অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ढेकूण

ढेकूण

ढेकूण

या निशाचर व रक्तशोषक कीटकाचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या सायमिसिडी कुलात करतात. याची सायमेक्स लेक्ट्युलॅरियस ही जाती उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. सा. रोटुंडेटस ही जाती द. आशियात व आफ्रिकेत विशेष आढळते. ढेकूण मानवाखेरीज उंदीर, ससे, गिनीपिग, घोडे, गुरे व कोंबड्या यांना उपद्रव देतो. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी, लांबट वर्तुळाकार, पसरट, ४–५ मिमी. लांब व वरवर पहाता पंखहीन असून त्याच्या सर्व अंगावर आखूड व दाट केस असतात. अगदी कमी वाढ झालेली, खवल्यांसारखी पंखांची पहिली जोडी फारच अस्पष्ट आणि अकार्यक्षम असते. ढेकणाला येणारा विशिष्ट अप्रिय वास हा त्याच्या गंध ग्रंथींतून निघालेल्या स्रावामुळे येतो. अशा ग्रंथी हेमिप्टेरा गणाचे वैशिष्ट्य आहे.

नराचे उदर बरेच टोकदार असते व त्याच्या शेवटी आठव्या खंडाच्या (भागाच्या) डाव्या बाजूच्या खोल खाचेत मोठे वाकडे शिश्न असते. मादीच्या चौथ्या (किंवा पाचव्या) उदरखंडावर उजव्या बाजूला मैथुनकोष्ठ (पिशवी) असतो. याला रिबागा इंद्रिय (रिबागा या शास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. याच्या पलीकडे कोशिकीय (पेशीय) ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) पुंजका असतो, त्याला बर्लेस इंद्रिय (आंतान्यो बर्लेस या इटालियन कीटकवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. मैथुनाच्या वेळी नर रिबागा इंद्रियात शुक्राणू सोडतो व तेथून ते बर्लेस इंद्रियातून जाऊन जननमार्गात पोहोचतात.

ढेकूण (सायमेक्स लेक्ट्युलॅरियस).

अनुकूल परिस्थितीत सु. २१° से. तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३–४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १०° से. खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६–१७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४–६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.

दिवसा ढेकूण गाद्या, उश्या, कपाटे, फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत लपून बसतात. ते आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे,हॉटेले, सैन्याच्या बरॅकी इ. ठिकाणी विशेष आढळतात. रात्री तसेच दिवसाही अंधाराच्या जागी ते माणसाला उपद्रव देतात. माणसाचे रक्त शोषून घेतल्यावर ते आपल्या लपण्याच्या जागेत जाऊन बसतात व अन्नपचन करतात. अन्नपचनासाठी त्यांना बरेच दिवस लागतात. ढेकूण अन्नाशिवाय तीन महिन्यांपर्यंत जगू शकतात.

माणसाचे तापमान व त्याच्या बसण्याचा दाब या दोन संकेतांनी ढेकूण लपलेल्या फटीतून बाहेर येऊन माणसाला चावा घेतो. चावण्यापूर्वी तो लाला ग्रंथींचा स्त्राव चावण्याच्या जागेवर सोडतो व नंतर आपल्या शुंडाने (सोंडेसारख्या अवयवाने) छिद्र करतो. स्त्रावामुळे छिद्र करण्याची वेदना जाणवत नाही व रक्त शोषताना ते गोठत नाही. ढेकणाच्या चाव्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. परंतु त्याच्या विषामुळे थोडीशी खाज सुटणे, आग होणे व गांधी येणे हे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींत कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. काही व्यक्तींत हे परिणाम एका आठवड्यापेक्षा जास्त काळही टिकतात. ढेकणामुळे विविध रोगांचा प्रसार होत असावा असे शास्त्रज्ञांना वाटते, परंतु अजून तसा सबळ पुरवा मिळालेला नाही.

ढेकणांच्या वसतिस्थानावर डीडीटी, क्लोरडान किंवा लिंडेन ही कीटकनाशके फवारून त्यांचा बंदोबस्त करता येतो. परंतु या कीटकनाशकांच्या फवारणीने ढेकूण मेले नाहीत; तर डायझिनॉन, मॅलॅथिऑन यांसारखी अधिक प्रभावी कीटकनाशके वापरावी लागतात [⟶ कीटकनाशके]. उकळते पाणी किंवा रॉकेल यांचा ढेकणांच्या अंड्यांवर परिणाम होत नाही.

 

जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate