अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस हा अशा प्रकारच्या किडणी रोग आहे, ज्यात मुख्य करून शरीरावर सूज येणे, रक्तदाब वाढणे आणि लघवीतून प्रथिने आणि रक्तकण जाणे दिसून येते. हा रोग कोणत्याही वयात होऊ शकतो, पण मुलांच्यात हा रोग जास्त आढळतो. मुलांच्या शरीर आणि चेहऱ्यावर सूज आणि लघवी कमी होणे ह्याची अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस आणि नेफ्रोटिक सिंड्रोम हि मुख्य कारणे आहेत.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस हा मुलांच्यात सर्वाधिक आढळणारा रोग आहे. सुदैवाने या रोगामुळे किडणी कायमची खराब होण्याची शक्यता खूप कमी असते.
हा रोग केव्हा होऊ शकतो ?
सर्वसाधारणपणे बीटाहोमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय नावाच्या विषाणूंमुळे गळ्यात होणाऱ्या संसार्गानंतर (खोकला) किंवा त्वचेला झालेल्या संसार्गानंतर (फोड किंवा पू) नंतर मुलांच्यात हा रोग दिसून येतो. अशा तऱ्हेचा संसर्ग झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर ह्या रोगाची लक्षणे दिसू लागतात.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीसची लक्षणे
- सर्वसाधारणपणे हा रोग ३-१२ वयोगटातल्या मुलांच्यात जास्त दिसून येतो.
- सुरुवातीला सकाळच्या वेळी डोळ्यांच्या खाली आणि चेहऱ्यावर सूज येते. हा रोग वाढल्यानंतर पूर्ण शरीरावर सूज येते.
- लघवी कोकाकोलासारख्या लाल रंगाची आणि कमी प्रमाणात होते.
- ६०-७० रोग्यांच्यात रक्तदाब वाढलेला दिसतो.
काही रुग्णांमध्ये दिसणारी गंभीर स्वरुपाची लक्षणे
- हा रोग गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे काही रुग्णांमध्ये किडणीची कार्यक्षमता कमी होते अशा रुग्णांमध्ये सूज वाढल्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो.
- किडनी जास्त खराब झाल्यावर पोटात दुखणे, उलट्या, मळमळणे व अशक्तपणा यासारखे त्रास होतात.
- रक्ताचा दाब जास्त वाढल्यामुळे शरीराला ताठरपणा येऊन रुग्ण बेशुद्धही पडू शकतो.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीसचे निदान
- या रोगाच्या निदानासाठी रोगाची लक्षणे महत्वाची असतातच, शिवाय रुग्णतपासणी बरोबरच लघवी व रक्त तपासणी करून घेणे आवश्यक असते.
- किडणीला सूज आल्यामुळे लघवीत प्रोटीन, रक्तकण आणि श्वेतकणांची उपस्थिती
- ५०% रुग्णांमध्ये रक्तात क्रिअॅटिनीन आणि युरियाचे प्रमाण सामन्यापेक्षा जास्त आढळते.
- बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे एएसओ टायटर (ASO Titer) चे प्रमाण जास्त होते. हे ह्या रोगाचे निदान करण्यास उपयोगी पडते.
- किडणीची सोनोग्राफी अभ्यासताना या रोगात किडणीला सूज व तिच्या आकारात वाढ झाल्याचे दिसून येते. किडणीच्या सोनोग्राफीत लघवी लाल आणि कमी होण्याच्या इतर कारणांची मीमांसा होऊ शकते.
- याशिवाय आवश्यकतेनुसार काही रुग्णांमध्ये काही विशिष्ट तपासण्या (C-3, ANA, ANCA इ.) सुद्धा कराव्या लागतात.
जर रोग खूप गंभीर असेल तर अशा रुग्णांमध्ये किडणीच्या सुजेच्या कारणांचे खोलवर निदान करण्यास, किडणीची बायोप्सी घेऊन तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस किती गंभीर रोग आहे ?
बहुतांश रुग्णांमध्ये आठ ते दहा दिवसात लघवीचे प्रमाण हळूहळू वाढायला लागते. शरीरावरची सूज कमी होऊ लागते व किडनी काही काळातच पूर्णपणे बरी होते. या रोगामुळे किडणी पूर्णतः निकामी होईल अशी शक्यता फार कमी असते. लघवीतून रक्तकण आणि प्रोटीन सामान्यतः दोन ते तीन महिन्यांपर्यंत जातात.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीसचे उपचार
- हा रोग बॅक्टेरियाच्या संसर्गाने सुरु होतो आणि त्याच्या उपचारांसाठी अँटीबायोटिक्स दिली जातात.
- सूज कमी करण्यासाठी मीठ व पाणी कमी घेण्याचा सल्ला दिला जातो.
- बऱ्याच रुग्णांना लघवीचे प्रमाण वाढवण्याकरता विशिष्ट प्रकाच्या (डाययुरेटिक) औषधांची आवश्यकता असते.
- ५० ते ६०% रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध घ्यावे लागते.
- ५% पेक्षाही कमी रुग्णांमध्ये कमी लघवी, जास्त सूज, धाप लागणे, रक्तात युरिया व क्रिअँटिनीनचे प्रमाण जास्त झाल्याने डायलिसीसची आवश्यकता आहे.
- या रोगाच्या सुरुवातीच्या १ ते २ आठवड्याच्या कालावधीत जास्त त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब व शारीरिक आरोग्याचा विचार करून उपचार करून घेणे आवश्यक असते.
रोगाचा प्रतिकार / कोणती काळजी घ्यावी ?
बऱ्याच रुग्णांना किडणीचा हा रोग मुख्यतः स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संसर्गाने किंवा त्वचेच्या संसर्गामुळे होतो. परंतु संसर्ग झाल्यावर त्यांपैकी कोणाला हा रोग होईल हे सांगणे कठीण असते. म्हणूनच सर्व रुग्णांनी उपचार घेणे आवश्यक असते. संसर्ग झाल्यावर चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या खाली सूज असल्यास, इलाज लवकरात लवकर सुरु करावा.
हा रोग झाल्यावर भविष्यात किडणीचा त्रास होऊ शकतो का ?
हा रोग झाल्यानंतर बहुतांशी रुग्णांची किडणी थोड्याच काळात पूर्णतः बरी होते आणि भविष्यात ह्या प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नसते. परंतु खूप कमी रुग्णांची किडणी पूर्णपणे ठीक न झाल्याने भविष्यात उच्च रक्तदाब आणि क्रॉनिक किडणी फेल्युअरसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे हा रोग झाल्यावर सर्वच रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित रूपाने आपली तपासणी करून घेणे जरुरी आहे.
स्त्रोत : Kidney Education Foundation