आपण नाकातून आत श्वास घेतो तेव्हा ती हवा श्वासनळीतून फुप्फुसामध्ये येते. फुप्फुस हे अनेक सूक्ष्म फुग्यांचे बनलेले असते. या प्रत्येक सूक्ष्म फुग्याभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. या प्रत्येक फुग्यातील हवा व केशवाहिन्यांतील रक्त या दोन्हींमध्ये सतत देवाणघेवाण चालू असते. प्राणवायू रक्तामध्ये जातो तर कार्बवायू रक्तातून बाहेर पडून हवेत येतो. जाळाबरोबर होणा-या धुराप्रमाणे कार्बवायू हा शरीरातील साखरेचा वापर झाल्यानंतर तयार होणारा अनावश्यक पदार्थ आहे. शरीरात ठरावीक प्रमाणाबाहेर कार्बवायू साठला तर मृत्यू ओढवू शकतो. तसेच शरीरातल्या असंख्य घडामोडींना प्राणवायू पुरवावा लागतो. श्वसनावाटे प्राणवायू घेणे आणि कार्बवायू बाहेर टाकणे या दोन्ही गोष्टी साध्य होतात.
कार्बवायूबरोबर आणखी काही पदार्थ वायुरुपाने श्वसनावाटे टाकले जातात (उदा. दारू. त्यामुळेच दारू प्यायल्यानंतर श्वासाला दारुचा वास येतो.)
घशात किंवा स्वरनलिकेत काही अडकले किंवा त्यावर दाब आला किंवा फुप्फुसात पाणी शिरले तर श्वसनक्रिया बंद पडू शकते. तसेच फुप्फुसाच्या आवरणात पाणी किंवा हवा किंवा पू झाला तर श्वसनात अडथळा येतो.
नाक, घसा व स्वरयंत्र यांना मिळून 'बाह्यश्वसनसंस्था' म्हणतात. श्वासनलिकांपासून वायुकोषांपर्यंतच्या भागाला 'आतली श्वसनसंस्था' असे म्हणतात. या विभागणीचे महत्त्व पुढे कळेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/15/2020
नाक हे माणसाच्या चेहऱ्या वर मध्यभागी असलेले एक इंद...
श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्...