एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास शिकागो येथे ग्रंथिद्रव्याचे पहिले मोठ्या प्रमाणावरील उत्पादन सुरू झाले. डुकराच्या जठरापासून पेप्सिन नावाचे पाचक एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) प्रथम बनविण्यात आले. त्यानंतर १८९० मध्ये अवटू ग्रंथीची (श्वासनालाच्या पुढे व दोन्ही बाजूंना असलेल्या ग्रंथीची) शुष्क भुकटी बनविण्यात आली. हे ग्रंथिद्रव्य अतिप्रभावी औषध असून आजही वापरात आहे.
ग्रंथिद्रव्ये प्राण्याच्या शरीरातील ग्रंथींपासून मिळत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनात अनेक अडचणी येणे साहजिकच होते. प्रथम अडचण होती ती म्हणजे ग्रंथींच्या भरपूर व सतत पुरवठ्याची, त्यांनतर मिळालेली द्रव्ये योग्य प्रकारे टिकविण्याची व त्यापुढील अडचण होती ती विशाल प्रमाणातील संशोधन व चाचणी करण्याची. रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबरच काही ग्रंथिद्रव्यांची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी ) माहीत झाल्यामुळे ती संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) बनविता येऊ लागून काही अडचणींवर मात करण्यात आली.
कोणत्याही ग्रंथीपासून मिळणारे क्रियाशील ग्रंथिद्रव्य तिच्या आकारमानाच्या मानाने नेहमीच अत्यल्प असते. त्यामुळे ते मिळविण्याकरिता लागणारी ग्रंथींची संख्या फारच मोठी असते. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत मांस उत्पादन व ते हवाबंद डब्यांतून विक्रीकरिता भरून ठेवण्याचा धंदा वाढला. त्यामुळे १८६०–७० या काळात ग्रंथींचा पुरवठा भरपूर होऊ लागला. १८८० च्या सुमारास यांत्रिक प्रशीतनाचे (थंड करण्याचे ) साधन उपलब्ध झाल्यानंतर हा पुरवठा टिकविण्याची व तो सतत होण्याची सोय झाली. १९४६ पर्यंत जवळजवळ वीस प्रकारच्या ग्रंथी या द्रव्यांच्या उत्पादनाकरिता वापरात होत्या व शंभरापेक्षा जास्त ग्रंथीद्रव्यांचे उत्पादन होई. ग्रंथिद्रव्ये तयार करण्याकरिता निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांचे, तसेच तंत्रज्ञांचे सहकार्य असावे लागते. अनेक मानवी रोग तसेच पशूंतील रोग ग्रंथिद्रव्य चिकित्सेमुळे बरे होतात अशी खात्री विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच झाली. एवढेच नव्हे तर काही रोग्यांचे जीवन सर्वस्वी ग्रंथिद्रव्य उपलब्धतेवरच अवलंबून असल्याचेही समजले. उदा., मधुमेहाच्या रोग्यांचे इन्शुलिनावर. आजही हजारो व्यक्ती आपले दैनंदिन जीवन केवळ ग्रंथिद्रव्यांमुळेच सुरळीत जगत आहेत.
खाटीकखान्यात प्राण्याची कत्तल झाल्यानंतर लगेचच या ग्रंथी काढून घेण्याकरिता खास तंत्रज्ञांची गरज असते. काढलेल्या ग्रंथी वेळ न दवडता त्यांचे द्रुतशीतन करणे आणि गोठविणे आवश्यक असते. जोपर्यंत रुधिराभिसरण चालू असते तोपर्यंत शरीरातील हॉर्मोने व एंझाइमे योग्य प्रमाणात शरीरभर विखुरलेली असतात. कत्तल होताच म्हणजे मृत शरीरात रुधिराभिसरण थांबल्यामुळे एंझाइमे एकाच ठिकाणी गोळा होतात व ती ऊतकांतील (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांतील) द्रव्यावर परिणाम करू लागतात. उदा., ट्रिप्सीन हे अग्निपिंडातील एंझाइम इन्शुलिनावर परिणाम करील व परिणामी अशा अग्निपिंडापासून इन्सुलीन मिळणार नाही. बहुतेक सर्व ग्रंथि–ऊतके सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास उत्तम माध्यमे आहेत. म्हणून ही वाढ रोखण्याकरिताही वर दिलेल्या क्रिया–द्रुतशीतन व गोठविणे–ताबडतोब करणे आवश्यक असतो.
सुदृढ प्राण्यांच्या शरीरातील ग्रंथी काढून घेतल्यानंतरच त्या काळजीपूर्वक साफ केल्यानंतर वरील क्रिया करतात. ग्रंथिद्रव्य उत्पादनातील प्रमुख टप्पे पुढीलप्रमाणे असतात : (१) गोठलेल्या अवस्थेतच ग्रंथींचे बारीक तुकडे करणे, (२) निरनिराळे जलीय किंवा जलविहीन विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) वापरून अर्क काढणे, (३) गाळण्या व केंद्रोत्सारक(केंद्रापासून दूर नेण्याच्या प्रेरणेवर चालणाऱ्या) यंत्राच्या मदतीने अर्कातील नको असलेले घन पदार्थ काढून टाकणे, (४) निर्वात बाष्पीकरणाने वर दिलेल्या पद्धतीने मिळविलेल्या अर्काचे सांद्रण (अर्काचे प्रमाण वाढविलेला विद्राव ) बनविणे व (५) निर्वात शुष्कीकरण.
इन्शुलीन उत्पादनाकरिता वरील सर्व क्रिया कराव्या लागतात. मात्र इन्शुलिन कोरड्या अवस्थेत न मिळता त्याचा शेवटी द्रवच मिळतो. या सर्व क्रिया करताना ग्रंथिद्रव्याची क्रियाशीलता टिकविण्याकरिता तसेच निर्जंतुकता व स्वच्छता यांविषयी फार काळजी घ्यावी लागते.
ग्रंथिद्रव्ये तयार झाल्यानंतर त्यांची शक्ती, निर्जंतुकता व निर्धोकपणा तपासण्याकरिता निरनिराळ्या प्रयोगशाळा असतात. ही तपासणी पूर्ण होण्यास काही दिवस, आठवडे किंवा महिनेही जावे लागतात. या काळात जमविलेले अर्क योग्य रीतीने साठविण्याची गरज असते. या सर्व खटाटोपानंतर औषध म्हणून वापरण्याची परवानगी मिळालेली ग्रंथिद्रव्ये सर्वतोपरी निर्धोक व खात्रीलायक असतात.
(१) अधिवृक्क ग्रंथी : गुरे, डुकरे व मेंढ्या या प्राण्यांच्या या ग्रंथींपासून एपिनेफ्रिन (अॅड्रेनॅलीन) व बाह्यक (बाह्य आवरणापासून मिळणारा) अर्क मिळवितात. पहिले ग्रंथिद्रव्य ग्रंथीच्या अंतर्भागातून तर दुसरे बाह्यकापासून मिळते. एपिनेफ्रिन दम्यावर, नाक व घसा यांच्या शस्त्रक्रियेत तसेच रक्तदाब वाढविण्यासाठी व हृदयाचे स्नायू उत्तेजित करण्यासाठी वापरतात [→ अधिवृक्क ग्रंथि].
(२) पोष ग्रंथी : गुरे, डुकरे व मेंढ्या या प्राण्यांच्या पोष ग्रंथींपासून एसीटीएच नावाचे ग्रंथिद्रव्य मिळते. या ग्रंथीच्या अग्रभागापासूनच ते मिळते. या प्राण्यांच्या या ग्रंथींपासून मिळणारे वृद्धी हॉर्मोन (एस्टीएच) मानवी शरीरावर निष्प्रभ ठरले आहे. बैलांच्या पोष ग्रंथींपासून मिळणारे अवटू ग्रंथी उद्दीपक हॉर्मोन (थायरोट्रोफीन, टीएसएच) मानवी शरीरावर परिणाम करते. मानवातील अवटू ग्रंथी विकृतीच्या निदानाकरिता ते उपयुक्त आहे [→ पोष ग्रंथि].
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/16/2020
शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापरा...
द्रव्याची निर्मीतीशून्यातून होऊ शकत नाही अथवा त्या...
पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच द्रव्याच्या अणूंमध्ये धन ...
मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. सर्वसाधारणपणे उप...