सोनटक्का, जहरी : (इं. अॅलामँडा; लॅ. अॅलामँडा कॅथर्टिका ; कुल-अॅपोसायनेसी). या वेलीचे मूलस्थान गियाना (दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेस) असून आता ती अनेक उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत पहावयास मिळते. भारतात गोवा व त्रावणकोर यांच्या आसपासच्या प्रदेशांत ती जंगली अवस्थेत सापडते. ती मांडवावर, इमारतीवर, दुसऱ्या मोठ्या वृक्षांवर किंवा व्हरांड्यांच्या बाजूस शोभेकरिता वाढवितात. अॅपोसायनेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे इतर झाडाझुडपांप्रमाणे तिच्यामध्ये दुधासारखा चीक (क्षीर) व २-५ पानांची पेऱ्यावरची मंडले आढळतात; बहुधा एका मंडलात चार पाने असतात. ती चिवट, अल्पवृंत, लांबट (कुंतसम) व चकचकीत असतात. फुले मोठी (व्यास सु. ८ सेंमी.), पिवळी गर्द व काहीशी घंटाकृती असून ती कक्षास्थ वल्लरीवर सामान्यपणे वर्षभर येतात. पुष्पमुकुटाच्या मध्यास तळाकडे जाणाऱ्या अनेक गर्द नारिंगी रेषा असतात. फुले फारशी सुगंधित नसतात. नवीन लागवड कलमांनी करतात. कारण भारतामधील वेलींना बी क्वचितच येते. रेताड माती, कोळशाची भुकटी व खत इत्यादींचे मिश्रण घातल्यास वाढ चांगली होते. मात्र पाणीपुरवठा भरपूर लागतो.
लंडन येथील डॉ. अॅलामँडा यांनी आपले नाव या वेलींच्या प्रजातीस दिले आहे. या विशिष्ट जातीची पाने विरेचक असतात. स्थानिक जलोदरात तिची साल (थोडीफार पातळ पापुद्य्रांनी सोलली जाणारी असून) जलरेचक म्हणून देतात.
लेखक - ज. वि. जमदाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020