अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत. समाजामध्येही नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. आजार कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता ९५ टक्क्यापर्यंत गेली आहे. वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल.
पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरीरातील किडनी, यकृत, डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हरमुळे जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही अवयवदानाचे महत्व जाणून रुग्ण सेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती होण्यासाठी अवयवदानाचे अभियान हाती घेण्याबाबत सूचीत केले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी प्रथम जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी, यासाठी राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान अभियान ३० ऑगस्ट २०१७ ते १ सप्टेंबर २०१७ दरम्यान घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली साजरे करण्यात येत आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागामार्फत महा अवयवदान जागृतीबाबत तसेच महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. गेल्यावर्षी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
राज्यातील जनतेचे अवयवदानाबाबत प्रबोधन करुन जास्तीत जास्त दात्यांना संपर्क करुन समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागावर आहे. त्या अनुषंगाने महा अवयवदान जागृती अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यभरातून जास्तीत जास्त अवयवदानाच्या नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासोबत समाजाच्या विविध स्तरामध्ये अवयवदानाचे महत्व रुजविण्याचे काम केले जात आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, अधीक्षक उपजिल्हा, कुटीर, रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी व अवयवांची व्यावसायिक आणि अवैध विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-1994 लागू केला. आताच्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये सुमारे पाच लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व २००० हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्यांच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असून त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे.
धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाचा मेंदूमृत होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्याशिवाय मोठे कार्य नाही. मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारानंतर शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.
जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे ५० जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. म्हणूनच ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या नव्या संकल्पनेनुसार कुटुंबातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे.
लेखिका: अर्चना शंभरकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/25/2020