অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्थ्रोपोडा २

आर्थ्रोपोडा २

आर्थिक व व्यावहारिक महत्व : संधिपादाचे आर्थिक आणि व्यावहारिक महत्त्व फार मोठे आहे. प्राणिसृष्टीतील इतर प्राण्यांशी येणारे त्यांचे संबंध उपकारक तसेच अपायकारकही आहेत. झिंगे, खेकडे, शेवंडे, कोळंब्या वगैरे प्राण्यांचा सगळ्या जगभर खाण्यासाठी उपयोग करतात. या प्राण्यांना पकडण्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो आणि मच्छीमारीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक संधिपाद अपायकारक आहेत. उदाहरणादाखल येथे दोनचार प्राण्यांचाच उल्लेख केला आहे.  अन्नधान्याचा आणि इतर अन्नपदार्थांचा कीटक दर वर्षी नाश करतात त्यामुळे

लाखो रुपयांचे नुकसान होते.  कीटक आणि इतर संधिपाद रोगांचे वाहक आहेत.  मलेरिया एका जातीच्या डासाद्वारे होतो.  सायक्लॉप्स या प्राण्याच्या शरीरात गिनी वर्मचे डिंभ पुष्कळदा असतात.  असा सायक्लॉप्स पिण्याच्या पाण्याबरोबर माणसाच्या पोटात गेला तर नारू होतो.  किडी (माइट) आणि गोचिडी माणसांच्या किंवा जनावरांच्या त्वचेवर बाह्यपरजीवी म्हणून राहातात व त्वचेचे रोग उत्पन्न करतात.  काही कोळी, विंचू आणि गोमा यांचा दंश विषारी असतो.  काही संधिपाद उपकारही असतात.  काही हिंस्र कीटक अपायकारक कीटकांना खातात त्यामुळे त्यांच्या उपद्रवाला आळा बसतो.  पुष्कळ कीटकांमुळे पर-परागसिंचन (एका फुलातील पराग कण दुसऱ्या फुलाकडे वाहून नेणे) घडून येते.  लाखेच्या कीटकांपासून लाख, रेशमाच्या पतंगाच्या डिंभापासून रेशीम आणि मधमाश्यांपासून मध आणि मेण मिळते.

आर्थ्रोपोडांचे जीवाश्म : आर्थ्रोपोडा हा अतिदीर्घ इतिहास असणाऱ्या प्राण्यांचा संघ आहे.  कँब्रियन कल्पातील सागरात या संघाचे  प्राणी विपुल असत व त्या कालातील प्राण्यांत ते अग्रेसर असत (निरनिराळ्या भूवैज्ञानिक कल्पांच्या माहितीकरिता भूविज्ञान ही नोंद पहावी).  कॅब्रियन कल्पाच्या आधीच या संघातील प्राणी सागरात अवतरले पाहिजेत.  कँब्रियनपासून तो आतापर्यंतच्या सर्वच संधिपादांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या आकारात, आकारमानात व राहाणीत कितीही भेद असले, तरी त्या सर्वांच्या शरीरावर कायटिनाचे किंवा कायटिनात कॅल्शियमी लवणाची कमीअधिक भर पडून कठीण झालेलेबाह्य आवरण असते.या संघाच्या बहुतेक सर्व वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म (अवशेष) आढळतात व त्यांपैकी कित्येक जीवाश्म एकूण पृथ्वीच्या किंवा पृथ्वीवरील प्राण्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेले आहेत.

क्रस्टेशिया वर्ग-उपवर्ग ट्रायलोबिटा : पुराजीव महाकल्पात, विशेषतः त्या महा-कल्पाच्या पूर्वार्धात सागरात राहाणाऱ्या व त्या महाकल्पाच्या अखेरीस निर्वंश झालेल्या प्राण्यांचा उपवर्ग. कित्येक जण ट्रायलोबिटा हा स्वतंत्र वर्ग मानतात [ट्रायलोबाइट].

उपवर्ग ब्रॅकिओपोडा : मुख्यतः गोड्या पाण्यात व क्वचित खाऱ्या सरोवरात किंवा समुद्रात राहणाऱ्या या प्राण्यांच्या फारच थोड्या गोत्रांचे जीवाश्म सापडतात. या उपवर्गाच्या नोटोस्ट्रॅका या गणातील प्रोटोकॅरिस या सागरी गोत्राच्या पृष्ठवर्माचे जीवाश्म उत्तर अमेरिकेतील पूर्व-कॅंब्रियन कालीन खडकांत सापडलेले आहेत.  त्यांचे पृष्ठवर्म, आजच्या गोड्या पाण्यात राहाणाऱ्या ट्रायॉप्स (एपस) याच्या पृष्ठवर्मासारखे असे. आजच्या ट्रायॉप्सांच्या पूर्वजांचे जीवाश्म ऑक्लाहोमातील पर्मियन व आल्सेसातील ट्रायासिक कल्पातल्या खडकांत आढळलेले आहेत.

काँकोस्ट्रॅका गण : शिंपेसारखे द्विपुटी पृष्ठवर्म असणाऱ्या प्राण्यांच्या या गणातील महत्त्वाचे गोत्र म्हणजे सामान्यतः गोड्या पाण्यात राहाणारे सायझिकस (पूर्वीचे नाव एस्थेरिया) होय.  त्याचे पृष्ठवर्म काही थोडे मिमी. लांबीचे व शृंगमय (शिंग ज्याचे बनलेले असते अशा) पदार्थाचे असते. डेव्होनियन ते ट्रायासिक कल्पापर्यंतच्या काळात व क्रिटेशस कल्पात काँकोस्ट्रॅकांची बरीच वाढ झाली होती. ते आजही विपुल आहेत पण त्यांचे तृतीय कल्पातील जीवाश्म आढळलेले नाहीत.

अ‍ॅनोस्ट्रॅका गण : या गणाचे निःसंशय असे जीवाश्म मिळालेले नाहीत. ब्रिटिश कोलंबियातील मध्य कॅंब्रियन व ब्रिटनमधील डेव्होनियन (ओल्ड रेड सँडस्टोन) कालीन खडकांतील काही जीवाश्म या गणाचे असावेत.

उपवर्ग ऑस्ट्रॅकॉडा : सागरात किंवा गोड्या पाण्यात राहाणाऱ्या या प्राण्यांचे पृष्ठवर्म, शृंगमय किंवा कॅल्शियमी पदार्थाचे व बारीक किंवा सूक्ष्म व द्विपुटी असते, पण बिजागरी शिंपांच्या बिजागरीहून अगदी भिन्न असते.  ऑस्ट्रॅकॉडांचे पृष्ठवर्म तेवढेच जीवाश्मरूपाने टिकून राहाते. याला अपवाद म्हणजे फ्रान्समधील दगडी कोळसा असणाऱ्या कार्‌बॉनिफेरस कालीन थरांत आढळलेले पॅलिओसायप्रीस या गोत्राचे जीवाश्म. त्यांच्यात मूळच्या प्राण्याची उपांगेसुद्धा सुरक्षित राहिलेली आढळली. सिल्युरियन कल्पातील लेपरडिटिया हे ऑस्ट्रॅकॉडांपैकी राक्षस म्हटले पाहिजेत. त्यांची लांबी जवळजवळ २० मिमी. असे.

ऑस्ट्रॅकॉडांचा उदय ऑर्डोव्हिसियन कल्पाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्यांचा उत्कर्ष वेगाने होऊन लौकरच त्यांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले व ते आतापर्यंत टिकून राहिलेले आहेत.  त्यांची कित्येक गोत्र व जाती अल्पायुषी होत्या व त्यांचा उपयोग गाळांच्या खडकांच्या गटांचे कालानुक्रमे लहान लहान विभाग करण्यासाठी व अलग अलग असलेल्या खडकांचे सहसंबंध ठरविण्यासाठी होतो. पुराजीव महाकल्पातील खडकांच्या अध्ययनात त्यांचा बराच उपयोग झालेला आहे.  खनिज तेल असलेले खडक व त्यांच्या थरांची संरचना ही शोधून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होत असल्यामुळे अलीकडे त्यांचे अतिशय सविस्तर अध्ययन झालेले आहे.

उपवर्ग कोपेपोडा : नवजीव महाकल्पातील मायोसीन कालापूर्वीच्या कोपेपोडांचे निःसंशय असे जीवाश्म आढळलेले नाहीत व मायोसीन किंवा त्यानंतरचे जीवाश्मही विरळाच आढळतात.

उपवर्ग सिरिपेडिया : सिरिपेडियांचे सर्वांत जुने जीवाश्म म्हणजे रशियातील डोनेझ व कुस्नेत्स्क द्रोणीतील, मध्य कार्‌बॉनिफेरस कालातल्या खडकांत आढळलेल्या प्रीइलेपास गोत्राचे जीवाश्म होत. त्यानंतरच्या व मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीपर्यंतच्या कालातील खडकांत सिरिपेडियांचे जीवाश्म तुरळक आढळतात. कार्‌बॉनिफेरस ते पूर्व क्रिटेशस कल्पापर्यंतच्या कालातील सिरिपेडियाच्या शरीराला देठ असे. उत्तर क्रिटेशस कल्पात देठहीन गोत्रे अवतरली. मध्यजीव महाकल्पानंतर त्यांची संख्या व गोत्रे वाढली. पण त्यांचे जीवाश्म फारसे महत्त्वाचे नाहीत.

उपवर्ग मॅलॅकोस्ट्रॅका : या उपवर्गात फायलोकॅरिडा (लेप्टोस्ट्रॅका), सिन्कॅरिडा, पेरॅकॅरिडा, यूकॅरिडा व हॉप्लाेकॅरिडा हे पाच गण आहेत.

(१) फायलोकॅरिडा गण : पुराजीव महाकल्पातील सागरात यांची बरीच गोत्रे असत, पण आजच्या सागरात त्यांची चारच गोत्रे आढळतात.  पुराजीव महाकल्पातील गोत्रांची शरीरे आजच्या गोत्रांच्या सारखीच पण अधिक मोठी असत. त्यांचे अनेक जीवाश्म आढळलेले आहेत पण एक हायमेनोकॅरिस हे गोत्र वगळले, तर इतर कोणत्याही गोत्रांच्या जीवाश्मात शरीराची उपांगे मिळालेली नाहीत. ब्रिटनमधील कँब्रियन कालीन लिंग्युला फ्लॅग्ज नावाच्या खडकात हायमेनोकॅरिसाचे जीवाश्म सापडलेले आहेत. त्यांचे पृष्ठवर्म अर्धलंब वर्तुलाकार असून त्याचे पृष्ठ गुळगुळीत असे. पृष्ठवर्म द्विपुटी नसे. त्याचे आठ कबंधखंड (धडाचे भाग) उघडे असत. कँब्रियन कालीन हायमेनोकॅरिस व डेव्होनियन कालीन एकिनोकॅरिस यांचे  बरेच जीवाश्म सापडतात. कँब्रियन ते ट्रायासिक कालापर्यंतच्या खडकांत यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  त्यानंतरच्या खडकांत आढळल्याची नोंद नाही.

(२) सिन्कॅरिडा गण: ‍‌मॅलॅकोस्ट्रॅकांपैकी आदिम प्राण्यांचा गण.  या गणातील चारच गोत्रे आता टॅस्मेनियातील, व्हिक्टोरियातील व यूरोपातील गोड्या पाण्यात आढळतात. त्यांपैकी परिचित म्हणजे अ‍ॅनॅस्पिडीस होय. आजच्या सिन्कॅरिडांशी बरेच साम्य असणाऱ्या गोत्रांचे काही जीवाश्म उत्तर पुराजीव महाकल्पातील खडकात आढळतात. उदा., कार्‌बॉनिफेरस कालातील पॅलिओकॅरिस (प्रीअ‍ॅ‍‌‌‍‌‍‍‌‍‌‍‌‍‌‍‌नॅस्पिडीस) व पर्मियन काळातील यूरोनेक्टिस (गँप्सोनिक्स) ही गोत्रे.

(३) पेरॅकॅरिडा गण : या गणाचे (अ) मिसिडेशिया, (आ) क्यूमेशिया, (इ) टॅनेइडेशिया, (ई) आयसोपोडा व (उ) अँफिपोडा असे उपगण आहेत.  त्यांपैकी क्यूमेशिया व टॅनेइडेशिया यांचे जीवाश्म आढळलेले नाहीत.

(अ) मिसिडेशिया : यांच्या अनेक गोत्रांचे जीवाश्म कारबॉनिफेरस कालीन व विशेषतः स्कॉटलंडातील कार्‌बॉनिफेरस  कालीन खडकात आढळलेले आहेत पण त्या गोत्रांपैकी फक्त पायगोसेफॅलस या गोत्राच्या जीवाश्मात भ्रूणकोष्ठ (विकासावस्थेतील भ्रूण ज्यात ठेवलेले असतात अशी पिशवीसारखी पोकळी) मिळालेले आहेत. उत्तर डेव्होनियन, ट्रायासिक व जुरासिक कल्पांतील काही जीवाश्म मिसिडेशियाचे असावेत.  जुरासिक नंतरच्या खडकांत त्यांचे जीवाश्म आढळलेले नाहीत.

(ई) आयसोपोडा : पुराजीव महाकल्पातील काही जीवाश्म आयसोपोडांचे असण्याचा संभव आहे पण त्यांचे निःसंशय जीवाश्म प्रथम ट्रायासिक कालीन खडकांत आढळतात.  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या देशांतील गोड्या पाण्यात आज राहणाऱ्या फ्रीटोइकस या गोत्राचे जीवाश्म क्वीन्सलंडातील ट्रायासिक खडकांत सापडलेले आहेत.  जुरासिक, क्रिटेशस व तृतीय कल्पांतल्या खडकांत आयसोपोडांचे जीवाश्म आढळलेले आहेत, पण विरळाच.

(उ) अँफिपोडा : यांचे जीवाश्म अती विरळाच आढळतात.  अँफिपोडाचे निःसंशय जीवाश्म तृतीय कल्पातल्या खडकात आढळलेले आहेत व त्यांच्यापैकी बहुतेक आजच्या गोत्रांच्या प्राण्यांचे आहेत. उदा., मायोसीन कालीन गॅमॅरस.

(४) यूकॅरिडा गण : या गणाच्या डेकॅपोडा या उपगणाचेच जीवाश्म आढळतात.  त्यांची उदाहरणे पुढील होत.

विभाग नॅटँटिया: आजच्या पेनीयस व स्टेनोपस यांसारख्या प्राण्यांचा गट.  यांचा अवतार ट्रायासिक कल्पात व वाढ जुरासिक कल्पात झाली. पण त्यानंतरच्या कालातील नॅटँटियांचे मात्र फारच थोडे जीवाश्म मिळालेले आहेत.

विभाग रेप्टँटिया : यांचे (अ) पॅलिन्यूरा, (आ) अ‍ॅस्टॅक्यूरा, (इ) अ‍ॅनॉम्यूरा व (ई) ब्रॅकियूरा असे चार उपविभाग आहेत.

(अ) पॅलिन्यूरा : ट्रायासिक ते क्रिटेशस कालापर्यंतच्या खडकांत त्यांचे जीवाश्म बरेच व त्यानंतरच्या खडकांत विरळाच सापडतात. जुरासिक कालीन झोलेनहोफेन चुनखडकात एरियॉन व मेकोकीरस या गोत्रांचे जीवाश्म सापडलेले आहेत.

(आ) अ‍ॅस्टॅक्यूरा : याच्यात खऱ्या लॉब्स्टरांचा (शेवंड्यांचा) समावेश होतो.  त्यांचा अवतार ट्रायासिक काली झाला व त्यानंतरच्या कालातील खडकांत त्यांचे जीवाश्म आढळतात.

(इ) अ‍ॅनॉम्यूरा : यांचे जीवाश्म विरळाच आढळतात.  त्यांच्यापैकी प्रमुख गोत्र म्हणजे कॅलियानॅस्सा.  त्याचा उदय उत्तर जुरासिक कल्पात झाला व ते आजच्या समुद्रातही आढळते.

(ई) ब्रॅकियूरा : खेकड्यांचा गट.  यांचा उदय जुरासिक कल्पाच्या प्रारंभी झाला.  त्या कल्पातील सर्व गोत्रे आद्य प्रकारची होती.  त्यांपैकी सर्वांत जुने म्हणजे इओकॅर्सिनस. क्रिटेशस कल्पांत त्यांची भरभराट झाली व आता त्यांचा परमोत्कर्ष झालेला आहे.

