रोगप्रतिबंध हे एक अगदी महत्त्वाचे ध्येयधोरण आहे. रोगांना व त्यांच्या दुष्परिणामांना प्रतिबंध कसा करायचा हे या पुस्तकात प्रत्येक आजाराबरोबर देण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणात रोगांच्या अनेकपदरी कारणपरंपरेनुसार प्रतिबंधही कसा अनेक पातळयांवर करता येईल हे पाहू या. रोग व रोगांचे दुष्परिणाम यांचा प्रतिबंध मुख्यत: पाच पातळयांवर समजून घेऊ या.
समाजाचे एकूण जीवनमान, पोषण इत्यादी सुधारल्यावर एकूण आजारांची संख्या व प्रमाण कमी होते. ही रोगप्रतिबंधाची अगदी प्राथमिक महत्त्वाची पायरी आहे.
विशिष्ट आरोग्यसमस्येच्या प्रतिबंधासाठी विशिष्ट वैयक्तिक काळजी घेणे म्हणजे रोगविशिष्ट संरक्षण. उदा. निरनिराळया रोगांविरुध्दची लसटोचणी, डोक्याला मार लागू नये म्हणून वाहनचालकाने हेल्मेट वापरणे, रातांधळेपणा येऊ नये म्हणून मुलांना 'अ'जीवनसत्वाचा डोस देणे, इत्यादी. रोग झाल्यावर करायच्या उपाययोजनेपेक्षा असे रोगविशिष्ट आणि व्यक्तिविशिष्ट संरक्षण केव्हाही चांगले. अनेक आजारांसाठी हा मुद्दा लागू होतो.
पूर्वी सांगितलेल्या दोन संरक्षणाच्या फळया रोग व्हायच्या आधी प्रतिबंधक म्हणून आवश्यक आहेत. पण काही कारणांनी रोग झालाच तर लवकर रोग शोधून त्यावर त्वरित उपचार करावा. उदा. क्षयरोग, कर्करोग इत्यादी गंभीर प्रारंभिक अवस्था शोधून लगेच उपचार केल्याने त्याचे दुष्परिणाम टळू शकतात.
अनेक आजारांच्या बाबतीत ही पायरी फार महत्त्वाची आहे. क्षय, कुष्ठरोग, कर्करोग,न्युमोनिया, मेंदूसूज, जठरदाह, इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत लवकर निदान आणि लवकर उपचार चालू होणे महत्त्वाचे आहे. या पुस्तकातले रोगनिदानाचे तक्ते वापरून तुम्हाला अनेक आजार लवकर ओळखता येतील. तापाचे उदाहरण घ्या. तापामागे अनेक प्रकारचे आजार असतात. त्यातले न्यूमोनिया, क्षय, मेंदूसूज, विषमज्वर, मुत्रमार्गाचा जंतुदोष, हत्तीरोग, इत्यादी आजार वेळीच ओळखणे आवश्यक असते. हे शक्य झाले तरच तुमचे काम उपयुक्त ठरेल.
काही वेळा आजाराचा जो दुष्परिणाम व्हायचा असतो तो होऊन गेलेला असतो. फक्त त्याची तीव्रता व प्रमाण कमी करता येते. उदा. भाजलेल्या रुग्णांच्या बाबतीत जखमा भरताना अवयव आखडणार नाहीत याची काळजी घेता येते. नुकसान टाळण्याची अशी अनेक उदाहरणे आहेत.
काही वेळा रोग किंवा त्याचे दुष्परिणाम पूर्ण स्थिर झालेले असतात. अशा वेळी त्या व्यक्तीचे शक्य तेवढे पुनर्वसन करणे आवश्यक असते. म्हणजे ती व्यक्ती त्या आजाराच्या सामाजिक दुष्परिणामांपासून काही प्रमाणात तरी वाचू शकते. उदा. कुष्ठरोगपीडित व्यक्तींचे पुनर्वसन, पोलिओ झालेल्या अवयवांना कृत्रिम साधने देणे, इत्यादी. मनोरुग्णांसाठी योग्य प्रशिक्षण व कामधंदा, इ.
रोगप्रतिबंध असा विविध पातळयांवर असतो. आपल्या मनोवृत्तीतच रोगप्रतिबंध बाणवायला पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/8/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...