অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ससा

ससा : स्तनी वर्गाच्या लॅगोमॉर्फा गणाच्या लेपोरिडी कुलात सशाचा समावेश होतो. सशामध्ये रॅबिट व हेअर अशा दोन प्रमुख जाती आढळतात.

रॅबिट

हे प्रामुख्याने यूरोप, आशिया, आफ्रिका येथे आढळतात. त्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यांमध्ये ओरिक्टोलॅगस व सिल्व्हिलॅगस या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. रॅबिट भारतात आढळत नाहीत.

रॅबिट हे आकाराने हेअरपेक्षा लहान असतात. ते समुहाने व बिळात राहतात. ते माणसाळता येतात. रॅबिटच्या पिलांना जन्मत: केस नसतात व डोळे बंद असतात. सु. आठ दिवसांनंतर त्यांचे डोळे उघडतात व अंगावर थोडे केस येतात. पिले जन्मानंतर लगेच हालचाल करीत नाहीत. काही दिवसानंतर ती हालचाल करतात. यूरोपियन रॅबिट (ओरिक्टोलॅगस क्यूनिक्यूलस ) व कॉटनटेल रॅबिट यांची लांबी सु. २४-२५ सेंमी. असते. कॉटनटेल रॅबिटचे (सिल्व्हिलॅगस ) वजन ०.५ ते २ किग्रॅ. असते. पाळलेले कॉटनटेल रॅबिट व यूरोपियन रॅबिट हे अनुकमे ८-१० वर्षे व १३ वर्षे जगतात. रॅबिट हे लांब कानाचे, आखूड शेपटी ( सु. ५ सेंमी. लांब), पाठीमागचे पाय लांब, करडया किंवा तपकिरी रंगाचे असतात.

यूरोपियन रॅबिट

हे माणसाळलेल्या जातीचे पूर्वज समजले जातात. ते सुरूवातीस नैऋत्य यूरोप, उत्तर आफ्रिका येथे आढळत. नंतर या जातीने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका येथे प्रवेश केला. ही लवकर प्रसारित होणारी जाती असून तिचे प्रजनन वर्षभर कोणत्याही काळात होऊ शकते. मादी आठ महिन्यांची झाल्यावर वयात येते. मादी पिलांना जन्म देण्यापूर्वी जमिनीत छोटे बीळ तयार करते, त्यात पालापाचोळा व स्वत:ची लोकर यांचा वापर करून घरटे तयार करते. तिचा गर्भावधी काळ सु. ३० दिवसांचा असतो. ती एका वीणीत ( वेतात ) ५ ते ८ पिलांना जन्म देते. वर्षातून अनेक वेळा तिची वीण होते.

यूरोपियन रॅबिट हा वैशिष्टयपूर्ण ससा आहे. त्यांची असंख्य बिळे एकमेकांस जोडलेली असतात. बाहेर जाण्याच्या मार्गाव्दारे ते रात्री बाहेर पडतात. ते गवत व वनस्पतिज अन्न खातात. ते शांत व भित्र्या स्वभावाचे असतात.

कॉटनटेल रॅबिट

(सिल्व्हिलॅगस ) हे उत्तर अमेरिकेत आढळणारे रॅबिट आहेत. त्यांची शेपटी खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाची असते. ते सर्वसामान्य जंगली रॅबिट आहेत. ते खेळ व खाद्यासाठी प्रसिद्घ प्राणी आहेत. ते बिळात राहतात व अन्नाच्या शोधासाठी मोकळ्या जागेत जातात. त्यांच्या सु. १३ जाती असून त्यांपैकी सिल्व्हिलॅगस फ्लोरिडॅनस ही जाती अमेरिकेत सर्वत्र आढळते.

हेअर

हे आकारमानाने रॅबिटपेक्षा मोठे असतात. ते एकएकटे राहतात. ते माणसाळता येत नाहीत. ते बिळात राहत नाहीत. पिले जन्मत:च अंगावर केस असलेली व त्यांचे डोळे उघडे असतात. जन्मानंतर लगेच ती हालचाल करतात. यांचे कान व मागचे पाय लांब असतात. मागच्या पायावर बसून आजूबाजूला पाहून ते कानोसा घेतात.

लेपस यूरोपियस ही जाती मध्य व दक्षिण यूरोप आणि आफ्रिकेत आढळते. उत्तर अमेरिकेत लेपस अमेरिकन्स, ले. टाऊनसेंडी, ले. कॅलिफोर्निकस या जाती आढळतात. बेल्जियम हेअर ही स्थानिक जाती आहे. ऑस्ट्रेलियात एकोणिसाव्या शतकात बाहेरून हेअर आणण्यात आले.

भारतात इंडियन हेअर ( ले. निगिकोलीस ) हा ससा प्रामुख्याने आढळतो. याशिवाय केप हेअर काश्मीरमध्ये व वायव्य सरहद्द प्रांतात आणि अरेबियन हेअर सिक्किमच्या पठारावर, नेपाळ व लडाखमध्ये आढळतात. हिस्पिड हेअर ही जाती आसाम रॅबिट या नावाने प्रसिद्ध आहे.इंडियन हेअर जातीत रेड किंवा पाटल हेअर या सशाची डोक्यासह लांबी ४० ते ५० सेंमी. व वजन १.८ ते २.३ किगॅ. असते. त्याची मान, तोंडाची मागची बाजू, छाती आणि पाय तपकिरी असतात. हनुवटी, गळ्याचा वरचा भाग आणि शरीराचे खालचे भाग पांढरे असतात. शेपटी तांबडी तपकिरी रंगाची असते. ब्लॅकनेक्ड ( काळमान्या ) हेअर हा आकारमानाने मोठा असतो. त्याचे वजन २.२-३.६ किगॅ. असते. हा रंगाने काळसर तपकिरी असतो. याच्या मानेच्या वरील भागावर काळसर पट्टा असतो. शेपटी काळसर रंगाची असते. डेझर्ट हेअर ( रणससा ) या जातीत पिवळी व वाळूसारखा रंग असलेली लव त्याच्या शरीरावर असते. पाटल हेअरच्या तुलनेत याच्या शरीराचे रंग फिकट असतात. मानेवर काळसर पट्टा नसतो. शेपटी काळसर तपकिरी असते.

ब्लॅकनेक्ड हेअर दक्षिण भारतात पूर्वेला गोदावरीपर्यंत आणि पश्चिमेला खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशापर्यंत आढळतात. रेड हेअर हिमालयापासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत आढळतात. रणससे वाळवंटी प्रदेश, नैऋत्य प्रदेश, पंजाब, सिंध, कच्छ, राजस्थान व सौराष्ट्र या भागांत आणि ले. निगिकोलीस सिमकॉक्सीले. निगिकोलीस महादेवा या जाती मध्य प्रदेशात आढळतात.

अनुकूल हवामानात ते विपुल प्रमाणावर आढळतात. झुडपांच्या भागात व मधेमधे जंगल असलेल्या जागा त्यांच्या वाढीसाठी योग्य असतात. जंगलात त्यांची संख्या कमी असते. हे प्राणी उंच पर्वतावरही आढळतात. कुमाऊँच्या टेकडयांवर स.स.पासून २,४०० मी. उंचीवर ते आढळतात. निलगिरी पर्वत व दक्षिण भारतातील डोंगर रांगांवरही ते आढळतात.

पुष्कळदा हेअर गावाजवळच्या जागा व शेती, लागवडीच्या भागात राहतात. काही वेळा ते पिकांची नासाडी करतात. दिवसा हा प्राणी गवतात जागा करून त्यात पडून राहतो. रात्री तो अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतो. हा स्वस्थ पहुडलेला असताना त्याच्या शत्रूला तो सहज ओळखता येत नाही. हा प्राणी फार भित्रा आहे. तो वनस्पतिज अन्न खातो. गवत, पालापाचोळा, झाडाचे कोवळे अंकुर हे याचे मुख्य अन्न आहे.

सर्व मांसभक्षक प्राणी हेअरचे शत्रू आहेत. कोल्हा, मुंगूस, रानमांजरे, कुत्री त्याची शिकार करतात. तो थोड्या अंतरापर्यंत वेगाने पळतो व थांबून कानोसा घेतो. तो शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी कोणत्याही बिळात घुसतो.

रेड हेअरला एकावेळी एक ते दोन पिले होतात. पिले होण्याचा काळ ऑक्टोबर ते फेबुवारी हा आहे. त्याचा गर्भधारणेचा कालावधी सु. एक महिन्याचा असतो. हेअरच्या पिलांचे डोळे जन्मत:च उघडलेले असतात.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Supplement LiveStock, Vol. VI, New Delhi, 1970.

२. कुलकर्णी, अनिलकुमार, ससापालन, पुणे, १९८७.

 

लेखक - चंद्रकांत प. पाटील / वसंत मु. घाणेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/21/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate