खालील बाबतींत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.
बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर 48 तासांपर्यंत कधीही असू शकते. 4 ते 5 दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून 12-15 वेळा शी करतात. याउलट काही बाळे4 ते 7 दिवसात एकदा शी करु लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
लघवी
मुलगा असेल तर लघवीची धार लांब पडते की नाही हे आईस विचारावे. जर लघवीची धार व्यवस्थित असेल तर (लघवीच्या पिशवीपासून ते लघवीच्या जागेपर्यंत) मूत्रमार्गात अडथळा नाही असे समजावे. पहिल्या 24 तासांत लघवी झाली नाही तर तज्ज्ञाकडे पाठवावे.
डोके
पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या बाळाच्या डोक्याचा आकार बाकी शरीराच्या मानाने मोठा असतो.
जन्मताना डोक्यावर आलेल्या दाबामुळे डोक्याच्या वरच्या भागावर फुगल्यासारखे दिसते. हा फुगीर भाग 24 ते 48 तासांत नाहीसा होऊन डोक्याला सारखेपणा येतो.
डोक्याचा घेर 32-36 से.मी. (सर्वसाधारण 35 से.मी.) असतो.
टाळू
डोक्याची हाडे पूर्ण जुळलेली नसतात. त्यामुळे पुढे शंकरपाळयाच्या आकारात तर पाठीमागे त्रिकोणी आकारात टाळू असते. पुढील टाळू 1 वर्षात व मागील टाळू 1 महिन्यात भरते
हात-पाय
नवजात बाळाचे हात-पाय दुमडलेल्या अवस्थेत असतात व मुठी मिटलेल्या असतात.
शरीरावर चिकटा
जन्मताना बाळाच्या अंगावर बहुधा पांढ-या चिकट पदार्थाचे आवरण असते. जन्मानंतर खूप घासून हा चिकटा काढू नये नाहीतर नाजूक त्वचेला इजा होते. हा चिकटा हळूहळू आंघोळी सोबत 2-3 दिवसात जातो.
वजन
आपल्या देशात नवजात बाळाचे वजन 2 किलो ते 3 किलो (सर्वसाधारणपणे 2.5किलो) असते
संप्रेरकांचे परिणाम
आईच्या शरीरातील स्त्रीसंप्रेरकांमुळे (हार्मोन्स) कधीकधी, सुरुवातीला काही दिवस बाळाचे स्तन मोठे व सुजल्यासारखे दिसतात. त्यातून कधीकधी दूधही पाझरते.
मुलगी असेल तर याच कारणाने (स्त्रीसंप्रेरकांमुळे) योनिमार्गातून एक-दोन दिवस रक्तस्रावही होऊ शकतो.
थोडया दिवसांत हे परिणाम आपोआप थांबतात.
दूध ओढणे
सर्वसाधारणपणे निरोगी बाळ जन्मल्यावर लगेच अंगावरचे दूध ओढू शकते. कमी वजनाचे/दिवसाचे मूल दूध ओढायला दमते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/9/2020
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्ण...