অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गरोदरपणातील प्रसूतीपूर्व काळजी

गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते. गरोदरपणात काळजी घेण्याची प्रमुख उद्दिष्टे अशी >

आईला त्रास न होता गरोदरपण व बाळंतपण पार पाडणे. या काळात निरनिराळे आजार येऊ शकतात व आधी असलेले काही आजार बळावतात. हे आजार वेळीच ओळखून योग्य उपचार करणे,तसेच बाळंतपणातले धोके टाळून बाळंतपण शक्य तितके निर्धोक करणे.

- गरोदरपण, बाळंतपण, बाळाचे संगोपन, इत्यादींसंबंधी आवश्यक ती माहिती देऊन त्या दृष्टीने आईची तयारी करणे.

- जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे, अव्यंग व निरोगी असावे म्हणून काळजी घेणे.

गरोदरपणातली तपासणी कशासाठी

गरोदरपणात खालील दिशांनी तपासणी करायची असते (कार्डाचा नमुना पहा)

- गरोदर मातेस काही आजार, दोष आहेत काय?

- गर्भाची वाढ नीट होते की नाही?

- बाळंतपण सुखरुप होईल की नाही ?

तपासणी किती वेळा

- पहिल्या तिमाहीत निदान एकदा

- दुस-या तिमाहीत (म्हणजे चवथ्या, पाचव्या, सहाव्या महिन्यात) निदान महिन्याला एकदा, आणि

- (सातव्या महिन्यापासून पुढे) तिस-या तिमाहीत पंधरवडयाला एकदा.

महत्त्वाची माहिती

- आधी तिला आता काही त्रास होत असल्यास तो विचारा

- ही बाळंतपणाची कितवी खेप ते विचारा, शेवटचे बाळंतपण होऊन किती महिने किंवा वर्षे झाली ते विचारा.

- आधीच्या बाळंतपणात काही त्रास? खूप उशीर लागला असेल, दवाखान्यात नेऊन चिमटा लावून किंवा ऑपरेशनने सुटका करावी लागली किंवा झटके आले होते काय? असा त्रास याही गरोदरपणात होऊ शकतो. याबद्दलची माहिती घ्या.

- आधीच्या मुलांमधल्या वयाचे अंतर किती, याची चौकशी करा. लवकर येणा-या बाळंतपणांमध्ये आईला रक्तपांढरी होण्याची किंवा चुना कमी पडून हाडे दुखरी होण्याची शक्यता जास्त असते.

- या आधी अपु-या दिवसांचे बाळंतपण झाले आहे किंवा दुस-या तिमाहीत गर्भपात झाला आहे का, हे विचारा. या दोन्ही गोष्टी पुन्हा होऊ शकतात. पुन्हापुन्हा होणा-या गर्भपाताची अनेक कारणे संभवतात. गुप्तरोग, मातेचा रक्तगट ऋण व पित्याचा धन असणे, गर्भाशयाचे तोंड मोठे असणे, इत्यादी अनेक कारणे संभवतात. यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक आहे. गर्भाशयाचे तोंड सैल असेल तर गर्भाशयाच्या तोंडाला योग्यवेळी टाका घातल्याने गर्भपात टळू शकतो.

- शेवटी आलेल्या पाळीची तारीख विचारून घ्या. त्यावरून बाळंतपणाची अंदाजे तारीख काढता येईल.

- याआधीच्या गर्भारपणी धनुर्वाताची लस टोचून घेतली होती का? मागील खेपेस (पाच वर्षात) धनुर्वाताची दोन इंजेक्शने झाली असली तर या गर्भारपणात एकच फेरडोस द्यावा लागतो. तसे नसल्यास एक ते दोन महिने अंतराने दोन इंजेक्शने द्यावी लागतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात ती मोफत मिळतात.

- इतर काही आजार आहेत काय? (क्षयरोग, रक्तपांढरी, कावीळ, मधुमेह, इ.) अंगावर जखमा, गुप्तरोग, हृदयविकार, रक्तदाब, दमा, पोटाचे आजार, इत्यादींबद्दल मातेला प्रश्न विचारून माहिती घ्यावी. आवश्यक ती तपासणी करावी.

सर्वसाधारण तपासणी

- कुपोषण : रक्तपांढरी, रातांधळेपणा, तोंड येणे यांपैकी काही त्रास आहे का ते बघा. अपु-या व निकृष्ट अन्नामुळे असे त्रास होऊ शकतात. यासाठी अनुक्रमे लोहद्रव्याच्या गोळया, गरज असल्यास 'अ' जीवनसत्त्वाचे डोस व 'ब'जीवनसत्त्वाच्या गोळया द्याव्यात. डाळी, भाजीपाला, फळे, मासे व मांस या सर्व गोष्टींचा आहारात समावेश असल्याचे फायदे समजावून सांगा.

- वजन: संपूर्ण नऊ महिन्यांत नऊ ते अकरा किलोंनी वजन वाढते. दुस-या व तिस-या तिमाहीत दरमहा सुमारे दीड किलो वजन वाढते. शेवटच्या महिन्यात अचानक जास्त वजन वाढणे धोकादायक आहे.

- उंची फार कमी (145से.मी.पेक्षा कमी) असल्यास बाळंतपणात त्रास होऊ शकतो. अशा स्त्रीचा जन्ममार्ग अरूंद असू शकतो.

- रक्तदाब: प्रत्येक भेटींमध्ये रक्तदाब मोजून त्याची नोंद ठेवावी. रक्तदाब वाढणे हे धोक्याचे लक्षण आहे.

- पायावर सूज आहे का ते तपासावे: घोटयाजवळ बोटाने दाबून 'खड्डा' राहत असल्यास सूज आहे असे समजावे. चेह-यावर सूज येणे जास्त धोकादायक चिन्ह आहे.

- दम लागणे, छातीत धडधड हा त्रास होतो का? नाडीचे ठोके मोजून ठेवा. नेहमीच्या तुलनेत नाडीचे ठोके वेगाने पडत असतील तर तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

गर्भतपासणी

- पहिल्या तिमाहीत गर्भाची वाढ समजण्यासाठी 'आतून' तपासणी आवश्यक असते.

- दुस-या तिमाहीपासून पोटावरून तपासणी करता येते. कारण चवथ्या महिन्यापासून गर्भाशय ओटीपोटावरून हाताला जाणवते.

- पाचव्या महिन्यापासून गर्भाची हालचाल जाणवते.

- सहाव्या महिन्यापासून गर्भाच्या हृदयाचे ठोके आवाजनळीने समजू शकतात.

- सातव्या महिन्यापासून गर्भाचे अवयव व स्थिती हाताने तपासून समजते.

- आतून तपासणी केल्यास गर्भाशयाचे तोंड आपल्या बोटाला लागते. त्याचा सैलपणा तपासणे आवश्यक आहे. हा सैलपणा (तोंड) वाढत असल्यास विशेषतः दुस-या तिमाहीत गर्भपात होण्याची शक्यता असते. अशा मातांना टाका घालण्याचा उपयोग होतो. तसेच अंतर्गत तपासणीत लिंगसांसर्गिक आजारांच्या काही खाणाखुणा आढळल्यास तज्ज्ञांकडे पाठवावे.

- गर्भाशय किती वाढले यावरून महिन्यांची कल्पना येते. महिन्याच्या अंदाजापेक्षा गर्भपिशवीचा आकार मोठा असेल तर पुढील शक्यता विचारात घ्या. जुळी मुले आहेत का ते पहा. यात दोन डोकी लागतात, जास्त हातपाय असल्याच्या खुणा दिसतात किंवा बाळाभोवती पाण्याच्या पिशवीत जास्त पाणी आहे का, याचा अंदाज घ्या. सोनोग्राफीमुळे हे निदान अगदी सोपे झाले आहे.

- आठ महिन्यांनंतर बाळाच्या हृदयाचे ठोके आवाजनळीने मोजा, बाळाचे डोके खाली असेल तर सर्वसाधारणपणे बेंबीच्या खाली एका बाजूला (म्हणजे बाळाची पाठ ज्या बाजूला आहे त्या बाजूला) ठोके ऐकू येतात. दर मिनिटास 120 पेक्षा कमी किंवा160 पेक्षा जास्त ठोके असतील तर बाळाच्या प्रकृतीत काही तरी दोष आहे असे समजावे व तज्ज्ञाकडे पाठवावे.

- 9 व्या महिन्यानंतर बाळाचे डोके खालच्या बाजूस असणे ही योग्य स्थिती. पण डोके वर किंवा कुशीत आडवे असेल तर बाळंतपण धोक्याचे होऊ शकते.

गर्भावस्थेत अनावश्यक औषधे नको

अनेक औषधांचा वाईट परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो. अनेक जणांना-कित्येक डॉक्टरांनाही याची पुरेशी माहिती नसते. सामान्य वापरातली अनेक औषधे गर्भावस्थेत धोकादायक ठरतात. सर्वसाधारण नियम म्हणजे पॅमाल व कोझाल सोडता पोटातून द्यायचे कोठलेही औषध गरोदरपणात अजिबात देऊ नये. विशेषतः पहिल्या तिमाहीत गर्भाचे अवयव तयार होत असल्याने जास्तच काळजी घेणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनमुळेही अपाय होतो असे निश्चित झाले आहे. क्ष-किरणही गर्भासाठी वाईट असल्याचे सिध्द झाले आहे. हे सर्व लक्षात घेऊन गरोदरपणात कोठल्याही आजारासाठी औषध देताना डॉक्टरांना दहा वेळा विचार करून ठरवावे लागते.

दुस-या व तिस-या तिमाहीतली तपासणी

दुस-या व तिस-या तिमाहीत गर्भ ओटीपोटात खालच्या भागात हाताला लागण्याइतका वाढलेला असतो. वाढलेले गर्भाशय हाताने चाचपल्यावर चांगले गोलसर व निबर लागते. सहा महिने पूर्ण झाल्यावर ते बेंबीपर्यंत वाढलेले असते.

सहा महिन्यांपर्यंत गर्भाचा जवळजवळ पूर्ण विकास झालेला असतो. सर्व अवयव, संस्था इंद्रिये नीट तयार झालेली असतात. इथून पुढे आता फक्त 'वाढ' व्हायची असते. हृदयाची क्रिया चालू झालेली असते. आवाजनळी गर्भाशयावर ठेवून ही धडधड स्पष्ट ऐकू येते. बाळ हातपाय हलवत असल्याने आतल्या आत गर्भ हलल्याचे आईला कळते. थोडा वेळ पोटावर हात ठेवल्यावर तपासणा-याला पण ही हालचाल कळू शकते.

गर्भाची पोटातली हालचाल व हृदयाची धडधड यावरून गर्भ सुरक्षित आहे की नाही हे समजते. एखादा गर्भ जेव्हा आतल्या आत मरतो तेव्हा या खुणा दिसत नाहीत, वाढ व्हायची थांबते. असा निर्जीव गर्भ काही काळानंतर सहसा आपोआप पडून जातो.

गर्भाची वाढ कशी पूर्ण होते हे आकृतीत दाखवले आहे. गरोदर माता महिन्यांचा हिशेब सांगते त्याप्रमाणे वाढ होते की नाही, हे त्यावरून पाहता येईल.

दुस-या व तिस-या तिमाहीत तपासणीबरोबरच धनुर्वात प्रतिबंधक लस दिली जाते (दरमहा एक, अशी दोन इंजेक्शने). रक्तपांढरी होऊ नये म्हणून अगोदरच लोहयुक्त गोळया द्याव्यात. तसेच सामान्य तक्रारींवर उपचार, सल्ला, इत्यादी द्यावा. धोक्याची लक्षणे असतील तर ती वेळीच ओळखून तशी काळजी घेणे आवश्यक आहे. आपण गरोदरपणातल्या सामान्य तक्रारी व उपचार पाहणारच आहोत.

खास तपासण्या

- लघवीची तपासणी करावी. लघवीत साखर किंवा प्रथिने असल्यास धोक्याचा संभव असतो. लघवीची तपासणी प्रत्येक तपासणीच्या भेटीच्या वेळी करावी हे चांगले.

- रक्तात रक्तद्रव्य पुरेसे आहे किंवा नाही हे तपासावे.

- रक्ताचा गट माहित करून घेतला पाहिजे. कारण माता ऋण रक्तगटाची व पिता धन रक्तगटाचा असेल तर गर्भावर (विशेषतः दुस-या वेळच्या गर्भावर) प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा प्रसंगी विशेष उपचार करावे लागतात. म्हणून रक्ताची एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे.

- रक्ताची 'व्ही.डी.आर.एल'- सिफिलिस तपासणी करावी लागते.

- रक्ताची एच.आय.व्ही / एड्ससाठी तपासणी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातच होते.

- टॉर्च टेस्ट काही स्त्रियांच्या बाबतीत करायचा सल्ला दिला जातो. यात टॉक्झोप्लाझ्मा,जर्मन गोवर, कांजिण्या व हार्पिस या चार विषाणू तापासाठी रक्ततपासणी केली जाते. हे चारही आजार गरोदरपणात घातक असतात.

- अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) या तपासणीची कधीकधी गरज पडते. ही तपासणी करायची किंवा नाही हे अर्थात डॉक्टरकडूनच ठरेल. पण ह्या तपासणीबद्दल थोडी माहिती असावी. गर्भाची जागा (गर्भाशयात किंवा अस्थानी), वारेची जागा, पिशवीच्या तोंडाची स्थिती, जुळे आहे का, काही प्रकारची व्यंगे, बाळाभोवतालचे पाणी,गर्भाशयातले दोष, इत्यादी अनेक गोष्टींची माहिती या तपासणीत मिळू शकते. यामुळे योग्यवेळी उपचार करणे सोपे होते. हल्ली शहरात प्रत्येक गरोदर स्त्रीची सोनोग्राफी तपासणी 3-4 वेळा तरी होते.

- मात्र क्ष-किरण तपासणी करणे गर्भाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, कारण क्ष-किरणांमुळे गर्भामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. गर्भावस्थेत क्ष-किरण तपासणी शक्यतो टाळावी.

आहार

पोषणाच्या प्रकरणात याविषयी जास्त माहिती आलेली आहे. गर्भवती मातेने पुरेसा चौरस आहार घेणे आवश्यक आहे. मातेचे आरोग्य व गर्भाची वाढ या दोन्हींसाठी योग्य पोषण महत्त्वाचे आहे.

 

गरोदरपणात विशेष व्यायाम शिकवावे लागतात. यामुळे कंबरदुखी टळते व बाळंतपण सोपे जाते.

शरीरसंबंध

काही वेळा लैंगिक शरीरसंबंधामुळे गर्भाशयास धक्का लागून गर्भपात होण्याची शक्यता असते. विशेषतः पहिल्या तीन चार महिन्यांत हा धोका जास्त असतो. म्हणून निदान या काळात शरीरसंबंध टाळणे चांगले. एकूणच रक्तस्रावाचा व जंतुदोषाचा धोक़ा (विशेषत: हर्पिस, सायटो-व्हायरस) टाळण्यासाठी या काळात लैंगिक संबंध टाळावा हे बरे.

धनुर्वात-लस, लोहगोळया आणि कॅल्शियम

धनुर्वात लस : बाळ-बाळंतिणीला धनुर्वात होऊ नये म्हणून धनुर्वात-लसीचे डोस द्यावेत. गर्भधारणा झाली आहे असे कळल्यानंतर हे डोस लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. पहिल्या डोसनंतर चार-सहा आठवडयात दुसरा डोस द्यावा.

लोहगोळया : शासकीय केंद्रावर आरोग्यसेवक-सेविकांकडून मोफत मिळतात. (अधिक माहितीसाठी रक्तपांढरी या विषयाची माहिती पहा.)

कॅल्शियम : गरोदरपणात शरीरातले चुन्याचे प्रमाण कमी होते, कारण गर्भाची वाढ होण्यासाठी तो वापरला जातो. आरोग्यकेंद्रांतून लोहगोळयांसोबत कॅल्शियम गोळया दिल्या जात नाहीत. पण या गोळयाही देणे आवश्यक आहे. कॅल्शियमच्या गोळया सातव्या महिन्यापासून रोज एक याप्रमाणे दिल्या तरी पुरते. याबरोबर प्रथिनयुक्त आहार घ्यायला पाहिजे.

स्तनांची काळजी

स्तनांची बोंडे आत न दबता मोक़ळी राहायला पाहिजे. यासाठी ती रोज बाहेर ओढणे आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. बोंड चिराळले असल्यास तेल लावून हळूहळू चोळावे. यामुळे बोंडे मऊ पडतील

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate