हा बहुधा जन्मजात दोष असतो. यात मूत्रनलिकेत काही दोष नसतो पण बाहेरचे लघवीचे छिद्र खूप बारीक असते. त्यामुळे लघवी हळूहळू व थेंबथेंब होते. काही मुलांच्या बाबतीत लघवी शिश्न मुंडाबरोबर साठून त्वचेला फुगार येतो. कधीकधी लघवीचे छिद्र खूप बारीक असते किंवा जंतुसंसर्गामुळेही बारीक होऊ शकते. त्यामुळे लघवी करण्यास खूप वेळ लागतो. लघवीची धार लांब न पडता जवळ किंवा पायात पडते. हळूहळू किंवा थेंब थेंब लघवी होते
याचा उपचार शस्त्रक्रियेने करतात. लघवीचे छिद्र लहान होण्याचे आणखी एक कारण म्हणजे शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा चिकट असणे. हे ही जन्मजात असते किंवा जंतुसंसर्गाने होते. यात शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा मागे येत नाही. लघवी करताना या त्वचेत लघवी साठून फुगा येतो व हळूहळू व थेंबथेंब लघवी होते. शस्त्रक्रिया करून हे छिद्र मोठे करणे किंवा त्वचेचा काही भाग काढून टाकणे हाच यावरचा उपाय आहे. मुस्लिम समाजात सुंता करण्याची पध्दत आहे. सुंता म्हणजे शिश्नावरच्या त्वचेचा काही भाग कापून काढून टाकणे.
शस्त्रक्रिया करायच्या आधी छिद्र मोठे होण्यासाठी खालील उपाय करून पहा.
खोबरेल तेल (किंवा तीळ तेल) कोमट करून ते शिश्नाच्या टोकाला हलके चोळावे. यानंतर त्वचा थोडी मागे सारण्याचा प्रयत्न करावा. असे दिवसातून चार-पाच वेळा करावे. याप्रमाणे सात-आठ दिवस केल्यावर काही मुलांच्या बाबतीत छिद्र लघवीपुरते मोठे होऊ शकते. याने उपयोग होतच नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे नेणे आवश्यक आहे.
लघवीचे छिद्र बारीक असेल तर आणखी एक धोका संभवतो. लैंगिक संबंधात एकदा मागे गेलेली त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे न येता मागेच अडकू शकते. ही त्वचा मागे न गेल्याने व ती वाट मुळात बारीक असल्याने पुढचा भाग सुजतो. यामुळे त्वचा पुढे येणे आणखीनच अवघड बनते. अशा वेळी ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/7/2020