यातील अंडकोशांचे काम म्हणजे दोन्ही बीजांडांना योग्य संरक्षण व थंडपणा देणे. इतर शरीरापेक्षा थंड तपमान मिळावे म्हणूनच बीजांडे थोडीशी बाहेर आणि वेगळया पिशवीत असतात. या रचनेऐवजी बीजांडे शरीरात-पोटात असती तर उबेमुळे त्यातून शुक्रपेशी निर्माण झाल्या नसत्या.
बीजांडाचे काम म्हणजे शुक्रपेशी निर्माण करणे. एका लैंगिक संबंधात किंवा वीर्यपतनात (सुमारे 2-3 मि.लि.) काही लक्ष शुक्रपेशी असतात. मुलगा वयात आल्यापासून ते म्हातारपणापर्यंत अब्जावधी शुक्रपेशी यातून निर्माण होतात. स्त्रियांमध्ये सुमारे 45 वर्षे वयानंतर स्त्रीबीजे निर्माण होण्याचे थांबते, पण पुरुषांत मात्र ही क्रिया कमीअधिक प्रमाणात टिकून राहते.
बीजांडाचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे पुरुष-संप्रेरके निर्माण करणे. पुरुष-संप्रेरकांमुळे'पुरुषी' खाणाखुणा निर्माण होतात. छातीवर मध्ये केस, दाढीमिशा, लिंगाभोवती केसांची विशिष्ट रचना, पुरुषी आवाज, हाडापेराची ठेवण, स्तनांची वाढ न होणे, चरबीपेक्षा स्नायूंचे प्रमाण जास्त असणे, लैंगिक इच्छा, इत्यादी सर्व गोष्टी या संप्रेरकांमुळेच घडतात. पुरुष बीजांडाचे काम सुमारे 14-15 वर्षाच्या आत सुरु होते आणि एक-दोन वर्षातच पूर्ण जननक्षमता येते.
वीर्यनलिकांचे काम म्हणजे शुक्रपेशी बीजांडातून मूत्रनलिकेपर्यंत आणणे. दोन्ही बाजूंच्या वीर्यनलिका जांघेतून ओटीपोटात शिरतात इथे त्या प्रॉस्टेट ग्रंथीत शिरून मग मूत्रनलिकेत उघडतात. प्रत्येक वीर्यनलिकेच्या या शेवटच्या टोकाजवळ एकेक वीर्यकोश असतो. यांचे काम म्हणजे वीर्य साठवणे आणि लैंगिक संबंधाच्या शेवटी वीर्य दाबाने बाहेर फेकणे. हा दाब निर्माण होण्यासाठी हे वीर्यकोश स्नायूंनी बनलेले असतात.
प्रॉस्टेट ग्रंथी ही लहान लिंबाच्या आकाराची असते. ही ग्रंथी मूत्राशयातून निघणा-या मूत्रनलिकेच्या भोवतीच असते. म्हणजेच मूत्रनलिका या ग्रंथीतून पुढे जाते. वीर्यनलिकाही या ग्रंथीतूनच मूत्रनलिकेत उघडतात. या ग्रंथीतून एक स्त्राव पाझरतो. म्हातारपणी या ग्रंथीची वाढ होऊन घट्ट गाठ तयार होऊ शकते. यामुळे लघवीच्या तक्रारी निर्माण होतात. या ग्रंथीत कर्करोगही निर्माण होऊ शकतो.
शिश्न व मूत्रनलिकेसंबंधी आपण पूर्वी थोडी माहिती घेतलीच आहे. शिश्नाचा टोकाचा भाग बोंडासारखा गोलसर असतो. त्यावरची त्वचा मागेपुढे होऊ शकते. बोंडावरची ही त्वचा आणि टोकाचा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. लैंगिक इच्छा निर्माण होण्यात ही संवेदना महत्त्वाची आहे. शिश्नात मूत्रनलिकेच्या आजूबाजूस जाळीदार पिशव्या असतात. लैंगिक इच्छेच्या वेळी या पिशव्यांत रक्त भरते. त्यामुळे शिश्नाची लांबी, आकार वाढून ते ताठ होते (इंद्रिय उत्थापन). संबंधानंतर या जाळया परत रिकाम्या होऊन शिश्न लहान होते.
पुरुष जननसंस्थेचे मुख्य काम म्हणजे प्रजनन आणि शिश्नावाटे मूत्रविसर्जन. या संस्थेच्या आजारांबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे.
जननसंस्थेच्या आजारांपैकी लिंगसांसर्गिक आजारांची चर्चा वेगळया प्रकरणात केली आहे. यागटाशिवाय जननसंस्थेच्या इतर आजारांची माहिती इथे दिली आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020