'पक्षी हा पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असून, पर्यावरण संतुलनामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते. पक्षी व त्यांचा अधिवास, त्यांची संख्या, त्यांना असणारे संभाव्य धोके, भूभागावरील त्यांचा विस्तार, त्यांचे स्थलांतर, बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे होणारे पक्ष्यांसंदर्भातील बदल, पक्षी प्रजातींवर बदलत्या जगाचा व मानवी विकासाचा होणारा नेमका परिणाम यांबाबतीतले अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एक व्यक्ती, संशोधक, संस्था किंवा कालबद्ध प्रकल्प यांपैकी एखादाच घटक पुरेसा नसून त्यासाठी लोकविज्ञान (सिटीझन सायन्स - वेगवेगळ्या भागांतील नागरिकांच्या साहाय्याने एखादी माहिती गोळा करण्याची शास्त्रीय पद्धत) हे एक उत्तर आहे'
जगाच्या पाठीवर ‘जैवविविधता-संपन्न देश’ म्हणून मान्यता पावलेल्या आपल्या भारतातील पक्षिवैविध्यही इतर देशांच्या तुलनेत अधिक संपन्न आहे. जगभरात पक्ष्यांच्या साडेदहा हजारांहून अधिक प्रजाती असून त्यांपैकी १२ टक्के म्हणजेच जवळपास तेराशे पक्षिप्रजाती भारतात आढळून येतात. त्यांमध्ये हिमालयापासून भारतातील विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये व पुढे थेट समुद्रकिनार्यापर्यंत ही विविधता आढळून येते. यांमध्ये अनेक स्थानिक प्रजातींसह विविध काळात व विशेषकरून हिवाळ्याच्या दरम्यान विदेशातून स्थलांतर करून येणार्या पक्ष्यांची संख्याही भरपूर आहे; म्हणूनच भारतात अलीकडे पक्षी छायाचित्रण, पक्षिअभ्यास, पक्षिपर्यटन, पक्षिसंवर्धन, संकटग्रस्त पक्षी हे विषय चर्चिले जाऊ लागले आहेत.
‘पक्षिनिरीक्षण’ हा तसा आनंददायी छंद आहे. वेळ मिळेल तसे किंवा वेळ काढून तलावांवर, माळरानांवर किंवा जंगलात फिरणे, तिथले पक्षी पाहणे, त्यांची ओळख पटवणे, नोंदी घेणे, नवनवीन ठिकाणी जाऊन नवीन प्रजाती शोधणे, आपल्याकडील पक्ष्यांच्या यादीत भर टाकत राहणे आणि त्यांतून आनंद घेत राहणे म्हणजे ‘पक्षिनिरीक्षण’. पक्षिनिरीक्षण व पक्ष्यांचा अभ्यास, त्यांच्याविषयी असलेले आकर्षण हे भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून असल्याचे आढळून आलेले असले; तरी आधुनिक काळात मात्र पक्षिनिरीक्षणाचा छंद आपल्या परंपरेचा भाग राहिला नाही. पक्षिनिरीक्षण व पक्षिअभ्यासशास्त्र आपल्या देशात आणले व रुजवले ते ब्रिटिशांनी. त्यानंतर आपल्याकडील काही मोजकी मंडळी या छंदाकडे वळू लागली आहेत; परंतु अगदी अलीकडील काळापर्यंत ही संख्या फारच नगण्य होती. एका मोठ्या गावात फार तर दोनचार पक्षिनिरीक्षक असायचे. या सार्यांकडे मिळून असलीच, तर कुठूनतरी ओळखीच्या माध्यमातून मागवलेली एखादी दुर्बीण अन् त्या काळात पक्षी ओळखण्यासाठी एकमेव आधार असलेले डॉ. सलीम अली यांचे सचित्र पुस्तक इतकीच काय ती सामूहिक सामग्री. त्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाची स्वतंत्र पक्षीनोंदवही. काहींच्या या नोंदवहीत प्रत्येक वेळी केलेल्या नोंदी अगदी संख्या व गरज पडल्यास रेखाटनासह लिहिलेल्या असायच्या. या नोंदी म्हणजे पक्षिअभ्यासाचा महत्त्वपूर्ण खजिनाच! याच नोंदींच्या आधारे मग काही जण तलावांची चेकलिस्ट (तलावांची निकषयादी / पडताळणी सूची) तयार करायचे, काही जण ही माहिती शास्त्रीय नियतकालिकांमधून किंवा लेखाच्या रूपाने मासिकांमधून किंवा स्मरणिकांमधून प्रकाशित करायचे. काही ठिकाणी सामूहिक प्रयत्नांतून जिल्ह्याच्या पक्षिसूची प्रकाशित केल्या गेल्यात; मात्र अशा प्रकारची प्रकाशने फारच कमी उपलब्ध असल्याचे दिसून येते. खरी गोष्ट म्हणजे त्या काळात प्रकाशनाच्या साधनांची व संधींचीसुद्धा कमतरता होती; म्हणजेच काय, तर पूर्वीच्या काळात वैयक्तिक नोंदवहीत केल्या गेलेल्या जास्तीतजास्त नोंदी त्या वहीतच पडून राहिल्या असल्याचे दिसून आले. अर्थात, त्या काळात अशा नोंदी किंवा पक्षिअभ्यास या गोष्टी झाल्या, त्या फारच कमी ठिकाणी. तसेच जो काही पक्षिअभ्यास झाला असेल, त्याला ठरावीक शास्त्रीय पद्धतीचा आधार होताच असे नाही. त्यामुळे पूर्वीची परिस्थिती काय होती, पक्षिसंख्या कशी होती, कुठल्या प्रजाती होत्या, अशा प्रकारची कुठलीही मूलभूत माहिती (आत्ताच्या माहितीशी तुलना करण्यासाठी आवश्यक असणारी अगोदरची मूलभूत माहिती) आपल्या देशात उपलब्ध नाही. परिणामी, आपण आज होणारे बदल नेमकेपणाने व तुलनात्मक पद्धतीने मांडू शकत नाही. अमुक पक्ष्यांची संख्या वाढली, तर तमुक पक्ष्यांची संख्या घटली; अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये अधूनमधून वाचायला मिळत असतात. ह्या बातम्या बहुधा चिमणी-कावळा अशा स्थानिक व सामान्य प्रजातींबद्दल किंवा कधी एखाद्या तलावावर येणार्या स्थलांतरित पक्ष्यांबद्दल असतात. बहुतेक वेळा ही निरीक्षणे वैयक्तिक मतांवर आधारलेली असतात. त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नसतो.
भारतातील पक्षिनिरीक्षणाबाबतची सद्यःस्थिती
युरोपमध्ये पक्षिनिरीक्षण हा एक नियमित व अनेकांच्या आवडीचा छंद असून तो त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग बनला आहे. भारतात आजही पक्षिनिरीक्षण करणार्यांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 0.1 टक्क्यापेक्षाही कमी असून त्यातही शास्त्रीय पद्धतीने नोंदी करून त्याचे दस्तऐवजीकरण करणार्यांची संख्या तर अगदी नगण्य आहे. आपल्या देशातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती; आवश्यक त्या साधनांची कमतरता आणि माहितीचा व जनजागृतीचा अभाव अशी अनेक कारणे यामागे असली; तरी कुठल्याही गोष्टीची नोंद करून न ठेवण्याची, डायरी/आठवणी न लिहिण्याची आपली पिढीजात सवय हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते.
विसाव्या शतकाच्या सरत्या टप्प्यात आपल्या देशात चांगले कॅमेरे, चांगल्या लेन्सेस व दुर्बिणी अशा वस्तू दिसू लागल्या, परंतु त्यांच्या किमती काळाच्या मानाने फारच अवाढव्य असल्याने अगदी मोजक्या लोकांपर्यंतच ही सामग्री पोहोचली. त्यातही रोलचा व छपाईचा खर्चही फार असायचा. अशा पार्श्वभूमीवर तेव्हाच्या छायाचित्रांना काय भाव असायचा! रोल धुवून आणल्यावर सार्यांनी एकत्र बसून फोटो बघण्याचा कार्यक्रमच व्हायचा. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली. देशातील उंचावलेला आर्थिक स्तर व सर्वांना परवडण्याजोगे झालेले तंत्रज्ञान यांमुळे अनेकांकडे विविध प्रकारचे कॅमेर्यांबरोबरच नानाविध प्रकारच्या दुर्बिणीही आल्या आहेत. वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पक्ष्यांवरची उत्कृष्ट अशी सहज उपलब्ध होणारी सचित्र पुस्तके (Field Guides) आली आहेत. पूर्वी ठरावीक वर्गांपुरती उपलब्ध असलेली भटकंतीची साधने आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे जंगलात फिरणार्यांची व वन्यजीव छायाचित्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषतः पक्षी छायाचित्रकारांची संख्या तर खूपच वाढली. त्यात गेल्या पाच वर्षांत झालेला माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार (Spread of information Technology) व त्याद्वारे सहज उपलब्ध होणारी माहिती व प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी मिळालेली संधी उपलब्ध करून देणारी समाजमाध्यमे (Facebook / Whats-app) यांमुळे पुन्हा वन्यजीव व पक्षी छायाचित्रण यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या सार्यांमुळे पक्षिअभ्यासासाठी व नोंदणीसाठी झालेला फायदा म्हणजे पक्षिनिरीक्षकांची संख्या देशाच्या कानाकोपर्यापर्यंत वाढून जास्तीतजास्त भागांत पक्ष्यांवर लक्ष (Monitoring) ठेवले जाऊ लागले. फोटोंच्या माध्यमातून नोंदींचे ठोस पुरावे (Photo Documentation) उपलब्ध होऊन नवनवीन नोंदींमुळे प्रजाती विस्ताराबाबतचे नकाशे (Distribution Maps) आणखी स्पष्ट होऊ लागले आहेत.
या सार्या नवीन घडामोडींमुळे फायद्याप्रमाणेच काही तोटेसुद्धा झालेत. दुर्बिणीच्या साहाय्याने केले जाणारे सूक्ष्म निरीक्षण आजकाल कुणी करतच नाही. अनेक जण नुसता चांगला फोटो व नवीन काहीतरी भेटलं पाहिजे एवढ्यावरच लक्ष ठेवून असतात. अनेकांच्या दुर्बिणी आज वापरल्या जात नाहीत, तर नवीन मंडळी हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या कॅमेरासंचासोबत दुर्बीण घेतसुद्धा नाहीत. डायरीमध्ये नोंदी करणे वगैरे तर दूरची गोष्ट. त्यामुळे ज्या प्रमाणात कॅमेर्याची व छायाचित्रकारांची संख्या वाढली, त्या प्रमाणात भारतातून पक्ष्यांच्या नोंदींच्या प्रमाणात व अभ्यासात वाढ झाली नाही.
पक्षिअभ्यासाचे व नोंदणीचे महत्त्व
पक्षी हा पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असून पर्यावरण संतुलनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. पक्षी व त्यांचा अधिवास, त्यांची संख्या, त्यांना असणारे संभाव्य धोके, भूभागावरील त्यांचा विस्तार, त्यांचे स्थलांतर, बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे होणारे पक्ष्यांसंदर्भातील बदल, बदलत्या जगाचा व मानवी विकासाचा पक्षिप्रजातींवर होणारा नेमका परिणाम यांबाबत आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखादी व्यक्ती, संशोधक, संस्था किंवा कालबद्ध प्रकल्प पुरेसा नसून यासाठी लोकविज्ञान (सिटीझन सायन्स - वेगवेगळ्या भागांतील नागरिकांच्या साहाय्याने एखादी माहिती गोळा करण्याची शास्त्रीय पद्धत) हे एक उत्तर आहे. पक्ष्यांच्या नोंदणीसाठी व अभ्यासासाठी लोकविज्ञानाचा वापर करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज विविध ठिकाणी केला जात आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराबाबत आज जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यापैकी जास्तीतजास्त माहिती आज लोकविज्ञानामधूनच मिळालेली आहे.
पक्षिअभ्यास व नोंदणी करण्यासाठी जगभरात आज माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. युरोपात वापरली जाणार्या साधनांबरोबरच तिथल्या पद्धती आणि तिथलं तंत्रज्ञान या गोष्टीही आज सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत. जगभरातील विविध भागांत अनेकांनी सातत्याने पक्षिनिरीक्षण करून त्या नोंदी संकेतस्थळांमार्फत गोळा करण्यासाठी राबवले जाणारे Great Backyard Bird Count (GBBC), पाणपक्षी गणना यांसारखे अनेक कार्यक्रम भारतातसुद्धा Bird Count India, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.), महाराष्ट्र पक्षिमित्र अशा संस्थांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. GBBCसारख्या कार्यक्रमांमध्ये पक्षिनिरीक्षकांनी आपल्या भागात अगदी आपल्या घराच्या अंगणातल्या, शेतातल्या, जंगलातल्या अशा कुठल्याही पक्ष्यांच्या नोंदी करून त्या e-Bird या संकेतस्थळावर नोंदवायच्या असतात. यामधून जगाच्या कानाकोपर्यातील पक्षिप्रजातींच्या नोंदी होऊन प्रजातींचा भौगोलिक विस्तार, त्यांची संख्या, कमीजास्त होणारी संख्या (Trend) अशा अनेक गोष्टी कळत असतात.
ई-बर्ड (e-Bird)
हे संकेतस्थळ एकाच वेळी संपूर्ण जगातील पक्षिनोंदणीसाठी उपयुक्त असे साधन असून यावर जगातील कोणीही, कुठल्याही ठिकाणच्या व कोणत्याही पक्ष्यांची नोंद स्थळानुसार, काळासह व वेळेसह आपल्या स्वतःच्या नावानिशी संकेतस्थळावर टाकू शकतो. यामध्ये आपण नोंदवलेली माहिती सर्वांच्या उपयोगी पडू शकते व विशेष म्हणजे आपली स्वतःची सखोल अशी लाइफलिस्ट (आयुष्यभरात पाहिलेल्या पक्ष्यांची यादी) तयार होऊन पक्ष्यांविषयीच्या आपल्या सर्व सूच्या नेहमीसाठी ऑनलाईन जतन केल्या जातात. आज या संकेतस्थळावर दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक, तामीळनाडू; व मध्य भारतातून गुजरात व महाराष्ट्र या राज्यांमधून; बर्यापैकी नोंदी केल्या जात असतात, मात्र इतर राज्यांमधून आज नगण्य असा प्रतिसाद आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधून चांगला प्रतिसाद असतो; तर इतर जिल्हे या दृष्टीकोनातून मागासलेले दिसतात. जास्तीतजास्त पक्षिनिरीक्षकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी Bird Count Indiaच्या साहाय्याने ‘बॉम्बे नचरल हिस्ट्री सोसायटी’ (BNHS), महाराष्ट्र पक्षिमित्र आदी संस्थांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत.
सामान्य पक्षिगणना (Common Bird Monitoring Program - CBMP)
हिवाळ्याच्या दरम्यान स्थलांतर करून पाणवठ्यावर येणारे पक्षी व जंगलात असणारे पक्षी यांच्या बर्यापैकी नोंदी होत असतात. त्यांच्या पक्षिसूचीसुद्धा उपलब्ध असतात; मात्र गावांत/शहरांत आढळणारे, गावाभोवतालचे, शेतात सापडणारे अनेक सामान्य पक्षी कुणी सहसा बघत नाही, त्यांच्या नोंदीसुद्धा होत नाहीत. त्यामुळे हे पक्षी कमी होत आहेत की वाढत आहेत हे आपण आजही सांगू शकत नाही. चिमण्या कमी झाल्यात का, कमी झाल्या असतील तर कशामुळे, अशा प्रश्नांची उत्तरे आजही आपल्याजवळ नाहीत. यासाठी BNHS संस्थेने स्थानिक पक्षिअभ्यासकांच्या व संस्थांच्या मदतीने ‘सामान्य पक्षी गणना’ हा कार्यक्रम सर्व देशभर सुरू केला असून या कार्यक्रमामध्ये अगदी शास्त्रीय पद्धतीने दोन चौरस किलोमीटर ग्रीडवर प्रत्येक ऋतूमधील पक्ष्यांची नोंद करून ही माहिती BNHS कडे पाठवावी लागते. तिथे या माहितीचे जतन केले जाणार असून या माहितीतून भविष्यात सामान्य पक्ष्यांच्या ट्रेंडबाबत माहिती मिळू शकणार आहे.
भारतातील ही संपन्न अशी पक्षिविविधता टिकवून ठेवायची असेल, तर सर्वप्रथम आपल्याकडे असलेली विविधता शोधणे, त्याची नोंदणी होणे गरजेचे आहे; त्यानंतर आपल्याला त्यांची कमीजास्त होणारी संख्या व पर्यायाने त्यांना व त्यांच्या अधिवासाला निर्माण होणारे धोके इत्यादी माहिती कळणे गरजेचे असते. अशा माहितीच्या उपलब्धतेनंतरच आपण त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने अशा नोंदणीमध्ये सहभागी होऊन शास्त्रीय माहितीसह संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
लेखक: डॉ. जयंत वडतकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र्र राज्य, (लेखक अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आहेत.)
संपर्क: 9822875773
माहिती स्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 4/26/2020
उल्का वर्षावाचे निरीक्षण करण्यासंबंधी माहिती
पक्षिनिरीक्षण - एक राजयोग, अनुभव व निरीक्षण.
अवकाश निरीक्षणाची नोंद करण्यासाठी आवश्यक गोष्टी.
रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त...