অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जा संसाधने ( Energy resources )

ऊर्जा संसाधने ( Energy resources )

घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा ( उष्णता, प्रकाश किंवा वीज ) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, त्यांना ऊर्जा संसाधने म्हणतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळविणे, ऊर्जेचे उपयुक्त स्वरूपात रूपांतर करणे आणि ऊर्जेचा विविध कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहे. ऊर्जा वापराच्या क्षमतेनुसार राष्ट्राच्या प्रगतीची अवस्था ठरते.

भूकवचाखालील जीवाश्म इंधने आणि भूपृष्ठावरील जल, वायू, वनस्पती, सूर्यप्रकाश ही सर्व ऊर्जा संसाधने आहेत. ऊर्जा संसाधनाचे प्रामुख्याने दोन विभागांत वर्गीकरण केले जाते : (१) क्षयक्षम ऊर्जा संसाधने, (२) अक्षयक्षम ऊर्जा संसाधने. ज्या ऊर्जा संसाधनाच्या प्रमाणात त्याच्या वापरानंतर घट होते, ते क्षयक्षम ऊर्जा संसाधन. खनिज तेल, नैसर्गिक वायू, खनिज कोळसा ही जीवाश्म इंधने होत. औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेचा अधिकाधिक वापर होत आहे. भूपृष्ठात या ऊर्जेचे साठे उपलब्ध असले, तरी ते मर्यादित स्वरूपात आहेत. त्यांची निर्मिती होण्यास दीर्घकाळ लागतो. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. मानवी आयुष्याच्या कालावधीत या ऊर्जा संसाधनांची निर्मिती होऊ शकत नाही; म्हणून या ऊर्जा संसाधनास अनूतनीक्षम (नॉन-रिन्यूएबल) ऊर्जा संसाधन असेही म्हणतात.

ज्या ऊर्जा संसाधनांचा वापर केल्यानंतर घटलेला ऊर्जेचा साठा नैसर्गिकतेने भरून निघतो, त्यांना अक्षयक्षम ऊर्जा संसाधने म्हणतात. या ऊर्जा संसाधनांची पुनर्निर्मिती होऊ शकते, म्हणून त्यांना नूतनीक्षम (रिन्यूएबल) ऊर्जा संसाधनेही म्हणतात. निसर्गात या संसाधनांचे प्रमाण व्यावहारिक दृष्ट्या अमर्याद आहे. त्यांच्या नूतनीकरणास सापेक्षत: अल्प कालावधी लागतो. बहुतांशी अक्षयक्षम ऊर्जा संसाधनांच्या ऊर्जेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्त्रोत सूर्य आहे. त्यामुळे जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत ही ऊर्जा संसाधने कार्यक्षम राहतील. यात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा इ. संसाधनांचा समावेश होतो. ही ऊर्जा संसाधने संपुष्टात येत नसल्याने त्यांना ‘शाश्वत ऊर्जा संसाधने’ असेही म्हणतात. अन्न, लाकूड, पाणी व पिकांची अपशिष्टे ही इतर जैविक इंधनेसुध्दा नूतनीक्षम संसाधने आहेत. अशा जैविक इंधनांचा त्याच्या पुनर्निर्मितिक्षमतेपेक्षा अधिक वेगाने वापर केला, तर तेसुध्दा संपुष्टात येतील. या निसर्गनिर्मित ऊर्जा संसाधनांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास ते निरंतरपणे उपलब्ध होऊ शकतात.

ऊर्जा संसाधनाचे वर्गीकरण आणखी एका प्रकारे केले जाते : (१) पारंपरिक ऊर्जा संसाधने व (२) अपारंपरिक ऊर्जा संसाधने. सरपण, शेणाच्या गोवर्‍या, पेंढा हे पारंपरिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपरिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटांची ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. इंधनकोशिका, घन अपशिष्टे, हायड्रोजन इत्यादींचा समावेश अपारंपरिक ऊर्जा संसाधनांत होतो.

ऊर्जा संधारण

व्यक्तिगत, घरगुती, औद्योगिक, वाहतुकीची साधने इत्यादींसाठी ऊर्जेचा वापर घटविण्यासाठी केलेली उपाययोजना. ऊर्जा अधिक परिणामकारक रीतीने वापरणे व तिचा कमीतकमी अपव्यय करणे म्हणजे ऊर्जा संधारण. ऊर्जेचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजे ऊर्जानिर्मिती केल्यासारखेच आहे. ऊर्जानिर्मितीपेक्षा ऊर्जेची बचत करणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यामुळे ऊर्जेचे संधारण अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

ऊर्जेचे संधारण

(१) दिव्याची गरज नसताना ते बंद करणे, मोटारगाडी, मोटारसायकल यांचा शक्य असल्यास वापर टाळणे अथवा कमी करणे, पायी चालणे, सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणे, तसेच सायकलचा वापर करणे, फ्रीज नियमित साफ करणे इत्यादी.

(२) ऊर्जाक्षम साधनांचा उपयोग करणे :  कार्यक्षमरीत्या ऊर्जेचा वापर करणार्‍या साधनांमुळे तेवढेच काम करण्यासाठी कमी ऊर्जा वापरली जाते. उदा.,अन्न थेट शिजविण्यापेक्षा प्रेशर कुकर वापरणे.

(३) इमारतीची रचना योग्य असल्यास वातानुकूलनासाठी लागणार्‍या ऊर्जेची बचत होऊ शकते.

(४) औद्योगिक प्रक्रियेत निर्माण झालेली अपशिष्ट ऊर्जा पुन्हा वापरता येऊ शकते.

ऊर्जा संसाधने कोणतीही असली, तरी प्रत्येक ऊर्जा वापराचे पर्यावरणीय परिणाम लक्षणीय असतात. त्यासाठी ऊर्जा संधारण अत्यंत आवश्यक ठरलेले आहे. ऊर्जानिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांबाबत उद्योजक आणि पर्यावरणवादी यांच्या दृष्टिकोनात कमालीची भिन्नता आढळते. याबाबत समतोल ठेवून सामाजिक विकास व राष्ट्रहित यांसाठी दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा विचारात घेणे व त्यानुसार प्राधान्य ठरविणे गरजेचे झाले आहे.


मगर, जयकुमार

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate