶ पुष्पबंध] फुलोऱ्यावर येतात; पाकळ्या फार लहान; फळ लहान (०.६ सेंमी.) व लंबगोल. हिची इतर सामान्य शारीरिकलक्षणे ⇨ अंबेलेलीझ गणात (चामर गणात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड ताज्या बियांपासून व तळाशी विभागून मिळालेल्या भागांनी करतात. भरपूर प्रकाशात, समुद्रकिनाऱ्यापासून काहीशा आतील क्षेत्रात चांगले पीक येते. खारी पाने कोशिंबिरीत घालतात व मसाल्यातही वापरतात; तसेच व्हिनेगरमध्ये [⟶ शिर्का]स्वादाकरिता व लोणच्याकरिता घालतात. या वनस्पतीच्या बियांचा बार्लीच्या बियांशी असलेल्या साम्यावरून बार्लीच्या ग्रीक शब्दाचे नाव या वनस्पतीच्या प्रजातीला दिले आहे; या प्रजातीतही फक्त एकच जाती आहे. सँफायर हे इंग्रजी नाव खाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या एका अन्य झुडपाला (सॅलिकॉर्निया हर्बेसिया) दिलेले आढळते. याचे ⇨ माचुरा या वनस्पतीशी काही लक्षणांत साम्य आहे.
लेखक: जमदाडे, ज. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/16/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.