(५) हॉप्लोकॅरिडा गण : या गणाचा स्टोमॅटोपोडा हा एकच उपगण आहे. या गणातील परिचित गोत्र म्हणजे आजचे स्क्विला होय. स्टोमॅटोपोडांचे जीवाश्म अती विरळाच आढळतात. झोलेनहोफेनच्या चुनखडकातील स्कुल्डा हे गोत्र या गटातले आहे. कार्‌बॉनिफेरस काळात स्टोमॅटोपोडांची गोत्रे असावीत.

मीरिअ‍ॅपोडा वर्ग : या वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म विरळाच आढळतात पण सिल्युरियन कल्पाइतक्या प्राचीन कालातील प्राण्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.पुराजीव महाकल्पात राहाणारी गोत्रे त्या महाकल्पाच्या अखेरीस निर्वंश झाली.  त्यांच्यापैकी सर्वांत जुने म्हणजे उत्तर सिल्युरियन कल्पातील आर्किडेस्मस होय.  डेव्होनियन (ओल्ड रेड सँडस्टोन) कल्पाच्या खडकांत आर्किडेस्मस व कॅंपेकॅरिस यांचे जीवाश्म  आढळलेले आहेत. कार्‌बॉनिफेरस कालीन दगडी कोळसा असलेल्या व काही पर्मियन कालीन थरांत झायलोबियस, अँथ्रॅकोडेस्मस व इतर कित्येक गोत्रांचे जीवाश्म सापडलेले आहेत.

कायलोपोडा : या गटातील सर्वांत जुने म्हणजे कार्‌बॉनिफेरस कालातील दगडी कोळसा असणाऱ्या थरांत सापडलेले जीवाश्म होत.  कायलोपोडांच्या आधुनिक कुलांतील प्राण्यांचे जीवाश्म ऑलिगोसीन कालीन खनिज अंबरात  व तृतीय कल्पातल्या इतर काही थरांत आढळलेले आहेत.

अ‍ॅरॅक्निडा वर्ग : याचे मेरोस्टोमॅटा आणि यूअ‍ॅ‌‍‍‌‌रॅक्निडा असे दोन उपवर्ग आहेत.

उपवर्ग मेरोस्टोमॅटा : या उपवर्गाचे झिफोसूरा व यूरिप्टेरिडा असे गण आहेत.  झिफोसूरांपैकी एकच गोत्र लिम्युलस (किंग क्रॅब) आता अस्तित्वात आहे. झिफोसूरांचे जीवाश्म विरळाच आढळतात, पण सिल्युरियन काळापासून त्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  उत्तर जुरासिक कालीन झोलेनहोफेन चुनखडकात मात्र त्यांचे बरेच जीवाश्म सापडलेले आहेत. उत्तर अमेरिकेच्या कॅंब्रियन कालीन खडकांत झिफोसूरांशी बरेच साम्य असलेल्या अ‍ॅ‌‍‍‌‌ग्लॅस्पिस व बेक्वेथिया यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  सिल्युरियन कालीन हेमिअस्पिस, डेव्होनियन व कारबॉनिफेरस कालीन बेलिन्यूरस, पर्मियन कालीन पॅलिओलिम्युलस ही या गटातील काही गोत्रे होत. ट्रायासिक व त्यानंतरच्या कालात लिम्युलसाचे जीवाश्म आढळतात व लिम्युलस आताही विद्यमान आहे.  यूरिप्टेरिया हा फक्त पुराजीव महाकल्पात राहाणाऱ्या पण उत्‍तर पुराजीव महाकल्‍पात अत्यंत महत्त्व पावलेल्या प्राण्यांचा गण आहे [ यूरिप्टेरिडा].

उपवर्ग यूअ‍ॅ‌रॅक्निडा : याच्यात स्कॉर्पिओनिडा, पेडिपॅल्पी, अ‍ॅ‌रॅनेइडा, स्यूडोस्कॉर्पिओनिडा, फॅलँजिडा आणि अकॅरिना या गणांचा समावेश होतो.

स्कॉर्पिओनिडा गण : हा विंचवांचा गण होय. सिल्युरियन कल्पाइतक्या प्राचीन कालापासून हा गण अस्तित्वात आहे पण त्याचे जीवाश्म विरळाच सापडतात.  गॉटलंड व ब्रिटनमधील सिल्युरियन कालीन खडकांत पॅलिओफोनस व उत्तर अमेरिकेतील त्याच कल्पाच्या खडकांत इओस्कॉर्पियस व इतर दोन गोत्रांचे विंचू सापडलेले आहेत. पॅलिओफोनसाचे जीवाश्म सागरी प्राण्यांच्या जीवाश्मांबरोबर आढळतात व ते पाण्यात राहात असावेत पण इतर सर्व

गोत्रे जमिनीवर राहात. पॅलिओफोनसाचे शरीरही नंतरच्या विंचवाच्या मानाने काही बाबतीत आद्य होते.  पॅलिओफोनस हा यूरिप्टेरिडा व स्कॉर्पिओनिडा यांना सांधणारा दुवा आहे, असे कित्येकांचे मत आहे. कार्‌बॉनिफेरस कल्पातील इओब्यूथस यासारखी काही गोत्रे आजच्या गोत्रांहून भिन्न होती, पण अँथ्रॅकोस्कॉर्पिओसारखी विशेषशी वेगळी नव्हती. विंचवांची आजची बहुतेक गोत्रे कार्‌बॉनिफेरस  कालातील एका गटापासून अवतरलेली आहेत.

पेडिपॅल्पी गण : दगडी कोळसा असणाऱ्या कार्‌बॉनिफेरस कालीन थरांत तीन गोत्रांचे व तृतीय कल्पाच्या थरांत एका गोत्राचे जीवाश्म आढळलेले आहेत.

अ‍ॅरॅनेइडा गण : कोळ्यांचा गण. दगडी कोळसा असलेल्या कार्‌बॉनिफेरस कालीन खडकांत काही गोत्रांचे जीवाश्म मिळालेले आहेत.  त्यानंतरच्या व इओसीन कालापर्यंतच्या थरांत ते अती विरळाच आढळतात.  बाल्टिक प्रदेशातील विशेषतः प्रशियातील खनिज अंबरात त्यांचे विपुल, दीडशेहून अधिक जातींचे, अवशेष आढळलेले आहेत. वायोमिंगच्या इओसीन कालीन थरांत व कोलोरॅडोतील फ्लोरोसेंट शेल नावाच्या खडकात कोळ्यांचे अनेक जीवाश्म आढळलेले आहेत.

स्यूडोस्कॉर्पिओनिडा (चेर्नेटिडिआ) गण : ऑलिगोसीन कालीन अंबरात चेलिफर, चेर्निस यांसारख्या विद्यमान गोत्रांचे जीवाश्म सापडतात.

फॅलँजिडा (ऑपिलिओनिना) गण : यांच्या काही गोत्रांचे जीवाश्म ऑलिगोसीन अंबरात सापडतात.  कारबॉनिफेरस कालातील काही जीवाश्म या गणातले असावेत.

अ‍ॅकॅरिना गण : र्‍हायनी चर्ट नावाच्या डेव्होनियन कालीन खडकांत प्रोटॅकॅरस या जातीच्या प्राण्याचे जीवाश्म सापडलेले आहेत. ऑलिगोसीन अंबरात व तृतीय कल्पातल्या इतर कित्येक थरांत कित्येक विद्यमान गोत्रांचे जीवाश्म आढळतात.

अँथ्रॅकोमार्टी गण : एक गतकालीन गण.  डेव्होनियन कालीन र्‍हायनी चर्टात व कार्‌बोनिफेरस कालातील काही खडकांत अँथ्रॅकोमार्टस, अँथ्रॅकोसिरो इ. काही गोत्रांचे जीवाश्म मिळालेले आहेत.  पेडिपॅल्पी व फॅलँजिडा यांच्याशी हा गण संबद्ध असावा.

संदर्भ:    1. Beerbower,  J. R. Search for the Past: An Introduction to Paleontology, New Delhi, 1965.

2.  Borradaile,  L. A.; Potts, F.A. The Invertebrata, Bombay, 1962.

3. Easton,  W. H.  Invertebrate Paleontology, New York, 1960.

4. Harmer,  S. F.; Shipley, A.E.Eds.The Cambridge Natural History, Vols.IV, V and VI, Codicote, 1968.

लेखक : प्र. त्र्यं. मुठे क., वा. केळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate