অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवयवदान: एक सामाजिक कार्य

अवयवदान: एक सामाजिक कार्य

अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी 'महा अवयवदान महोत्सव-२०१७' हा दिनांक २९  ऑगस्ट, २०१७  ते ३०  ऑगस्ट, २०१७  दरम्यान साजरा करण्यात येत आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

अवयवदान प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीने जवळच्या नातेवाईकांस किडनी, यकृत दिले तर त्याच्या शरीरावर काही परिणाम होईल का? अवयव पुन्हा निर्माण होऊ शकतो का? असे काही प्रश्न आहेत. खरे तर वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली असून प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते. किडनी, हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे आदी अवयवांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाल्याचे आपण माध्यमातून वाचतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.

रुग्ण दवाखान्यात भरती झाला म्हणजे त्याचे अवयव काढून घेणे, अनाथ मुले, व्यक्ती, भिकारी यांना पकडून अवयव काढून घेणे, पैशाचे आमिष दाखवून अवयव काढणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही डॉक्टर्स व अवयवांची तस्करी करणारी माणसे सहभागी होती. त्यामुळे माणसे अपंग व्हायची, मरायची. अशा अवयव प्रत्यारोपणामध्ये गरजूंना फायदा व्हावा, त्या प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी मानवी उपचाराकरिता व अवयवांची व्यावयायिक विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४' लागू केला. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ मध्ये अंमलात आल्यानंतर आजपर्यंत ११३६४ किडनी, ४६८ लिव्हर, १९ हृदय, ३ फुफ्फुसांचे आणि ४७९ डोळ्यांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन देण्यात आले आहे. आताच्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये सुमारे पाच  लाख मुत्रपिंड, पन्नास  हजार यकृत व २०००  हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असून त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे.

या प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत संबंधित डॉक्टरला कुठल्याही व्यक्तीचे अवयव काढणे, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याचे परिणाम, धोके याची माहिती रुग्णास व त्याच्या नातेवाईकास दिली पाहिजे. या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयातच शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित रुग्णासाठी अवयव देणारी व घेणारी व्यक्ती जवळचे नातेवाईक असणे गरजेचे असते. जर असे नातेवाईक नसतील तर प्रत्यारोपण समितीची परवानगी घेणे आवश्यक असते. या समितीतील सदस्यांकडून सखोल तपासणी केल्यानंतरच प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर ज्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची व तो जेथे दाखल आहे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रत्यारोपण प्राधिकरण समितीला संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच संपूर्ण राज्यातील अवयवदान समन्वय करण्यासाठी मुंबई येथे 'झोनल ट्रान्सप्लांट कॉ-ऑर्डिनेशन सेंटर' उभे करण्यात आले आहे. या सेंटरच्या औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून अवयवदान प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचे काम केले जाते. मोठ्या शहरातील कोणत्या रुग्णालयात किती गरजू रुग्णांना अवयवाची गरज आहे. दाते कोण आहेत, याची संपूर्ण माहिती या शाखांमध्ये उपलब्ध आहे.

प्रत्येक अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी काही नियम केलेले आहेत. उदा. किडनी अवयवदानाबाबत नियम आहे की, किडनी दात्याला महिनाभर डायलिसिसवर ठेवावे लागते. पती-पत्नी किंवा रक्ताचे नातेवाईक एकमेकांना किडनी देऊ शकतात. तसेच किडनी दात्याला हा अवयव किती महत्त्वाचा आहे व तो काढल्याने शरीरावर काय काय परिणाम होतात याची संपूर्ण लेखी माहिती द्यावी लागते. प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्ण व अवयवदाता यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधावाटप पत्रिका आदी कागदपत्रे तपासली जातात. तसेच रक्ताचे नाते ओळखण्यासाठी जन्माचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड आदी पुराव्याची शहानिशा करावी लागते. ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे तेथील समन्वयक ही सर्व कागदपत्रे तपासतो. त्यानंतर प्रत्यारोपण प्राधिकरण समितीपुढे सादर करतो व त्यानंतरच प्रत्यारोपणाची परवानगी मिळते.

अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय पारदर्शी ठेवावी असा नियम आहे. उदा.प्रत्यारोपण प्राधिकरण समितीकडे विविध रुग्णांची यादी असते. किती रुग्णांना कोणत्या अवयवांची गरज आहे हे नमूद असते. त्यासाठी प्रतिक्षा यादीतीलच रुग्णांना अवयवदान केले जाते. या प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्स आणि त्या रुग्णालयाला लाखो रुपयांचा दंड आकारल्या जाऊ शकतो. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास डॉक्टरांनाही तुरुंगाची हवा खावी लागते. सध्या मुंबई शहरात जवळपास ३५ रुग्णालयांनी अवयवदान प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. त्यात महानगरपालिका, सरकारी रुग्णालये, तसेच काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे ५० जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे.

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत. समाजामध्ये देखील नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. आजार कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता ९५ टक्क्यापर्यंत गेली आहे. वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल. पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हती. आता एवढी जनजागृती झाली की अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना पाहतो. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू डेड होतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरिरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरिरातील किडनी, यकृत डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडणी मिळते तर कुणाला डोळे! किडनी, लिव्हरमुळे जीवनदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.

धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाला स्मृतीभ्रंश होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्याशिवाय मोठे कार्य नाही. माणसे मरतात तेव्हा आपण एकतर त्यांना जमिनीत पुरतो नाहीतर जाळतो. तेव्हा शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.

सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारावर उपचार होतात. अवयवदानाद्वारे (लाईव्ह ऑर्गन डोनेशनद्वारे) किडनी, लिव्हर, प्रत्यारोपण करण्यात येते. सध्या राज्यभरात जवळपास बारा हजारापेक्षा नोंदणीकृत रूग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून ही संख्या वाढतच आहे. शरिरातील अवयवांना कुठलाही धर्म, जात नसते. एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या जाती धर्माच्या व्यक्तीला अवयव दान करू शकते. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. कुणाला किडनीची गरज होती, कुणाला यकृताची तर कुणाला डोळ्यांची! एकमेकांना अवयवदान करताना त्यांनी फक्त माणुसकी पाहिली! अशी हजारो उदाहरणे आहेत. अवयव प्रत्यारोपण करून ते आपले पुढील आयुष्य सुखा-समाधानाने जगत आहेत.

डबेवाल्यांचा अवयवदानाचा संकल्प

अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना कळावे म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. सुमारे शंभर डबेवाल्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय जाहिर करून अर्ज भरला. एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर त्याच्या शरिरातील महत्वाचे अवयव नष्ट होतात, परंतु अंत्यसंस्कारापूर्वी त्या मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. म्हणून अशावेळी वारसांनी पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन डबेवाल्यांनी केले आहे.

अवयवदान एक चळवळ म्हणून उभी राहत आहे. लोकांना या दानाचे महत्त्व कळू लागले आहे. आपले बदलते जीवन चक्र पाहता, त्याचबरोबर निसर्ग पर्यावरणातील बदल, आहारातील चटपटीत, तेलकट, खाद्य पदार्थाचा समावेश, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे आकर्षण यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहेत. तरूण वयात अनेक अवयव निकामी होत आहेत. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार, यकृतात बिघाड अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही आजार असे आहेत की, त्याचे उशीरा निदान होते. जेथे लवकर उपचार करायला हवे तेथे खूप उशीर झालेला असतो. बऱ्याचदा उपचाराची माहिती नसणे, डॉक्टरांची सोय नसणे, आर्थिक अडचण यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणूनच वेळीच निदान झाले तर अवयव प्रत्यारोपण करून आपले आयुष्य आपण सुखाने, आनंदाने अधिक काळ जगू शकतो!

अवयवदान कुणीही करू शकते. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. मुलाने वडिलांना किडनी दिली. बहिणीने भावाला दिली. मुलाने वडिलांना यकृत दिले. तर फ्राँन्सिसच्या हृदयामुळे हरिप्रसादला जीवनदान मिळाल्याचे ऐकतो. कुठे ऋषिकेशच्या किडनीमुळे इब्राहिमचे आयुष्य फुलले अशा बातम्या वाचतो. अवयवदानाला ना जात आडवी येते ना धर्म! म्हणूनच अवयवदान हे जात-धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अवयवदानाची प्रक्रिया सोपी आहे. अवयवदानाचा फॉर्म भरला असेल तर, एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास, किंवा एखादा ब्रेनडेड झाल्यास नातेवाईकांच्या इच्छेनुसार सहा तासाच्या आत अवयवदान करता येते. किमान तीन वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तीचे अवयवदान केले जाऊ शकते. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांसाठी अवयवदान करुन त्यांचे जीवन समृद्ध करूया. अवयवदानाचा फॉर्म भरुया!

ही अवयवदानाची प्रक्रिया आता कायद्यामुळे अधिक सुरक्षित झाली आहे. मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये म्हणून मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यासाठी केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ लागू केला आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील. अवयव दानाचा अर्ज भरतील यात शंका वाटत नाही.

माहिती स्रोत: अनिल आलुरकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate