অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विंचू

विंचू

विंचू

संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेल्या प्राण्यांच्या) संघाच्या अष्टपाद [⟶ ॲरॅक्निडा] वर्गातील वृश्चिक गणात सर्व विंचवांचा समावेश होतो. ग्रीनलंड, न्यूझीलंड व अंटार्क्टिका ह्या भूप्रदेशांखेरीज जगात सर्वत्र विंचू आढळतात. वाळवंटात ते विपुल तर समशीतोष्ण प्रदेशात फारच कमी असतात. ते ४,००० ते ५,००० मी. उंचीपर्यंत (उदा., अँडीज पर्वत) आढळतात.

ब्युथिडी, चीरिलिडी, व्हेजोव्हिडी, इश्चुर्निडी, स्कॉर्पिओनिडी, चॅक्टिडी, बॉर्थियुरिडी व डिप्लोसेंट्रिडी ही विंचवांची आठ कुले असून त्यांच्या सु. १,२०० ते १,३०० जातींचे वर्णन करण्यात आलेले आहे. चॅक्टिडी व बॉथ्रियुरिडी या कुलांखेरीज बाकीच्या सहा कुलांतील विंचू भारतात आढळतात. ब्युथिडी कुलातील आठ प्रजातींमधील सु. ४० जाती भारतात व आसपासच्या प्रदेशांत आढळतात. ब्युथसव लायकॅस प्रजातींतील विंचू भारतात सर्वत्र आढळतात. ब्युथिओलस प्रजातींतील जाती काठेवाड व पश्चिम घाटात आढळतात.स्टेनोकिरस प्रजातीतील जाती कारवार व मलबार किनारा आणि हेमिब्युथस व आयसोमेट्रस प्रजातींतील जाती पश्चिम भारत व गुजरातेत आढळतात. चीरिलस व स्कॉर्पियन्स प्रजातींतील पुष्कळ जाती पश्चिम हिमालय, लडाख व आसामातील उंच प्रदेशात आढळतात. चिरोमॅचेटीस व आयोमॅकस प्रजातीतील काही थोड्या जाती महाराष्ट्र व गुजरातेतही आढळल्या आहेत. हेटरोमेट्रस(पॅलॅमॅनीअस) स्वामरडामी (स्कॉर्पिओनिडी कुल) या जातीच्या विंचवांसारखे बरेच मोठे विंचू भारतात मैदानी व पहाडी प्रदेशांत आढळतात.

सिल्युरिअन कल्पापासून (सु. ४२ कोटी वर्षांपासून) विंचू अस्तित्वात आहेत. काहींच्या मते ते ⇨ यूरिप्टेरिडापासून (पाणविंचवापासून) क्रमविकसित (उत्क्रांत) झाले असावेत. सुमारे ३९ कोटी वर्षांपूर्वीपासून विंचवांच्या शरीररचनेत विशेष फरक पडलेला नाही, त्यामुळे ती सापेक्षतः आद्य स्वरूपाची आहे. शरीराचे खंड (भाग) व संबंधित संरचना क्रमविकासात नाहीशा झाल्या किंवा एकत्रित झाल्या. अन्य अष्टपाद प्राण्यांपेक्षा विचंवांना सर्वाधिक शरीरखंड (१८) आहेत आणि हृदय व तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांच्यात (पुस्तकाच्या पानांप्रमाणे रचना असणाऱ्या अनेक पटलयुक्त घड्यांनी बनलेले व एका चिरेने बाहेर उघडणारे कोशासारखे श्वसनाचे अवयव) असणे हेही विंचवाचे आद्य लक्षण आहे.

विंचवाची लांबी २-२० सेंमी. पर्यंत क्वचित थोडी जास्तही असते. उष्ण कटिबंधीय आफ्रिकेतील गिनीतील काळा विंचू सर्वांत लांब असून त्याचे वजन ६० ग्रॅ. असते. सर्वांत छोटा विंचू १२ मिमी. लांब असतो. वाळवंटातील व ओसाड प्रदेशांतील बहुतेक जाती पिवळसर किंवा फिकट तपकिरी तर दमट किंवा पहाडी प्रदेशांतील जाती तपकिरी किंवा काळ्या असतात. अशा मोठ्या विंचवांना‘इंगळी’ म्हणतात. हिरवट छटांचे विंचूही आढळतात.

विंचवाला पादांच्या (उपांगांच्या) चार जोड्या असतात. पहिल्या जोडीतील पाद लहान असून त्यांना नखरिका म्हणतात. भक्ष्य फाडण्यासाठी त्या वापरतात. दुसऱ्या जोडीतील पादांना पादमृश वा स्पर्शपाद म्हणतात. ते मोठे असून त्यांच्या टोकशी बळकट नख्यांसारखे चिमटे असतात. हे चिमटे पुढील बाजूस क्षितिजसमांतर राहतात आणि भक्ष्य पकडण्यासाठी व स्पर्श करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पादाच्यां शेवटच्या चार जोड्यांनाही टोकांशी चिमटे असून या जोड्यांचा चालण्यासाठी उपयोग होतो. स्पर्शपादांच्या बहुतेक भागांवर विशेष स्पर्श-रोम (ताठ उभे राहणारे केस) असतात. शेवटच्या जोडीच्या मागे अधर (खालच्या) पृष्ठावर पेक्टिन नावाच्या फणीसारख्या अंगांची एक जोडी असते. अलीकडील संशोधनावरून असे दिसते की, पेक्टिनांच्या दात्यांत पुष्कळ संवेदी कोशिका (संवेदनाग्राही पेशी) असतात व समागमाकरिता योग्य जागेची निवड करणे हे नराच्या पेक्टिनांचे कार्य असते. शिरोवक्षावर (डोके व छाती एकत्रित होऊन तयार झालेल्या भागावर) २-५ लहान साधे डोळे असतात. विंचवाची दृष्टी अधू असून त्याला ऐकू येत नाही.

खंडयुक्त उदराच्या टोकावर नांगी आणि विष ग्रंथी असलेले खंडयुक्त शेपूट ही विंचवाची वैशिष्ट्ये होत. शेपटाच्या टोकावरील फुगीर भागात दोन मोठ्या विष ग्रंथी असतात. दोन सूक्ष्म नलिकांनी नांगीच्या टोकावर असलेल्या छिद्राला त्या जोडलेल्या असतात. शेपूट कमानीसारखे पाठीवर वळवून विंचू नांगीने दंश करतो. एका दंशात ५ (ब्यु. टॅम्युलस) ते ८ (पॅलॅमॅनीअस ग्रॅव्हीमॅनस) मिग्रॅ. विष सोडले जाते. आठ प्रजातींतील सु. पंचवीस जातींच्या विंचवाच्या दंशाने मनुष्य मृत्यू पावू शकतो. विंचू चावल्याने दरवर्षी सु. ५,००० पेक्षा जास्त लोक मृत्यू पावत असावेत. भारताचा काही भाग, उत्तर व दक्षिण आफ्रिका, मध्य-पूर्व, दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे विंचवामुळे माणसाच्या जीविताला धोका असतो. या सर्व जाती ब्युथिडी कुलातील आहेत. त्यांच्या विषामुळे स्थानिक आणि सार्वदेहिक परिणाम होतात. तीव्र आचके, पक्षाघात व हृदयासंबंधीच्या अनियमिततेमुळे मृत्यू येतो. विषावर उतारा देऊन मृत्यू टाळता येतो. सुमारे १,२०० पेक्षा जास्त जातींच्या विंचवांची विषे मारक नाहीत. या जाती रक्तविषे तयार करतात व त्यांमुळे सौम्य ते तीव्र स्वरूपाचे स्थानिक परिणाम होतात. त्यांमध्ये सूज, त्वचा विवर्ण (रंगहीन) होणे व वेदना यांचा समावेश होतो. दंश झालेली व्यक्ती काही मिनिटांत किंवा दिवसांत पूर्ण बरी होते. विंचवाला स्वतःच्या विषाची बाधा होत नाही. भारतात अनेक ठिकाणी काही वनस्पती व आयुर्वेदिक औषधांचा उपयोग विंचवाचे विष उतरविण्यासाठी करतात.

लहानमोठे किडे, कोळी, व अन्य लहान अष्टपाद हे विंचवाचे भक्ष्य होय. कधीकधी आयसोपॉड, गोगलगाई इत्यादींचाही त्यात समावेश होतो. स्पर्शपादांनी ते भक्ष्य पकडतात. भक्ष्य मोठे असेल, तर त्याला दंश करून बेशुद्ध करतात व नखरिकांनी फाडून त्याचे तुकडे करतात. विंचू भक्ष्य सावकाश खातात, साधारण आकाराचा कीटक खाण्यास त्याला सु. एक तास लागतो.

विंचू मुख्यतः निशाचर आहेत. दिवसा ते बिळे, फटी, दगडाखाली किंवा सालीमध्ये लपून बसतात. संध्याकाळी ते बाहेर पडतात व पहाटेपूर्वी पुन्हा लपून बसतात. भक्ष्य पकडण्यासाठी ते बराच वेळ म्हणजे भक्ष्य टप्प्यात येईपर्यंत दबा धरून बसतात. हवेत उडणाऱ्या भक्ष्याची तसेच जमिनीवरून चालणाऱ्या भक्ष्याची कंपनेही त्याला कळतात आणि त्यावरून भक्ष्याचे स्थान व दिशा यांचे अचूक ज्ञान विंचवाला होते.

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate