অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रगर्भरक्षी

(प्रोजेस्टेरॉन). अंडकोशातून [⟶ अंडकोश] स्रवणाऱ्या एका हॉर्मोनास [सरळ रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावास; ⟶ हॉर्मोने] प्रगर्भरक्षी किंवा गर्भरक्षक म्हणतात. अंडाकोशातून स्रवणाऱ्या दुसऱ्या हॉर्मोनास ⇨स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) म्हणतात. स्त्रीजीवनात ऋतुकालाच्या सुरुवात होण्याच्या वयापासून ऋतुनिवृत्तीच्या काळापर्यंत ही दोन हॉर्मोने कमी अधिक प्रमाणात अंडकोशाच्या विशिष्ट कोशिकांपासून (पेशींपासून) स्रवतात [⟶ ऋतुनिवृत्ती; ऋतुस्राव व ऋतुविकार]. स्त्रीमदजन विशिष्ट कोशिकांच्या वृद्धीस व स्त्रीत्त्वदर्शक उपलक्षणांच्या निर्मितीस कारणीभूत असते. प्रगर्भरक्षी गर्भाशयाची गर्भधारणेकरिता व स्तनांची दुग्धनिर्मितीकरिता तयारी करण्याचे कार्य करते.

बहुतेक सर्व प्रगर्भरक्षी अंडमोचनानंतर अंडकोशात तयार होणाऱ्या पीतपिंडापासून (पीत पुटकापासून) ऋतुचक्राच्या दुसऱ्या अर्ध्या भागात तयार होते. ⇨ अधिवृक्क ग्रंथी अत्यल्प प्रमाणात प्रगर्भरक्षी किंवा त्याच्यासारखीच क्रियाशीलता असणारी संयुगे स्रवतात. गर्भारपणात वारेपासून फार मोठ्या प्रमाणात, नेहमीपेक्षा दसपटींनी अधिक, प्रगर्भरक्षी स्रवले जाते. पुरुषातही वृषणातून (पुं-जनन ग्रंथीतून) स्रवणाऱ्या ⇨पौरुषजन हॉर्मोनांच्या उत्पादनातील मध्यस्थ पदार्थ म्हणून प्रगर्भरक्षीचे उत्पादन होते. अधिवृक्क ग्रंथीच्या कॉर्टिकोस्टेरॉइड हॉर्मोनांच्या उत्पादनातही प्रगर्भरक्षी मध्यस्थाचे काम करते.

निरोगी पुरुषात दररोज ३·९-६·८ मिग्रॅ., निरोगी स्त्रीमध्ये ऋतुचक्राच्या पहिल्या अर्ध्यात म्हणजे अंडपुटक अवस्थेत २·३-५·४ मिग्रॅ. आणि दुसऱ्या अर्ध्यात म्हणजे पीतपिंड अवस्थेत २२-४३ मिग्रॅ. आणि गरोदरावस्थेत २७ ते ४० व्या आठवड्यात १८८-५६३ मिग्रॅ. प्रगर्भरक्षी तयार होते.

जैव संश्लेषण

(साध्या संयुगांच्या संयोगाने जटिल संयुग तयार होण्याची जैव प्रक्रिया). प्रगर्भरक्षी प्रामुख्याने कोशिका द्रव्यातील अॅसिटील को-एंझाइम-ए पासून [⟶ एंझाइमे] तयार होते. ते ⇨ कोलेस्टेरॉलापासूनही बनू शकते. अॅसिटेट, कोलेस्टेरॉल, प्रेग्नेनोलॉन व प्रोजेस्टेरॉन (प्रगर्भरक्षी) या क्रमाने हे जैव संश्लेषण होते. प्रगर्भरक्षीसारखीच क्रियाशीलता असणारी आणखी कमीतकमी दोन हॉर्मोने अंडकोशातून स्रवतात; परंतु ती अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे गौण आहेत.

रासायनिक गुणधर्म

हॉर्मोनांच्या स्टेरॉइड गटापैकी प्रगर्भरक्षी हे एक असून त्याचे स्फटिक घन, शुभ्र व स्थिर असतात. ते लोलकाकार आणि सूच्याकृती या दोन प्रकारच्या बहुरूपांत (निरनिराळ्या तापमान पल्ल्यांत स्थिर राहणाऱ्या वेगवेगळ्या रूपांत) मिळते. लोलकाकार १२८° से. तापमानावर, तर सूच्याकृती १२१° से.वर वितळतात; परंतु त्यांची शारीरिक क्रिया सारखीच असते. प्रगर्भरक्षीचे रासायनिक संरचना सूत्र वरीलप्रमाणे आहे.

प्रगर्भरक्षी पाण्यात पूर्णपणे अविद्राव्य (न विरघळणारे) असून पेट्रोलियम ईथर, अल्कोहोल, अॅसिटोन व पिरिडीन यांखेरीजकरून बहुतेक सर्व कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थात) विद्राव्य असते. ते तेलात विद्राव्य असून रक्तरसात मध्यम प्रमाणात विद्राव्य असते. रासायनिक दृष्ट्या ते डायकीटोन असून त्याचे अनुजात (त्यापासून तयार केलेली इतर संयुगे) कीटोन प्रकारचे असतात [⟶ कीटोने].

चयापचय व उत्सर्जन

(चयापचय म्हणजे शरीरात होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी आणि उत्सर्जन म्हणजे शरीरातून बाहेर टाकले जाण्याची क्रिया). वार आणि पीतपिंड यांमध्ये एंझाइमांच्या ऑक्सिडीकरणामुळे [⟶ ऑक्सिडीभवन] पूर्वगामी पदार्थापासून प्रगर्भरक्षी तयार होते. स्त्रीमदजनापेक्षा या हॉर्मोनाचे उत्पादन कितीतरी पटींनी अधिक असते; परंतु त्याची शक्ती बरीच कमी असते. स्रवणानंतर काही मिनिटांतच बहुतेक सर्व प्रगर्भरक्षी रक्तप्रवाहातून यकृतात पोहोचते आणि तेथे त्याचे अपघटनाने (मोठ्या रेणूचे लहान रेणूंच्या रूपात तुकडे होण्याच्या क्रियेने) अज्ञात संयुगात व क्षपणाने [⟶ क्षपण] प्रेग्नेनेडिओलामध्ये रूपांतर होते. प्रेग्नेनेडिओल जैव दृष्ट्या अक्रिय असते व त्याचे ग्लुकुरॉनिक अम्लाशी संयुग्मन होऊन ते दैहिक रुधिराभिसरणात मिसळते व वृक्काद्वारे (मूत्रपिंडाद्वारे) मूत्रातून उत्सर्जित होते. प्रगर्भरक्षीच्या एकूण मूळ स्रावापैकी १०% भागाचे प्रेग्नेनेडिओलामध्ये रूपांतर होत असल्यामुळे या पदार्थाच्या उत्सर्जन प्रमाणावरून एकूण मूळ उत्पादनाचा अंदाज करता येतो.

कार्य

प्रगर्भरक्षीच्या शरीरावरील परिणामांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.

(अ) गर्भाशयावरील परिणाम : प्रगर्भरक्षीचे सर्वांत जास्त महत्त्वाचे कार्य म्हणजे गर्भाशय अंतःस्तरातील स्रावक बदल घडवून आणणे हे होय. या बदलामुळे निषेचित (शुक्राणूशी संयोग पावलेल्या म्हणजे फलन झालेल्या) अंडाच्या रोपणास योग्य परिस्थिती निर्माण होते. हे कार्य प्रत्येक ऋतुचक्रात पीतपिंड अवस्थेत शिगेस पोहोचून गर्भाशय अंतःस्तराची जाडी दुपटीने वाढून ४ ते ६ मिमी. बनते. या बदलांना गर्भधारणापूर्व अवस्था असेही म्हणतात. त्यांचा हेतू अतिस्रावक गर्भाशय अंतःस्तर तयार करण्याचा तसेच पोषक पदार्थांचा (जे पदार्थ पुढे निषेचित अंडाचे रोपण झाल्यास त्याच्या पोषणास मदत करतील अशा पदार्थांचा) साठा तयार करण्याचा असतो. अंडनिषेचनापासून अंडरोपणाच्या काळापर्यंत अंडवाहिनी (अंडकोशातून अंड बाहेर पडल्यावर ज्या नलिकेद्वारे ते गर्भाशयात जाते ती नलिका) व गर्भाशय यांच्या अंतःस्तरापासून स्रवणारे स्राव या अंडाचे पोषण करतात. या स्रावांना ‘गर्भाशयाचे दूध’ म्हणतात. गर्भाशय अंतःस्तरावरील हे सर्व परिणाम फक्त स्त्रीमदजनाने पूर्वीच संवेदनाशील केलेल्या गर्भाशयात आढळतात म्हणजेच स्त्रीमदजनाची प्रगर्भरक्षीच्या कार्यशीलतेकरिता आवश्यकता असते.

(आ) अंडवाहिनीवरील परिणाम : अंडवाहिन्यांच्या श्लेष्मल (बुळबुळीत स्राव स्रवणाऱ्या) अंतःस्तरात प्रगर्भरक्षी स्रावक बदल घडवून आणते. हे बदल स्रावोत्पादन वाढवतात आणि हा स्राव वर सांगितल्याप्रमाणे निषेचित अंडाच्या नलिकेतील प्रवासात पोषक पदार्थ पुरवतो.

(इ) स्तनावरील परिणाम : प्रगर्भरक्षी स्तनातील खंडिकांची व ग्रंथिकांची वाढ करते [⟶ स्तन]. ग्रंथिकांतील कोशिका आकारमानाने वाढून स्रावक बनतात. प्रगर्भरक्षीमुळे प्रत्यक्ष दुग्धस्रवण होत नाही, तर त्याची तयारी केली जाते. दुग्धस्रवणाकरिता ⇨ पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या (प्रोलॅक्टिनाच्या) चेतनेची आवश्यकता असते. प्रगर्भरक्षीमुळे स्तन भरून येतात. काही अंशी हा फुगीरपणा खंडिका व ग्रंथिका यांच्या वृद्धीमुळे आलेला असतो. स्तनांच्या अधस्त्वचीय (त्त्वचेच्या सर्वांत आतील थरातील) ऊतकातून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातून) द्रवसंचय होऊन त्यात भर पडते.

(ई) विद्युत्‌ विच्छेद्य पदार्थांच्या शरीरातील संतुलनावरील परिणाम : (विद्युत्‌ विच्छेद्य पदार्थ म्हणजे जे वितळलेल्या अवस्थेत वा एखाद्या विद्रावकात विरघळलेल्या अवस्थेत विद्युत्‌ प्रवाह वाहून नेऊ शकतात असे पदार्थ). स्त्रीमदजने, पौरुषजने व अधिवृक्क बाह्यकाची हॉर्मोने यांच्याप्रमाणेच जादा प्रमाणात असल्यास सोडियम क्लोराइड व पाणी या पदार्थांचे दूरस्थ वृक्क नलिकांतून होणारे पुनःशोषण प्रगर्भरक्षी वाढवते आणि तरीदेखील प्रगर्भरक्षी पुष्कळ वेळा सोडियम व पाणी यांचे उत्सर्जन वाढविते. ही क्रिया त्याच्या अल्डोस्टेरॉन या हॉर्मोनाच्या बरोबर असणाऱ्या चढाओढीमुळे होते. वृक्कनलिका कोशिकांतर्गत विशिष्ट प्रथिनाशी संयुग्मित होण्याची ही चढाओढ असते. एकदा प्रगर्भरक्षीने शिरकाव केल्यानंतर अल्डोस्टेरॉनाला जागा मिळत नाही. परिणामी अल्डोस्टेरॉनाच्या क्रियाशीलतेत अडथळा येतो आणि सोडियम व पाणी यांचे निव्वळ उत्सर्जन होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate