रोहू : हा गोड्या पाण्यातील मासा आहे. याचे शास्त्रीय नाव लबिओ रोहिटा हे आहे व याचा समावेश सायप्रिनिडी या कुलात होतो. या कुलातील मत्स्य कार्प या सामान्य नावाने ओळखले जातात. रोहू हा कार्प रोहूमासा भारतात सर्वत्र आढळ्तो. दक्षिणेस तो कमी प्रमाणात आढळत होता; पण १९४३ साली बंगालमधून व १९४९ साली ओरिसामधून कावेरी व गोदावरी या नद्यांत याचे वीज टाकून प्रजनन करण्यात आले. याचे शरीर लांबट व काहीसे गोलसर असते. पोटाचा भाग बाजूने पाहिला असता आकाराने बहिर्गोल दिसतो. पाठीचा रंग निळसर किंवा तपकिरी करडा असतो. मुस्कट बोथटपणे पुढे आलेले व तोंड काप घेतल्यासारखे असते. बाजूचे खंड नसतात. स्पृशा (संवेदी राठ केस) बारीक असून सामान्यतः त्यांची एक जोडी असते. ओठ जाड असतात. खवल्यांचा रंग मध्ये पिवळट, नारिंगी किंवा तांबूस असतो व त्यांच्या कडा गर्द रंगाच्या असतात. पक्षावर (तोल सांभाळण्यास उपयुक्त स्नायुमय घडीवर; परावर) मिसळणारे करड्या, तांबड्या किंवा काळसर रंगाचे पट्टे असतात.
भारतात रोहू हा मासा एक महत्त्वाचा खाद्य मत्स्य असून तो संवर्धनास योग्य असा आहे. पूर आलेल्या किंवा खूप पाणी असलेल्या नद्यांत याच्या माद्या अंडी घालतात. याची प्रजोत्पादनक्षमता कटला माशापेक्षाही खूप जास्त आहे. एका वेळी मादी सरासरी वीस लाख अंडी घालते. फलन झालेली अंडी तांबूस रंगाची असतात. पिलाच्या शेपटाकडील भागावर तीन लहान ठिपके असतात. हे ठिपके पुढे एकमेकांत मिसळून जातात. प्रौढ माशात हे आढळत नाहीत. त्यांचे ओठ झालरयुक्त असून खालचा ओठ खालच्या बाजूस वळलेला असतो. त्याच्या पक्षावर हिंगुळी रंगाच्या खुणा असतात. लहान पिले प्राणिप्लवकांवर जगतात; पण प्रौढ मासे मात्र शाकाहारी आहेत. यांचे संवर्धन डबक्यात करतात. एक वर्षात यांची लांबी ४५ सेंमी व वजन ६७५ ग्रॅ. होते. तीन वर्षांत लांबी ९१ सेंमी. इतकी वाढते. पिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लांबवर नेता येतात. प्रवासात फार थोडी पिले मरतात. सध्या गोदावरी व कावेरी या नद्यांत यांची पैदास चालू आहे.
लेखक - ज. वि. जमदाडे
स्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020