पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूज एका पायावर आहे, की दोन्ही पायांवर आहे हे लक्षात घ्या. सूज एका पायावर असेल तर बहुधा 'स्थानिक' स्वरूपाचे म्हणजे त्या पायाशी संबंधित आजार असतात.
सूज दोन्ही पायांवर असेल तर, गर्भाररोग, हृदय, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार, कुपोषण-रक्तपांढरी, अन्नविषबाधा किंवा हत्तीरोगाची असते. म्हणून दोन्ही बाजूंस सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या. या सर्व आजारांची थोडीशी माहिती या पुस्तकात प्रकरणाप्रमाणे दिली आहे.
गर्भाररोग म्हणजे गरोदरपणात पायावर सूज येणे, लघवीत प्रथिने येणे, इ. लक्षणचिन्हांनी ओळखला जाणारा आजार. हा आजार गंभीर आहे, म्हणून वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
सुजलेल्या भागावर दाबून खड्डा पडतो की नाही हे तपासणे हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा. यासाठी पावलावर किंवा घोटयावर अंगठयाने जोराने दाबून पहा. बोट काढल्यावर खड्डा हळूहळू भरून येत असेल तर ही सूज 'पाणी जमून' आलेली आहे हे निश्चित. दोन्ही पायांवरची सूज असेल तर सर्व संबंधित आजारांत बोटाने दाबून खड्डा पडतो. म्हणजेच दोन्ही पायांवरची सूज ही बहुधा 'पाणी जमून' येते.
एका पायावरच्या पाणी जमून येण-या (म्हणजेच खड्डा पडणा-या) सुजेमागे प्रथमावस्थेचा हत्तीरोग, जंतुदोष, प्राणिदंश (उदा. सापाचा दंश), वावडे आणि त्या बाजूच्या रक्तप्रवाहात अडथळा (उदा. नीला बंद होणे) ही कारणे असतात. यांतले जंतुदोष, वावडे,हत्तीरोगाची प्रथमावस्था यांवर आपण प्राथमिक उपचार करू शकतो.
एका पायावरची खड्डा न पडणारी (म्हणजे घट्ट) सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
पायावरच्या सुजेमागे अनेक गंभीर कारणे असतात. तरी जंतुदोष व हत्तीरोगाच्या संसर्गाच्या प्रदेशात ही सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी कारणे आहेत. त्यावर आपण प्राथमिक उपचार करू शकतो. मात्र रोगनिदान करूनच उपचार करावा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/8/2020
हिरड्यांना होणार्या (पेरिओडेंटल) रोगांपैकी जिंजिव्...
गलशोथ : (व्हिन्सेंट गलशोथ; मुखपाक). गिलायू (टॉन्सि...
आरक्त चर्मक्षय : (त्वचाक्षय). त्वचेतील संयोजी ऊतका...
पोटात द्रव साठल्यास त्या अवस्थेला ‘जलोदर’ म्हणतात....