कृमींपैकी कित्येक जाती परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या) आहेत. त्यांचे जीवनचक्र एक अथवा अधिक प्राण्यांच्या शरीरांत पूर्ण होते. निषेचित (फलित) अंड्यापासून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) तयार होतो. डिंभावस्थाही कित्येक कृमींच्या बाबतीत परजीवी असते. काही कृमिजातींमध्ये एकामागून एक अशा अनेक डिंभावस्थाही दिसतात. अर्ध किंवा पूर्ण विकसित कृमीपासून मनुष्यात रोगोत्पत्ती होऊ शकते.
कृमींच्या मुख्य तीन जाती आहेत,
(१) पृथुकृमी : (चिपट किंवा चपटे कृमी, प्लॅटिहेल्मिंथ) उदा.,यकृतातील ⇨ पर्णकृमी, ⇨ पट्टकृमी वगैरे.
(२) गोलकृमी : उदा., ⇨ जंत, अंकुशकृमी (तोंडात आकड्यासारखे भाग असलेले कृमी),
⇨ फायलेरिया (नारू व हत्ती रोग ज्यांपासून होतो ते कृमी) इत्यादी [→नारू; हत्ती रोग].
(३) कंटकशुंड कृमी : (तोंडात काट्यासारखे आकडे असलेले कृमी). उदा.,⇨ अॅकँथोसेफाला. या जातीतील कृमींपासून मनुष्याला फारसा गंभीर स्वरूपाचा विकार होत नाही.
कृमींपैकी ज्यांच्यामुळे रोग उत्पन्न होतात, त्यांचे वर्णन त्या त्या शीर्षकाखाली दिले आहे.
ढमढेरे, वा. रा.
या वर्गातील फॅसिओला हेपॅटिका कृमी मेंढ्या, गुरे व बकऱ्या यांच्या यकृतात व पित्तनलिकेमध्ये सापडतो. पॅरांफिस्टोमम सर्व्हाय हा गाईबैलांच्या रोमंथिकेत (रवंथ करणाऱ्या प्राण्यातील पोटाच्या पहिल्या कप्प्यात) विशेष आढळतो. यांशिवाय विशिष्ट जातींच्या कृमींमुळे निरनिराळ्या पशूंमध्ये होणाऱ्या रोगांची माहिती त्या त्या पशूंच्या नावांच्या नोंदींमध्ये दिली आहे.
पहा : जीवोपजीवन
गद्रे, य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/6/2020