অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वासनलिकादाह

श्वासनलिकेची सुरुवात स्वरयंत्रापासून होते. यातून झाडाच्या फांद्यांप्रमाणे क्रमाक्रमाने लहान लहान उपनलिका निघून श्वासनलिकांचे एक जाळे तयार होते.

कारणे

श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे. श्वासनलिकादाहाची पुढीलप्रमाणे अनेक कारणे असू शकतात. जंतुदोष, जंतखोकला, धूम्रपान, प्रदूषित वातावरण,वावडे, इ. जिवाणूंप्रमाणे विषाणूहीश्वासनलिकादाह निर्माण करु शकतात. या आजारात आधी कोरडा खोकला येतो. नंतर नंतर थोडे बेडके पडतात. विशेषतः छातीच्या मधोमध थोडे थोडे दुखते. जंतुदोष असल्यास ताप येतो.

कारणानुसार उपचार

आजाराचे कारण ओळखून उपचार करणे आवश्यक आहे. धूम्रपान, प्रदूषण ही कारणे असल्यास नुसत्या औषधाने आजार बरा होणार नाही. शक्य तर ते कारण दूर करावे लागेल. वावडे (ऍलर्जी) असल्यास सुरुवातीला कारण ओळखणे अवघड असते. एखाद्या पदार्थाचा वारंवार संबंध येऊन दर वेळी असा विशिष्ट त्रास होणे, ही वावडयाची खूण असते. सर्दी-पडसे, घसासूज, फ्लू यांबरोबर (किंवा पाठोपाठ) येणारा श्वासनलिकादाह हा जिवाणू-विषाणू दाहामुळे असतो. विषाणू-जिवाणू यांपैकी कोणते कारण आहे हे ओळखणेही अवघड असते.

जिवाणूदोष टेट्रा किंवा कोझालच्या गोळयांनी बहुधा थांबतो. विषाणुदोषाचा आजार बहुधा आपोआप थांबतो.

कोरडा खोकला थांबत नसल्यास कोडीन गोळया द्या. पण बेडके पडत असल्यास कोडीन देऊ नये. कोडीनमुळे बेडके पडून जायला अडचण होईल. व्हिक्स,अमृतांजन, इत्यादी छातीला चोळल्याने काहीही फरक पडत नाही. वाफारा उपचार उपयुक्त आहे. एखाद्या भांडयात (शक्यतो चहाच्या किटलीत) गरम पाणी घेऊन डोक्यावर चादर घेऊन वाफारे छातीत घ्यावेत. असे सुमारे पंधरा मिनिटे करावे. त्यामुळे श्वासनलिकेतील बेडके सुटायला मदत होते. फुप्फुसाच्या इतर काही आजारांतही वाफा-यांचा चांगला उपयोग होतो. धूम्रपान किंवा प्रदूषणामुळे श्वासनलिका व उपनलिका कायमच्या अरुंद होतात. यावर कायमचा उपाय काही नाही, धूम्रपान थांबवल्यास पुढचे नुकसान तेवढे टळेल. श्वासनलिकादाहाचे आणखी एक कारण म्हणजे पोटातले जंत, हत्तीरोगाचे जंत, इत्यादी. जंतांच्या सूक्ष्म अवस्थेतल्या अळयांनी फुप्फुस व श्वासनळीचा सौम्यदाह होतो. या प्रकारात अनेक महिने टिकणारा कोरडा खोकला, थोडासा दम लागणे, कधीकधी बारीक ताप असणे,इत्यादी लक्षणे आढळतात. रक्तातल्या विशिष्ट पांढ-या पेशींची संख्या वाढलेली आढळते. आपण याला 'जंतखोकला' असे म्हणू या. यावर बेंडेझोल व डाकाझिनच्या गोळया हा उपायआहे. लहान मुलांमध्ये जंतखोकला जास्त प्रमाणात आढळतो. असा खोकला बेंडेझोल गोळयांनी थांबतो.

खोकला आणि खोकल्याची औषधे

दुकानातील खोकल्यावरची औषधे हा एक गोंधळाचा प्रकार आहे. यातली बरीच औषधे निरुपयोगी व महाग असतात. खोकल्याचे कारण व त्यावर असणा-या औषधांची संख्या मर्यादित आहे. आधी आपण खोकल्यावर परिणाम कसा व कोणत्या औषधांनी होऊ शकतो हे पाहू या. खोकल्यावर 3 प्रकारचे औषधगट काही प्रमाणात उपयोगी आहेत. गट 1 - घशाची खवखव कमी करणारी औषधे : ज्येष्ठमध, साखर, माल्ट किंवा मधातली औषधे (सिरप), ग्लिसरिन, इ. औषधे घशाचा दाह कमी करतात व खोकला सौम्य करतात. हाच परिणाम खडीसाखर किंवा गूळ चघळल्याने होतो. बाळहिरडा चघळल्यास लाळ सुटून घसा ओला होतो तसेच हिरडा दाह कमी करतो. दुकानात खोकल्यासाठी आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळया मिळतात. या गोळयांमध्ये साखर आणि मुख्यत: मेंथॉल असतो. ही सर्व औषधे घशाच्या खोकल्यापुरतीच मर्यादित आहेत. गट 2 - कफ, बेडका सुटण्यास मदत करणारी औषधे. यातही दोन उपप्रकार आहेत. एक गट आहे श्वासनलिकांमध्ये पाझर वाढवणारा. अडुळसा या प्रकारचे काम करतो. दुसरा गट आहे कफ पातळ करणारा. यात मुख्यत: ब्रोमेक्झीन हे औषध आहे. अडुळशामध्ये ब्रोमेक्झीन हे एक प्रमुख औषध असते. श्वासनलिका दाहामुळे होणा-या खोकल्यासाठी ही औषधे उपयुक्त आहेत. यापैकी अडुळसा तर आपण घरीही लावू व वापरू शकतो. सोडियम पोटॅशियम क्षार ही पाणी सुटावण्याचे काम करतात. म्हणूनच अशा खोकल्यात जास्त मीठ पाणी घेत राहिल्यास उपयोग होतो. गट 3 खोकला दाबणारी औषधे- मेंदूतील खोकला-केंद्रावर नियंत्रण वाढवून खोकल्याची क्रिया मंदावणारी ही औषधे आहेत. या औषधांमध्ये कोडीन हे एक प्रमुख औषध आहे. याच गटात इतरही काही औषधे आहेत. गट 4 : श्वासनलिका सैलावणारी औषधे - ही औषधे उदा. सालमाल, अमिनो. श्वासनलिका रुंदावून बेडका बाहेर काढायला मदत करतो. जाताजाता - इंग्रजीत कफ म्हणजे खोकला, पण मराठीत कफ हा शब्द 'बेडका' या अर्थाने वापरतात.

खोकला आणि आयुर्वेद

सर्वसाधारण खोकल्यासाठी सितोपलादी चूर्ण एक-दीड चमचा द्यावे. कोरडा खोकला असताना हे चूर्ण एक चमचा तुपात द्यावे. खोकल्याची ढास पुष्कळ असल्यास लवंगादी वटी,खदिरादी वटी (150 मि.ग्रॅ.) तोंडात चघळून चांगला उपयोग होतो. सर्वसाधारण पुन्हा पुन्हा येणा-या खोकल्यासाठी कण्टकारी वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीपासून तयार केलेला अवलेह किंवा रसापासून तयार केलेले आसव गुणकारी असते. अडुळशापासून केलेली औषधेही उपयुक्त आहेत. कण्टकारी ही वनस्पती जमिनीबरोबर पसरणारी काटेरी वनस्पती आहे. ती मार्च ते मे या काळात भरपूर येते. जांभळट फुले, पिवळी छोटया वांग्यासारखी फळे ह्यावरून ती ओळखू येते. या वनस्पतीचा रस कमी असल्याने आसवापेक्षा अवलेह किंवा साखर करून ठेवता येते. अवलेह एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ 7 ते 10 दिवस वापरावा. आसव दोन चमचे + पाणी दोन चमचे असे सकाळ-संध्याकाळ 3 ते 7 दिवस वापरावे. खोकल्यासाठी आणखी एक उपचार आहे. बिब्ब्याला खिळा टोचून खिळयाला लागणारे तेल कोमट दुधात मिसळा. असे अर्धा कप दूध दहा दिवस रोज द्यावे. कोरडा खोकला हा तूप, बाळहिरडा, खडीसाखर, इत्यादी घरगुती उपायांनी आटोक्यात येऊ शकतो.

खडीसाखर किंवा बाळहिरडा चघळत राहिल्याने ठसका ब-याच प्रमाणात कमी होतो. मध + हळद चाटणानेही कोरडा खोकला आटोक्यात येतो.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate