हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा आजार एक प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. कातडीबरोबरच हा आजार चेतातंतूंवरही दुष्परिणाम करतो. कातडीवर न खाजणारे चट्टे व बधिरता येते. नंतरनंतर तळव्यावर व्रण होणे, नाक बसणे,हातापायाची बोटे आखडणे किंवा वाकडी होणे, इत्यादी लक्षणे कुष्ठरोगात आढळतात. हा आजार आनुवंशिक नाही. हा आजार सांसर्गिक प्रकारच्या रुग्णांच्या संसर्गाने एकमेकांत पसरतो. यावर आता प्रभावी औषधे निघाल्याने बहुतेकांचा आजार सहा महिने ते दीड वर्ष या काळात पूर्ण बरा होतो. त्यासाठी कायमचे नुकसान होण्याआधीच या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून उपचार व्हायला पाहिजेत. कुष्ठरोग हा आजार मायको लेप्री नावाच्या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू खूप सावकाश वाढतात. म्हणून हा आजारही खूप सावकाश वाढतो. (2 ते 5 वर्ष लागू शकतात). या आजाराचा प्रसार खूपच मर्यादित असतो. मुळात 98% व्यक्तींना या आजाराविरुध्द उत्तम प्रतिकारशक्ती असते. म्हणजे फक्त 2% जणांना हा आजार होऊ शकतो. त्यातही केवळ सांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोग-बाधित व्यक्तींकडूनच हे जंतू पसरू शकतात. उपचार सुरु केल्यावर महिन्याभरातच हे रुग्ण असांसर्गिक होतात.
सांसर्गिक कुष्ठ रुग्णांच्या श्वसनावाटे हे जंतू पसरतात. श्वासोच्छ्वासातून जंतू तर पसरतातच,पण शिंकण्या खोकण्यातून विशेष संख्येने जंतू उडतात. क्षयरोगाप्रमाणेच कुष्ठरोग पसरतो त्वचेतून संपर्काने तो पसरत नाही. आपली राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण योजना ही आधुनिक उपचारांमुळे अत्यंत यशस्वी झाली आहे. गेल्या दशकात कुष्ठरोगाचे प्रमाण हजारी 4-5 पासून आता दहा हजारात 4-5 इतके म्हणजे दहावा हिस्सा झाले आहे. कुष्ठरोग नियंत्रण योजना चालविणारे पॅरेमेडिक कर्मचारी आणि रिफॅम्पिसीन औषधाचे संशोधक यांना हे श्रेय जाते. ज्यांना अगदी एखादाच चट्टा आहे अशांनाही 'एक डोस उपचार' करण्यात येतो. बहुधा तरुणपणात किंवा मध्यमवयातच या रोगाची चिन्हे दिसतात. ज्यांना कुष्ठरोगाविरुध्द चांगली प्रतिकारशक्ती असते त्यांना सहसा हा आजार होत नाही. हा आजार दोन स्वरुपात उमटतो. सांसर्गिक आणि असांसर्गिक.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर, (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 ...
या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी 'हवेच्या दाबाचे' तंत्...
युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...