तुमच्या आजूबाजूला चाललेल्या खालील कामात कोणकोणते धोके असतात त्यांचा अंदाज घ्या व लक्ष ठेवा.
शेती व्यवसाय
फवारणी, ट्रॅक्टर चालवणे, ऊसतोड, गोठयातले काम, भातलावणी, रासायनिक खतांचा वापर, कंपोस्ट खत हाताळणे, गोबर गॅस सफाई काम, कुक्कुटपालन, बकरीपालन व इतर प्राणीपालन, जळण फाटा गोळा करणे, कापणी यंत्र, चारा मशीन चालवणे, निंदण-खुरपण इ.
इतर व्यवसाय
मिठागरे, मासेमारी, मासेविक्री, मटण दुकाने, घराचे रंगकाम, सतत ऍसबेस्टॉस पत्रे हाताळणारे, स्वयंपाकघर, धुणीभांडी, वेल्डिंग, ग्राइंडर मशीनकाम, मोटार मेकॅनिक, पीठ गिरणीचालक, झाडूवाले, खूप वेळ बसून राहावे लागणारे दुकानदार, वाहनचालक, न्हावी,लोहार, चांभार, सुतार, गादी पिंजारी, वायरमन, लाकूड-कटाई कारखाने, वीट-भट्टी कामगार, चहाच्या दुकानावरील मुले, कोंबडीपालन कामगार, विहीर खाणकाम, बिडी कामगार, ओझेवाहू हमाल, खडीमशीन, इ.
असे अनेक व्यवसाय, कामे आजूबाजूला चालू असतील. त्यांना काय आजार, धोके होतील हे लक्षात घ्या. काय काळजी घेता येईल याचा अभ्यास करा आणि त्यांना सुरक्षित जीवनासाठी मदत करा.
तुम्हांला व्यवसायजन्य आजारांबद्दल काही करायचे असेल तर खालील मुद्दे लक्षात घ्या.
व्यवसायांत, कारखान्यांत चालणारे काम नीट समजावून घ्या.
धोकादायक, त्रासदायक काम लक्षात घ्या आणि काय प्रकारे धोका होतो हे समजावून घ्या.
कामगारांची तपासणी होते का? कधी? कितीवेळा? कशी? ही तपासणी पुरेशी आहे का?तपासणी होत नसल्यास कारण काय?
वसायामुळे मनुष्य एका विशिष्ट परिस्थितीत दीर्घकाळ राहतो व वागतो. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर निश्चितच होतो. असे सर्व आजार 'व्यवसायजन्य' आजार या गटात मोडतात. या आजारांची यादी अगदी लांबलचक आहे. तसेच प्रत्येक व्यवसायाप्रमाणे विशिष्ट प्रकारचे आजार निर्माण होतात. या प्रकरणात प्रत्येक व्यवसायजन्य आजाराचा तपशील देण्यापेक्षा महत्त्वाचे सांगणे हे आहे, की व्यवसायजन्य आजार होऊ नयेत म्हणून व्यावसायिक परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणावे लागतात. हे असे चालणारच अशी भूमिका न घेता जाणीवपूर्वक आरोग्यमान उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
आधी आपल्या सोयीसाठी आपण व्यवसायजन्य आजारांची गटवारी करू या.
शेतीव्यवसायजन्य आजार व अपघात
कारखान्यांमधले व्यवसायजन्य आजार व अपघात, रासायनिक दुष्परिणाम, गोंगाट,ऊष्णता, इत्यादी भौतिक घटकांचे दुष्परिणाम, यंत्रांमुळे होणारे आजार व अपघात, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने होणारे दुष्परिणाम, किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम, जैविक घटकांमुळे होणारे दुष्परिणाम, मानसिक ताण.
इतर व्यवसायजन्य आजार :
यांत मुख्यत: वैयक्तिक किंवा छोटया स्वरूपात केल्या जाणा-या उद्योगधंद्यांचा आणि शेती किंवा कारखानदारी गटात न मोडणा-या व्यवसायजन्य आजारांचा समावेश होतो. (उदा. वेश्या, वाहनचालक, वाहतूक पोलिस, मोटार मेकॅनिक,पिठाच्या गिरण्यांतील कामगार, पिंजारी, विशिष्ट सेवा पुरवणारे व्यवसाय इ.)
या सर्व व्यवसायजन्य आरोग्यसमस्यांमध्ये अपघात आणि आजार असे आणखी दोन गट करता येतील. अपघात आणि व्यवसायांचा लगेच संबंध जोडता येतो, पण हळूहळू तयार होणा-या आजारांचा व्यवसायाशी संबंध जोडताना अनेक प्रकारचे अभ्यास होणे आवश्यक असते. दीर्घ संशोधनानंतर व्यवसायजन्य आजार व अपघातांची यादी आता खूप मोठी झाली आहे. कारखान्यांना (म्हणजे फॅक्टरी ऍक्टखाली नोंद झालेले उद्योग) यासाठी काही नियम व बंधने आहेत. हे आजार होऊ नयेत म्हणून कारखान्याच्या व्यवस्थापनाने बंधने पाळणे कायद्याने अनिवार्य आहे. आजारांची व अपघातांची नोंद करणे व प्रशासनाला कळवणेही बंधनकारक आहे. असे असले तरी अंमलबजावणी चांगली नसते आणि कामगारही या दृष्टीने आवश्यक तितके जागरूक नसतात. म्हणून कारखान्यातल्या व्यवसायजन्य आजारांची समस्या भेडसावणारीच आहे.
पण याहीपेक्षा भयंकर परिस्थिती शेतीतील व्यवसायजन्य आजार-अपघातांची आहे. इथे तर त्यांची 'व्यवसायजन्य' म्हणून दखल देखील घेतली जात नाही; मग तोडगा शोधणे तर लांबच. शेतीला व्यवसाय म्हणून योग्य मान्यता मिळाल्यावरच या आरोग्यसमस्यांची दखल घेण्याजोगी परिस्थिती तयार होईल. या प्रकरणात आपण शेतीव्यवसायजन्य आजारांची पण यादी तयार करू या. ही यादी कदाचित आकाराने लहान असेल पण शेतीव्यवसायातली लोकसंख्या मोठी असल्याने या प्रश्नाचे गांभीर्य जाणवायला पाहिजे.
शेतीतील काही 'अपघातांची' चर्चा 'अपघात प्रथमोपचार' या प्रकरणात स्वतंत्रपणे केली आहेच.
ही यादी अभ्यासाने आणखी वाढवता येईल. यातल्या प्रत्येक आरोग्यसमस्येवर शेती उत्पादन व प्रक्रियांचा नीट अभ्यास करून उत्तरे शोधणे आवश्यक आहे. काही समस्यांवर व्यवहार्य उत्तरे मिळतीलच असे नाही. (उदा. गाई-बैलांच्या शिंगांनी व खुरांनी होणा-या जखमा टाळणे अवघड आहे.) काही समस्यांवर उत्तरे निघू शकतील. उदा. कीटकनाशकांचा समतोल वापर करणे, यंत्रे निर्दोष बनवणे, पायात बूट घालणे, पाण्याचा योग्य पध्दतीने वापर करणे (उदा. ठिबक सिंचनाचा पर्याय.) यामुळे अनेक आजार व अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. स्त्रियांचे शेतीतले काम जास्त कष्टाचे व वाकून करायच्या पध्दतीचे असते. स्त्रियांच्या कंबरदुखीचा या व इतर अनेक कारणांशी संबंध आहे.
या वाचनातून 'व्यवसायजन्य' आजारांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन तयार व्हायला पाहिजे.