ग्रंथी ही संज्ञा मुळात लसीका तंत्रातील [रक्तद्रवाशी साम्य असणारा लसीका नावाचा द्रव वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या तंत्रातील, कोशिका पुंजास लावीत. पुढे इतर कोशिकासमूहांना त्यांच्या कार्यावरून ग्रंथी म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मानवी शरीरातील यकृत, अग्निपिंड, अधिवृक्व, अवटू, पोष, जनन इ. ग्रंथींसंबंधीची विस्तारपूर्वक माहिती त्या त्या शीर्षकाखाली स्वतंत्र नोंदीत दिली आहे. प्रस्तुत नोंदीत ग्रंथींसंबंधीचे फक्त सर्वसाधारण विवरण दिले आहे. वनस्पतींतील ग्रंथींसंबंधी ‘शारीर, वनस्पतींचे’ ही नोंद पहावी.
ग्रंथींचे वर्गीकरण अनेक प्रकारांनी करता येते. ग्रंथींचे आकार, रचना व कार्य तसेच ग्रंथीत उत्पन्न होणाऱ्या स्त्रावाचा प्रकार व स्त्रावोत्पादन क्रिया वगैरेंवरून वर्गीकरण करणे शक्य आहे. काही ग्रंथींचा स्त्राव खास नलिकांवाटे बाहेर कार्यस्थळी जातो. अशा ग्रंथींना बहिःस्त्रावी अथवा नलिकाग्रंथी म्हणतात. ज्या ग्रंथींना नलिका नसतात व ज्यांचा स्त्राव रक्तप्रवाहात किंवा लसीकेत मिसळून मग कार्यस्थळी नेला जातो, त्यांना अंतःस्रावी अथवा नलिकारहित ग्रंथी म्हणतात . काही ग्रंथींमध्ये वरील दोन्ही प्रकार आढळतात व त्यांना मिश्र ग्रंथी म्हणतात.
उदा., अग्निपिंड. ज्या ग्रंथींचा स्त्राव उत्पन्न होण्याकरिता त्यांच्या कोशिकांचा अपकर्ष व्हावा लागतो त्यांना कोशिकास्त्रावी (होलोक्राइन) ग्रंथी म्हणतात. उदा., त्वचेतील स्नेह ग्रंथी. काही ग्रंथींच्या कोशिका स्त्रावातून अंशतः झडतात त्यांना अंशकोशिकास्त्रावी किंवा कोशिकांशास्त्रावी (अपोक्राइन) ग्रंथी म्हणतात. उदा., काखेतील व वृषणकोशावरील (पुं-जनन ग्रंथींच्या पिशवीवरील) त्वचेतील स्वेद ग्रंथी, दुग्धोत्पादक ग्रंथी, त्वचेतील पुष्कळशी स्वेद ग्रंथी त्यांच्या कोशीकांत बदल न होता फक्त पातळ पाण्यासारखा स्त्राव उत्पन्न करतात व अशा ग्रंथींना स्त्राव ग्रंथी (मेरोक्राइन) म्हणतात. अग्निपिंड व आतड्यातील ग्रंथी याच प्रकारात मोडतात.
शरीरातील बहुतेक ग्रंथी भ्रूणाच्या (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या) बाह्य आणि अंतःस्तरापासून उत्पन्न होतात. मूत्रजनन तंत्रातील ग्रंथी याला अपवाद असून त्या भ्रूणाच्या मध्यस्तरापासून तयार झालेल्या असतात. शरीराच्या अथवा अंतस्थ इंद्रियांच्या पृष्ठभागावरील कोशिकांच्या थरापासून ग्रंथी बनतात. काही ग्रंथी एकाच कोशिकेच्या बनतात. उदा., आतड्यातील श्वसन तंत्रातील श्लेष्म (बुळबुळीत स्त्राव तयार करणाऱ्या) ग्रंथी. इतर काही ग्रंथी अनेक कोशिकांच्या बनलेल्या असतात. पृष्ठभागावरील कोशिकाथराला घडी पडल्यासारखी होऊन त्या घडीत ग्रंथी तयार होतात.
अशा तऱ्हेने घडीच्या आत उत्पन्न होणाऱ्या ग्रंथींपैकी अगदी साध्या ग्रंथी नलिकाकार असून त्यांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून स्त्राव बाहेर पडतो. उदा., जठरातील ग्रंथी. ही नळी लांब असल्यास गुंडाळल्यासारखी बनते आणि तिची रचना वेटोळ्यासारखी दिसते. उदा., त्वचेतील स्वेद ग्रंथी. यापेक्षा अधिक वाढ झालेल्या ग्रंथीला शाखोपशाखा असून त्यांचा स्त्राव शाखित नलिकांतून बाहेर पडून गोळा केला जातो. या ग्रंथी द्राक्षांच्या घडासारख्या किंवा एका बाजूस फुगीर असलेल्या चंबूसारख्या दिसतात. त्यांना अनुक्रमे पुंज ग्रंथी आणि पलिघ ग्रंथी अशी नावे आहेत.
ग्रंथींच्या रचनेमध्ये जसे अनेक प्रकार दिसतात तसेच त्यांच्या स्त्रावातही अनेक प्रकार आढळतात. अंतःस्रावाबद्दल वर उल्लेख आला आहे. बाह्यस्त्रावही अनेक प्रकारचे असतात. त्वचेतील केशमूळाशी असलेल्या स्नेह ग्रंथीचा स्त्राव तेलकट असतो, तर आतड्यातील किंवा अग्निपिंडातील ग्रंथीचा स्राव पातळ आणि एंझाइमयुक्त (जीवरासायनिक विक्रिया जलद होण्याकरिता मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थयुक्त) असतो. काही ग्रंथींचा स्त्राव अम्लीय तर काहींचा क्षारीय (अम्लाशी विक्रीया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म असलेला) असतो. आतड्यातील व श्वसन तंत्रातील एककोशिकीय श्लेष्म ग्रंथीतून बुळबुळीत ग्लुको प्रथिनयुक्त स्त्राव उत्पन्न होतो. काही स्त्रावांना विशिष्ट प्रकारचा गंध येतो. उदा., स्वेद ग्रंथींचा स्त्राव व जनन तंत्रातील ग्रंथींचा स्त्राव.
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत होय. या ग्रंथीमध्ये उत्पन्न होणारा स्त्राव अन्नपचनास उपयुक्त असा एंझाइमयुक्त असतो; शिवाय त्यात शरीरातून उत्सर्जित होणारे पदार्थही असतात. ही मोठी ग्रंथी खंडात्मक असून प्रत्येक खंडामध्ये अनेक लहानलहान खंडके असतात. प्रत्येक खंडक संमिश्र ग्रंथिस्वरूप असून एक संपूर्ण ग्रंथीच असते. शरीरातील प्रत्येक ग्रंथीमध्ये चार निरनिराळे भाग असतात :
(१) स्त्रावोत्पादक कोशिका,
(२) स्त्राववाही नलिका,
(३) आधारभूत संयोजी (जोडणारे) ऊतक (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेंशींचा समूह) आणि
(४) रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जातंतू).
(१)स्रावोत्पादक कोशिका : या भागात एककोशिक, बहुकोशिक, संयुक्त, शाखोपशाखायुक्त अशा अनेक तऱ्हांच्या रचना आढळतात. त्यांचे त्रोटक वर्णन वर आलेच आहे. अगदी साध्या ग्रंथीमध्ये कोशिकांचा एकच स्तंभाकृती थर असून मधली पोकळी हाच स्रावमार्ग असतो. संयुक्त व शाखापशाखीय ग्रंथींमधील कोशिकांचे भिन्न भिन्न आकार आढळतात. कोशिकांचे एकावर एक असे थरही कित्येक ग्रंथींत दिसतात. प्रत्येक कोशिकेला केंद्रक (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), जीवद्रव्य (जिवंत कोशिका द्रव्य) व कोशिकावरण असते. काही कोशिकांत बारीक बारीक कण दिसतात. हे कण म्हणजेच स्रावातील एंझाइमे व इतर पदार्थ होत.
(२) स्राववाही नलिका : अगदी सरळ व साध्या नळीपासून वेटोळी व शाखोपशाखा असलेल्या अशा विविध प्रकारच्या नलिका आढळतात. या नलिकांच्या भित्तीवर स्तंभाकार, घनाकार अथवा एकावर एक असे अनेक थर असलेल्या अशा कोशिका असतात. काही ग्रंथींच्या नलिकांच्या क्रियेमुळे स्रावाच्या घटनेतही बदल होऊ शकतो.
(३) आधारभूत संयोजी ऊतक : ग्रंथीतील कोशिकांना आधारभूत असे तंतू असलेले संयोजी ऊतक असते. या तंतूमुळे ग्रंथी आपल्या जागी स्थिर राहते. काही ग्रंथींच्या भोवती या ऊतकाचे पिशवीसारखे आवरण असून या पिशवीपासून आतपर्यंत तंतू गेलेले असल्यामुळे ग्रंथीला चांगला आधार मिळतो.
(४) रक्तवाहिन्या व तंत्रिका : संयोजी ऊतकामधून रोहिण्या, नीला व तंत्रिका ग्रंथीच्या कोशिकांपर्यंत गेलेल्या असतात. रोहिणीच्या आकुंचन-प्रसरणानुसार कोशिकांनी कमी जास्त शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो व त्यामुळे स्रावाचे प्रमाण योग्य असे ठेविले जाते. याच ऊतकातून कोशिकांपर्यंत जाणाऱ्या तंत्रिकांच्या उद्दीपनाने ग्रंथिस्राव कमी जास्त होऊ शकतो.
माशांच्या खवल्यांवरील तसेच उघड्या त्वचेतील ग्रंथींचा बुळबुळीत स्राव जिंवत माशाला निसटून जाण्यास मदत करतो. जलसंचार करण्यास तसेच अंगाला चिकटणारे बाह्य पदार्थ काढून टाकण्यास हा बुळबुळीत स्राव उपयुक्त असतो. काही माशांचा ग्रंथीस्राव जननक्रियेत मदत करतो. काही मासे सूर्यप्रकाश पोहोचत नसणाऱ्या खोलवर सागरतळाशी असतात. या अंधारात वास्तव्य करणाऱ्या माशांना अंगाच्या दोन्ही बाजूंवर प्रकाशदायी बहुकोशिकीय ग्रंथी असतात. माशांच्या त्वचेतील बहुकोशिकीय ग्रंथींचे हे एकमेव उदाहरण आहे व त्यांना प्रदीप्ती अंग म्हणतात.
काही मासे, उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे) प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांना वर्णलवक (क्रोमॅटोफोर) कोशिकासमूह असलेल्या ग्रंथी असतात. त्यामुळे त्यांना परिसरास
सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी काही सापांच्या अवस्कर (अन्न, जनन व मूत्र या सर्वांचे मार्ग ज्या सामाईक कोष्टात उघडतात त्यांच्या) छिद्राजवळ गंधोत्पादक ग्रंथी असतात. ॲलिगेटर या मगरीच्या गणातील प्राण्याच्या खालच्या जबड्याच्या तळाकडील भागावर दोन ग्रंथी असतात व त्यांमधून विणीच्या हंगामात कस्तुरीसारखा तीव्र गंध सुटतो नर सरड्याच्या दोन्ही मांड्यांवर ज्या ग्रंथी असतात त्यांमधून जो स्राव बाहेर येतो त्यापासून कठीण काट्यासारखा भाग मांड्यांवर तयार होतो. त्यामुळे मैथुनाच्या वेळी घट्ट पकडून धरण्यास मदत होते.
या प्राण्यांच्या निरनिराळ्या संघ प्रकारांत अनेक प्रकारच्या त्वचा ग्रंथी आढळतात व त्या निरनिराळी कार्ये करतात. सीलेंटेरेट (आंतरगुही) प्राण्यांपैकी निडारिया उपसंघातील प्राण्यांच्या त्वचेत दंशकोशिका असतात. लहान लहान भक्ष्य शिथिल बनविण्याकरिता किंवा शत्रूंपासून बचाव करण्याकरिता त्या उपयुक्त असतात.
खेकड्यासारख्या कवचधारी उपसंघातील बार्नेकल प्राणी आपल्या ग्रंथीतून चिकट स्राव उत्पन्न करतात. या स्रावामुळे हे प्राणी आपले डोके संरक्षक कवचामध्ये घट्ट बसवून मोकळ्या पायांनी निवांतपणे भक्ष्य तोंडात घालतात. अनेक मृदुकाय (मॉलस्क) प्राणी (उदा., कालव) आपल्या सूत्रगुच्छ ग्रंथीमधून स्रवणाऱ्या धाग्यांनी स्थिर पदार्थांना बांधून घेतात. रोटीफेरा वर्गाचे सूक्ष्मप्राणी आपल्या शरीरातील हालचाल त्यांच्या शेपटातील ग्रंथींच्या चिकट स्त्रावाच्या मदतीने करतात.
गांडूळ ज्या कोशावरणात अंडी घालते ते ग्रंथिमय पर्याणिकेपासून (बाह्यत्वचेतील विशिष्ट भागापासून) तयार झालेले असते.
पुष्कळ कीटकांना स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. मिरिॲपोडा उपसंघातील संधिपाद प्राण्यांना विषारी अथवा क्षोभक शक्ती, तसेच करड्या शेपटीच्या पतंगांना व कोळ्यांना ग्रंथिस्रावापासूनच विषारीपणा प्राप्त झालेला असतो. मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण हा त्यांच्या त्वचेतील ग्रंथिस्रावाचे उत्तम उदाहरण होय.
संदर्भ : 1. Hamilton, W. J. Ed., Textbook of Human Anatomy. London, 1958.
2. Houssay, B. A. and others, Human Physiology, Tokyo, 1955.
3. Walter, H. E.; Sayles, L. P., Biology of the Vertebrates, New York, 1957.
लेखक - वा. रा. ढमढेरे / ज. नी. कर्वे / य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आण...
चेतासंस्थेमध्ये मेंदू, चेतारज्जू व चेतातंतू (नसा) ...
कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची अस...
जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमा...