शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस्था व हृदय जास्त काम करून प्राणवायू पुरवण्याची धडपड करतात. यालाच आपण 'दम लागणे' म्हणतो. यात श्वास जोरात, वेगाने व खोलवर चालतो व हृदयाची धडधड जाणवते.
रक्तपांढरी : रक्तामध्ये रक्तद्रव्याचे प्रमाण कमी असेल (ऍनिमिया, रक्तक्षय) तर रक्ताची प्राणवायू वाहण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढवून वेळ मारून नेण्याचा हृदय प्रयत्न करते. बहुधा असा दम नेहमीपेक्षा थोडेसे जास्त काम पडले तर लगेच लागतो. विश्रांतीने हा त्रास कमी होतो. या आजारात शरीर निस्तेज व पांढरट दिसते.
हृदयामध्ये काही दोष असला, झडपा नीट मिटत नसल्या किंवा कप्प्यांना छिद्र असेल किंवा खुद्द हृदयाचा रक्तपुरवठा नीट व पुरेसा होत नसेल तर हृदयातर्फे रक्त ढकलण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा व्हावा तितका होत नाही. थकवा येणे, जास्त श्वास लागणे, धडधड होणे वगैरे अनुभव येतो. कित्येकदा ओठ किंवा कातडी निळसर दिसते (म्हणजेच प्राणवायू अपुरा पडतो).
श्वासनलिका व फुप्फुसे यांमध्ये काही दोष असेल तर रक्तद्रव्य पुरेसे असून व हृदय व्यवस्थित चालूनदेखील दम लागतो. कारण रक्तामध्ये प्राणवायू मिसळणे आणि कार्बवायू बाहेर काढणे हे काम नीट होत नाही. श्वसनसंस्थेत पुढीलप्रमाणे अनेक दोष असू शकतात. एक म्हणजे सतत धूम्रपानामुळे श्वासनलिका व पुढे निघणा-या नळया बारीक होत जातात. यामुळे हवेचा पुरवठा जास्त दाबाने करावा लागतो. नळी बारीक झाल्याने हवेचा पुरवठा कमी पडतो. तसेच वावडे (ऍलर्जी) किंवा कोंदट पावसाळी हवेमुळे श्वासनलिका व त्यापुढच्या नळया आकसून लहान होतात. यामुळे हवेचा पुरवठा कमी पडतो. फुप्फुसांचा मोठा भाग क्षयरोग, न्यूमोनिया, कॅन्सर वगैरेंमुळे निकामी झाला असेल तरीही हवेचा पुरवठा कमी पडतो. याशिवाय फुप्फुसांच्या आवरणामध्ये पाणी साचले असेल (उदा. क्षयरोग) किंवा पू झाला असेल तर फुप्फुसांमध्ये हवा खेळण्यात अडथळा येऊन दम लागतो.
दम लागण्याचे निश्चित कारण शोधण्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/8/2020
रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन...
हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. याचा संसर्ग मुला...
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...
उन्हाळे लागणे : वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब म...