অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रसूति-पूतिज्वर

प्रसवोत्तर काळात (प्रसूतीनंतर गर्भाशयाचे निवर्तन होईपर्यंत म्हणजे मूळचे आकानमान पुन्हा प्राप्त होईपर्यंतच्या काळात, सहा ते आठ आठवडे) ३८° से. किंवा जास्त तापमान चोवीस तास किंवा जास्त वेळ टिकून राहणाऱ्या, प्रसूतीनंतर किंवा गर्भस्रावानंतर (गर्भधारणेनंतर ३ ते ७ महिन्यांपर्यंतच्या काळात होणाऱ्या गर्भपातानंतर) चौदा दिवसांच्या आत उद्‌भवणाऱ्या, बहुतकरून जननमार्गाच्या सूक्ष्मजंतु-संक्रमणापासून होणाऱ्या ज्वराला ‘प्रसूति-पूतिज्वर’ किंवा ‘बाळंत रोग’ म्हणतात. इंग्लंड व वेल्समधील ‘प्युएरपेरल पायरेक्सिया रेग्युलेशन्स, १९५१’ या कायद्यावर आधारित अशी वरील व्याख्या भारतात आजही उपयोगात आहे. तिकडे हा रोग ‘अधिसूचनीय’ म्हणजे रोग्याची माहिती योग्य त्या आरोग्याधिकाऱ्यास कळविण्याचे वैद्यकीय व्यावसायिकांवर बंधन आहे. पाश्चात्य वैद्यकातील ⇨ रासायनी चिकित्सेच्या उपयोगानंतर या रोगाचे प्रमाण बरेच घटले आहे. गर्भारपण व प्रसूती यांत स्त्रियांच्या संख्येपेक्षा प्रसवोत्तर काळात अधिक स्त्रिया मृत्यू पावतात.

प्रसवोत्तर काळात ज्वर येण्याची पुढील कारणे आहेत

(१) प्रसूति-पूतिता : जननमार्गाच्या जखमांचे सूक्ष्मजंतु-संक्रामण;

(२) मूत्रमार्ग जंतु-संक्रामण

(अ) मूत्राशय शोथ (मूत्राशयाची दाहयुक्त सूज),

(आ) मूत्रद्रोण-वृक्क शोथ (मूत्रनलिकेचा श्रोणितील–ओटीपोटातील–भाग व मूत्रपिंड यांची दाहयुक्त सूज);

(३) स्तनांचे जंतुसंक्रामण;

(४) मध्योद्‌भवी जंतु-संक्रामण : मध्येच उद्‌भवणारे (अशक्तपणा, रक्तक्षय यांसारखा आजार चालू असताना सुरु होणारे) तीव्र श्वासनलिका शोथ, ⇨ न्यूमोनिया, क्षय वगैरे रोग;

(५) वेदनायुक्त श्वेत शोथ : पायातील मोठ्या नीलेच्या शोथामुळे उद्‌भवणारी सूज.

प्रस्तुत नोंदीत फक्त जननमार्गाच्या सूक्ष्मजंतू-संक्रामणजन्य विकृतीची माहिती दिली आहे.

इतिहास

या विकृतीविषयी फार प्राचीन काळापासून माहिती असावी. सुश्रुत व वाग्भट या आयुर्वेदाचार्यांनी तिचा ‘सूतिका रोग’ असा उल्लेख केला आहे. सुखप्रसूतीनंतर कधीकधी व कष्ट प्रसूतीनंतर पुष्कळ वेळा हा रोग संभवतो, असे त्यांनी नमूद केले आहे. हिपॉक्राटीझ (इ. स. पू. सु. ४६०–३७५) या प्राचीन ग्रीक वैद्यांनी या रोगाचे वर्णन केले आहे. १७९५ मध्ये स्कॉटलंडमधील ॲलेक्झांडर गार्डन यांनी लिहिलेल्या ट्रिटाइज ऑन द एपिडेमिक प्युएरपेरल फीव्हर ऑफ ॲबरडीन या पुस्तकात या रोगाच्या कारणाविषयी आधुनिक विचारांशी जुळणारे विचार प्रथम मांडले. ‘हवेतील अनिष्टकारक घटकांमुळे’ हा रोग होतो, हा त्यांच्या काळातील गैरसमज घालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा रोग एका रोग्याकडून दुसऱ्याकडे तपासणाऱ्या किंवा प्रसूती करणाऱ्या सुईणी वाहून नेतात व तो सांसर्गिक असल्याचा भरपूर पुरावा मिळाला आहे. या गार्डन यांच्या विधानामुळे सुईणी संतापल्या व गार्डन अप्रिय झाले. १८४३ मध्ये ओ. डब्ल्यू. होम्स यांनी अमेरिकेत आणि आय्. पी. सिमेलव्हाईस यांनी व्हिएन्ना येथे याच रोगासंबंधी स्वतंत्रपणे काही विचार मांडले [⟶ जंतुनाशके ; पूतिरोधके]. लूई पाश्चर यांनी १८७९ मध्ये हा रोग सूक्ष्मजंतूजन्य असल्याचे दाखवून दिले.

संप्राप्ती

रोगकारणांचा विचार पुढील तीन विभागांत विभागता येतो :

(अ) संक्रामक सूक्ष्मजंतूंचे प्रकार,

(आ) संक्रामणाचे मूळ आणि

(इ) प्रवृत्तिकर कारणे.

संक्रामक सूक्ष्मजंतूंचे प्रकार

यांचे पुढील तीन प्रकार आहेत

(1) ऑक्सिजीवी : (जगण्यासाठी व वाढ होण्यासाठी ज्यांना मुक्त ऑक्सिजन आवश्यक असतो असे) हीमोलिटिक स्ट्रेप्टोकोकाय ग्रेड ए (रक्तातील तांबड्या पेशींतील हीमोग्लोबिन हे रंगद्रव्य अलग करू शकणारे स्ट्रेप्टोकोकाय सूक्ष्मजंतू).

(२) अनॉक्सिजीवी : स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, एश्चेरिकिया कोलाय.

(३) विशिष्ट सूक्ष्मजंतू : नायसरिया गोनोऱ्हिया [परम्याचे सूक्ष्मजंतू; ⟶ परमा], क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय [वायुकोथाचे सूक्ष्मजंतू; ⟶ कोथ],क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी [धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू; ⟶ धनुर्वात]. वरील प्रकारांपैकी कोणताही एक किंवा अधिक सूक्ष्मजंतू मिळून रोग उत्पन्न होतो.

संक्रामणाचे मूळ

(१) अंतर्जात,

(२) आत्मजात अथवा

(३) बहिर्जात असू शकते.

(१) अंतर्जात संक्रामण अनॉक्सिजीवी स्ट्रेप्टोकोकायमुळे होते. योनिमार्गात हे सूक्ष्मजंतू असतात व बहुसंख्य वेळा या रोगास कारणीभूत असतात.

(२) आत्मजात संक्रामणामध्ये शरीराच्या इतर भागांतील सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहातून वाहत जाऊन जननमार्गात वाढून रोग उत्पन्न करतात. उदा., पायोरिया या हिरड्यांच्या रोगाचे सूक्ष्मजंतू किंवा केसतूट या रोगाचे सूक्ष्मजंतू. बहुतकरून स्ट्रेप्टोकॉकस हीमोलिटिकस व क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय हे सूक्ष्मजंतू अशा प्रकारच्या संक्रामणास कारणीभूत असतात.

(३) बहिर्जात संक्रामणास स्ट्रेप्टोकोकाय व स्टॅफिलोकोकाय कारणीभूत असतात. बिंदुक संक्रामण (दूषित व्यक्तीच्या नाक व घसा या भागातील सूक्ष्मजंतू खोकल्याच्या उबळीबरोबर बाहेर पडणाऱ्या असंख्य बारीक थेंबांतून जवळच्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शिरणे), रोग्यांनी वापरलेल्या वस्तू, रोग्यांची योनिमार्ग तपासणी इ. गोष्टी बहिर्जात संक्रामणास कारणीभूत होतात.

प्रवृत्तिकर कारण

(१) वय, सर्वसाधारण आरोग्य, थकवा वगैरेंवर रोग्याची प्रतिकारशक्ती अवलंबून असते.

(२) स्थानीय प्रतिकारशक्ती योनिमार्गातील स्रावाच्या पीएच मूल्यावर [⟶ पीएच मूल्य] अवलंबून असते. [⟶ प्रदर].

प्रथमगर्भा स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचे (मानेसारख्या भागाचे) तोंड श्लेष्मस्रावाच्या (बुळबुळीत स्रावाच्या) बुचासारख्या गोळ्यामुळे बंद असते. त्यामुळे सूक्ष्मजंतूंचा गर्भाशयात प्रवेश होत नाही. प्रसूतीच्या वेळी कळा सुरू होताच हा गोळा बाहेर फेकला जातो व सूक्ष्मजंतूंना आत शिरण्याची संधी मिळते. म्हणून दीर्घप्रसूतीत संक्रामणाचा धोका अधिक असतो.

(३) प्रसूतीचा प्रकार : प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रसूतीनंतर जननमार्गातील ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचे) विदारण जेव्हा अत्यल्प असते तेव्हा अंतर्जात संक्रामणाविरुद्ध संरक्षणात्मक योजना पुरेशा असतात. तरीदेखीलस्ट्रेप्टोकॉकस हीमोलिटिकस मारक पूतिता उत्पन्न करू शकतात. एवढेच नव्हे, तर ८०% ते ९०% मृत्यू या सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणामुळेच होत असत. कष्टप्रसूती किंवा दीर्घप्रसूती, प्रमाणापेक्षा जादा ऊतक इजा, जरूरीपेक्षा जास्त वेळा केली गेलेली योनिमार्ग तपासणी, संदंश (गर्भाच्या डोक्यास पकडावयाचा विशिष्ट चिमटा) लावून केलेली प्रसूती, मस्तक छेदन (विशिष्ट उपकरणांनी गर्भाच्या डोक्यास भोक पाडून त्याचे आकारमान लहान करावयाची शस्त्रक्रिया) आणि गर्भाशयात हात घालून वार बाहेर काढणे या सर्व गोष्टी सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणास मदत करतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate