शरीरातील जास्तीचे पाणी, मीठ आणि इतर क्षार लघवीद्वारे दूर करून शरीरातील ह्या पदार्थांचे संतुलन ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम किडणी करत असते. किडणी फेल्युअरमुळे हे नियंत्रणाच कार्य ठीक प्रकारे होत नाही. याचा परिणाम म्हणजे, किडणी फेल्युअर रोग्यांत चरबी, मीठ, पोटॅशियमयुक्त खाद्य पदार्थ वगैरे सामान्य प्रमाणात घेऊनही अनेकदा गंभीर प्रमाणात समस्या उत्पन्न होऊ शकते. अशा रोग्यांमध्ये कमी कार्यक्षम असलेल्या किडणीवर अधिक ओझे टाकणे वाचवण्यासाठी तसेच शरीरात पाणी, मीठ आणि क्षारयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाण कायम राखण्यासाठी आहारात योग्य ते परिवर्तन करणे आवश्यक असते. क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील यशस्वी उपचारात आहाराचे हे महत्त्व लक्षात घेऊन इथे आहारासंबंधी विस्तृत माहिती आणि मार्गदर्शन देणे गरजेचे वाटते. मात्र आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार निश्चित करणे योग्य ठरेल.
आहाराचे नियम
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या बहुतेक रोग्यांना साधारणपणे पुढीलप्रमाणे आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
- पाणी आणि द्रवपदार्थ सल्ल्यानुसार कमी प्रमाणात घेणे.
- आहारात सोडियम, पोटॅशियम अन फॉस्फरसचे प्रमाण कमी असायला हवे.
- प्रथिनांचे प्रमाण अधिक असता कामा नये. सामान्यपणे ०.८ ते १.० ग्रॅम / किलोग्रॅम म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रथिने दर दिवशी घेण्याचा सल्ल्या दिला जातो.
- कार्बोहायड्रेटस पूर्ण प्रमाणात (३५ ते ४० कॅलरी शरीराच्या किग्रॅम वजनाच्या प्रमाणात दरदिवशी) घेण्याचा सल्ला दिला जातो. तूप, तेल, लोणी, चरबीयुक्त आहार मात्र कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो.
पाणी आणि द्रवपदार्थ
किडणी फेल्युअरच्या रोग्यांना पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेण्याबाबत काळजी घेणे क गरजेचे आहे ?
किडणीची कार्यक्षमता कमी होण्याबरोबरच बहुतेक रोग्यांच्यात लघवीचे प्रमाणही कमी होऊ लागते. अशा अवस्थेत जर भरपूर पाणी घेतले तर शरीरात, पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सूज येते तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, जो जास्त वाढल्यास प्राणघातक ही ठरू शकतो.
शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले हे कसे जाणून घेता येते ?
सूज येणे, पोट फुगणे, श्वास लागणे, रक्तदाब वाढणे, थोड्या काळातच वजन वाढणे आदी लक्षणांच्या मदतीने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले आहे किंवा नाही हे जाणून घेता येते.
किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी किती पाणी प्यायले पाहिजे.
अशा रोग्यांनी किती पाणी घ्यावे, हे रोग्याला होणारी लाघवी आणि शरीरावर आलेली सूज लक्षात घेऊन ठरवले जाते. ज्या रोग्याला लाघवी पूर्ण प्रमाणात होत असेल तसेच शरीरावर सूजही येत नसेल, अशा रोग्यांना इच्छेनुसार पाणी आणि द्रवपदार्थ घेण्याची सूट दिली जाते.
ज्या रोग्यांत लघवीचे प्रमाण कमी असेल, शिवाय सूजही येत असेल, अशा रोग्यांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. साधारणपणे २४ तासांत होणाऱ्या एकूण लघवीच्या प्रमाणाएवढे पाणी पिण्याची सूट दिल्यास सूज वाढणे थांबवता येते.
पाणी कमी प्रमाणात घेण्यासाठी सहाय्यक उपाय
- प्रत्येक दिवशी वजन करणे : सल्ल्यानुसार कमी पाणी प्यायल्याने वजन स्थिर राहते. वजन जर अचानक वाढू लागले तर पाणी जास्त प्रमाणात प्यायले जात असल्याचे निदर्शनाला येते. अशा रोग्यांना पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो.
- जेव्हा खूप तहान लागेल तेव्हाही कमी प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे किंवा तोंडात बर्फाचा छोटा तुकडा ठेऊन तो चोखला पाहिजे. रोज जेवढे पाणी पिण्याची सूट दिली असेल तेवढ्याच प्रमाणात बर्फाचे छोटे छोटे तुकडे चोखल्याने तहान खूप प्रमाणात भागते.
- आहारात मिठाचे प्रमाण कमी करून तहान कमी करता येते. जेव्हा तोंड कोरडे पडू लागते तेव्हा चूळ भरून तोंड ओले केले पाहिजे. परंतु पाणी पिता कामा नये. च्वुइंगम, गोळ्या-चॉकलेट्स, खडीसाखर, ज्येष्ठमध अशा वस्तू चघळल्यास तोंडाची कोरड कमी करता येते.
- चहा पिण्यासाठी छोटा कप तसेच पाणी पिण्यासाठी छोट्या ग्लासचा उपयोग करावा.
- जेवणानंतर जेव्हा पाणी प्यायचे असेल तेव्हाच औषधेही घेतली पाहिजेत, ज्यामुळे औषध घ्यायच्यावेळी पुन्हा वेगळे पाणी प्यावे लागणार नाही.
- डॉक्टरांद्वारा २४ तासांत एकूण किती द्रवपदार्थ घेतले पाहिजेत याची सूचना रोग्यांना दिली जाते. हे प्रमाण फक्त पाण्याचेच नसते तर त्यात, पाण्याशिवाय इतर द्रवपदार्थ उदा. चहा, दुध, दही, ताक, ज्यूस, बर्फ, आईसक्रिम, सरबते, डाळीचे पाणी अशा सर्व पेयपदार्थाचा समावेश असतो. २४ तासांत घायच्या द्रवपदार्थांची गणना वरील सर्व द्रवपदार्थ आणि पाण्याचे प्रमाण मिळूनच केली जाते.
- रोग्याने कुठल्या न कुठल्या कामात गुंतून राहिले पाहिजे, नुसतेच स्वस्थ बसल्याने वारंवार आणि जास्त तहान लागते.
- मधुमेहाच्या रोग्यांमध्ये, रक्तात साखरेचे प्रमाण जास्त झाले तर जास्त तहान लागते, त्यामुळे मधुमेहाच्या रोग्यांची रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले तर तहान कमी लागते, जी पाणी कमी पिण्यात मदत करते.
रोगी योग्य प्रमाणातच पाणी/ द्रवपदार्थ घेऊ शकेल यासाठी कोणती पद्धत वापरण्याचा सल्ला दिला जातो ?
- रोग्याला जेवढे पाणी पिण्याचा सल्ला दिला असेल तेवढेच पाणी एका जगमध्ये रोज भरून ठेवले पाहिजे.
- रोगी ज्या प्रमाणात द्रवपदार्थ घेईल त्याच प्रमाणात, द्रवपदार्थ घेतलेल्या भांड्याने जगमधील तेवढेच पाणी बाहेर फेकून दिले पाहिजे. त्यामुळे रोग्याला जेवढ्या प्रमाणात द्रवपदार्थ घेण्याची सूट दिलेली असते तेवढ्याच प्रमाणात जगमध्ये पाणी संपेल.
- दुसऱ्या दिवशी ठरलेय मापानुसार जगमध्ये पुन्हा पाणी भरून, तेवढ्याच प्रमाणात पाणी पिण्याची सूट दिली जाते.
मीठ कमी असलेला आहार
किडणी फेल्युअरच्या रोग्यांना आहारात मीठ कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला का दिला जातो ?
शरीरात पाण्याचे तसेच रक्तदाबाचे योग्य प्रमाण कायम राखण्यात सोडीयम (मीठ) मदत करते शरीरात सोडीयमच्या योग्य प्रमाणाचे नियंत्रण किडणी करते. जेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा शरीरातून किडणीद्वारे योग्य क्षमतेत सोडीयम निघणे बंद होते, त्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू लागते.
शरीरात सोडीयम अधिक असल्यामुळे जाणवणाऱ्या समस्यांमध्ये जास्त तहान लागणे, सूज वाढणे, श्वास लागणे, रक्तदाब वाढणे, आदींचा समावेश आहे. हे त्रास थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किडणी फेल्युअरच्या रोग्यांना मिठाचा उपयोग कमी करणे अनिवार्य होते.
आहारात किती प्रमाणात मीठ घेतले पाहिजे ?
भारतात सामान्य व्यक्तीच्या आहारातील पूर्ण दिवसात घेतल्या जाणार्या मिठाचे प्रमाण ६ ते ८ ग्रॅमपर्यंत असते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मीठ घेतले पाहिजे. उच्च रक्तदाब आणि सूज असलेल्या किडणी फेल्युअरच्या रोग्यांना रोज ३ ग्रॅम मीठ घेण्याचा सल्ला दिला जातो.
कुठल्या आहारात मिठाचे (सोडियमचे) प्रमाण जास्त असते ?
जास्त मीठ / सोडीयमयुक्त आहार
- मीठ, खाण्याचा सोडा, चाट मसाला
- पापड, लोणचे, कोशिंबीर, चटणी
- खाण्याचा सोडा वा बेकिंग पावडर असलेले खाद्यपदार्थ (बिस्किटे, ब्रेड, केक, पिझ्झा, गाठी, भाजी, ढोकला, हंडवा)
- तयार नाष्ट्याचे शेव, चिवडा, चकली, मठरी यांसारखे चटपटीत पदार्थ, वेफर्स, पॉपकोर्न, खरे दाणे, चणे, काजू, पिस्ता वगैरे
- बाजारात मिळणारे खारट लोणी आणि चीज
- सॉस, कॉर्नफ्लेक्स, स्पॅगॅटी, मॅक्रोनी वगैरे
- मेथी, पालक, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, मुळा, बीट यांसारख्या पालेभाज्या
- खारी लस्सी, मसाला सोडा, लिंबू सरबत, नारळ पाणी
- औषधे : सोडीयम बायकार्बोनेट्सच्या गोळ्या, अँटासिड, लेग्झेटीव वगैरे
- कलेजी, किडनी, भेजा, मटण इ.
- कोलंबी, करंगी, खेकडा वगैरे मासे आणि सुके मासे
खाण्यात सोडीयमचे प्रमाण कमी करण्याचे उपाय
दररोज जेवणात मीठ कमी प्रमाणात घेणे तसेच पदार्थावर वरून घेता कामा नये. मात्र मिठाशिवाय पदार्थ बनवणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. अशा खाण्यात रोगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणातच वेगळे मीठ घालून घेऊ शकतो. या प्रकारे निश्चितपणे निर्धारित प्रमाणातच मीठ घेतले जाईल.
- जेवणातल्या पोळी, भाकरी, भात या पदार्थात मीठ घालू नये.
- आधी सांगितलेल्या सोडीयमचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू खाता कामा नयेत किंवा कमी प्रमाणात खाव्यात.
- जास्त सोडीयमवाल्या भाज्या, पालेभाज्या पाण्याने धुवून, उकळून, त्यातले पाणी फेकून दिल्याने ह्या भाज्यांतले सोडीयमचे प्रमाण कमी होते.
- मिठाचे प्रमाण कमी असलेल्या जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासाठी कांदा, लसून, लिंबू, तेजपत्ता, वेलची, जिरे, कोकम, लवंग, दालचिनी मिरची आणि केशराचा वापर करता येईल.
- मिठाच्या जागी कमी सोडीयमवाले मीठ (लोना) घेता कामा नये. लोनामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी जीवघेणे ठरू शकते.
कमी पोटॅशियम युक्त आहार
किडणी फेल्युअरच्या रोग्यांना आहारात कमी पोटॅशियम घेण्याचा सल्ला का दिला जातो ?
शरीराती हृदय आणि स्नायूंचे कार्य योग्य रीतीने होण्याकरिता पोटॅशियमचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये रक्तात पोटॅशियम वाढण्याचा धोका असतो.
रक्तात पोटॅशियमचे वाढलेले प्रमाण हृदय आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम करू शकते. पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यामुळे होणार्या जीवघेण्या धोक्यात; हृदयाचे ठोके कमी होत होत एकदम थांबणे आणि फुफ्फुसाचे स्नायू काम करत नसल्याने श्वास थांबणे यांचा समावेश होतो.
शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढण्याची समस्या जीवघेणी ठरू शकते, मात्र तरीही याची कुठलीही विशेष लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे याला “सायलेंट किलर” असे म्हणतात.
रक्तात साधारणपणे किती पोटॅशियम असते ? हे प्रमाण किती वाढणे चिंताजनक असते ?
सामान्यपणे शरीरात पोटॅशियमचे प्रमाण ३.५ ते ५.० mEq/L असते पण जेव्हा हेच प्रमाण ५ ते ६ mEq/L होते तेव्हा खाण्यापिण्यात सावधानता बाळगणे गरजेचे असते जेव्हा हेच प्रमाण ६.५ mEq/L पेक्षा जास्त वाढते तेव्हा ते भयावह असते आणि जेव्हा ते ७ mEq/L पेक्षा जास्त वाढते तेव्हा ते कोणत्याही क्षणी जीवघेणे ठरू शकते.
पोटॅशियमच्या प्रमाणानुसार खाद्यपदार्थांचे वर्गीकरण
किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये रक्तात पोटॅशियम वाढू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घेतला पाहिजे. पोटॅशियम प्रमाण लक्षात घेऊन खाद्यपदार्थांचे तीन भागात वर्गीकरण केले आहे.
जास्त, मध्यम आणि कमी पोटॅशियम असणारे खाद्यपदार्थ, सर्वसाधारणपणे जास्त पोटॅशियम असणारे खाद्यपदार्थ निषिद्ध असून, मध्यम पोटॅशियमवाले खाद्यपदार्थ मर्यादित प्रमाणात तर कमी पोटॅशियम असणारे खाद्यपदार्थ पुरेशा प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. १०० ग्रॅम खाद्यपदार्थांमध्ये पोटॅशियमच्या प्रमाणावर आधारित जास्त, मध्यम आणि कमी पोटॅशियमवाल्या आहाराचे वर्गीकरण पुढे दिले आहे.
- जास्त पोटॅशियम = २०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त
- मध्यम पोटॅशियम = १०० ते २०० मिलिग्रॅमच्या दरम्यान
कमी पोटॅशियम = ० ते १०० मिलिग्रॅम
समूह १ : अधिक पोटॅशियम असणारा आहार
- फळे : केली, चिकू, पिकलेला आंबा, मोसंब, द्राक्ष, खरबूज, अननस, आवळा, चेरी, जर्दाळू, पीच, आलुबुखार
- फळभाजी /पालेभाजी : आळकुडीची पाने, रताळे, शेवग्याच्या शेंगा, कोथींबीर, सुरण, पालक, गवार, मश्रूम
- सुकामेवा : खजूर, किसमिस, काजू. बदाम, अंजीर, अक्रोड
- डाळी : तूरडाळ, मूग, हरभरा, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ
- मसाले : सुकी मिरची, धणे, जिरे, मेथी
- पेये : नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, कंडेन्स मिल्क, सूप, कॉफी, बोर्नव्हिटा, बिअर, ड्रिंकिंग चॉकलेट, वाईन
- इतर : लोना-मीठ, चॉकलेट, कॅटबरी, चॉकलेट-केक, आईसक्रीम
समूह २ : मध्यम पोटॅशियमवाला आहार
- फळे : टरबूज, डाळिंब, लिची
- पालेभाजी / फळभाजी : वांगी, कोबी, गजर, कांदा, मुळा, कारले, भेंडी, फ्लॉवर, टोमॅटो
- धान्य : मैदा, ज्वारी, पोहे, मका, गव्हाच्या शेवया
- पेये : गाईचे दूध, दही
- अन्य : मिरी, लवंग, वेलची, धणे, गरम मसाला इ.
समूह ३ : कमी पोटॅशियमवाला आहार
- फळे : सफरचंद, पपई, जांभूळ, पेरू, संत्र, बोर
- भाजी / फळभाजी : दुधीभोपळा, काकडी, तुरीच्या शेंगा, बीट, हिरवे मटार, मेथीची भाजी, लसूण
- धान्य : रवा, तांदूळ
- पेये : म्हशीचे दूध, लीम्बुपानी, कोका-कोला, फँटा, लिमका, सोडा
- इतर : मध, जायफळ, मोहरी, सुंठ, पुदिना, व्हिनेगर
भाज्या / फळभाज्यांत आढळणारे पोटॅशियम कशाप्रकारे कमी करता येईल ?
- भाज्या-पालेभाज्या बारीक कापून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून बटाटा-सुरणासारख्या भाज्यांची साले काढली पाहिजे.
- कोमट पाण्यात भाजी धुतल्यानंतर ती गरम पाण्यात १ तास ठेवली पाहिजे. भाजीनुसार पाण्याचे प्रमाण ५ ते १० % जास्त असले पाहिजे.
- दोन तासानंतर पुन्हा कोमात पाण्यात भाजी २-३ वेळा धुवून भाजीपेक्षा जास्त पाणी घालून उकळले पाहिजे.
- भाजी उकळलेले पाणी फेकून देऊन आवडीनुसार भाजी बनवावी.
- अशा प्रकारे भाजी-पालेभाजित असलेले पोटॅशियमचे प्रमाण कमी करता येते. मात्र पूर्णपणे पोटॅशियम दूर करता येत नाही. त्यामुळेच जास्त पोटॅशियम असलेली भाजी, पालेभाजी कमी किंवा खाऊच नये असा सल्ला दिला दिला जातो.
- अशा तऱ्हेने बनवलेल्या जेवणात पोटॅशियमबरोबरच व्हिटॅमिन्सही नष्ट होतात. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे.
फॉस्फरस कमी प्रमाणात घेणे
किडणी फेल्युअरच्या रोग्यांना फॉस्फरसयुक्त आहार कमी घेण्याचा सल्ला का दिला जातो ?
- शरीरात फॉस्फरस आणि कॅल्शीयमचे सर्वसाधारण प्रमाण हे हाडांचा विकास, तंदुरुस्ती आणि मजबुतीसाठी अवश्यक असते. सर्वसाधारणपणे खाण्यातील अधिक फॉस्फरस, किडणी लघवीच्या रुपात बाहेर टाकून त्याचे रक्तातील प्रमाण स्थिर राखते.
- सर्वसाधारणपणे रक्तात फॉस्फरसचे प्रमाण ४०५ ते ५.५ मिलिग्रॅम % असते.
- किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये अतिरिक्त फॉस्फरस लघवीबरोबर बाहेर पडू शकत नसल्याने, रक्तातले त्याचे प्रमाण वाढत जाते. रक्तातील फॉस्फरसचे अतिरिक्त प्रमाण हाडातून कॅल्शीयम खेचून घेते. त्यामुळे हाडे कमजोर होतात.
- शरीरात फॉस्फरस वाढल्यामुळे खाज येणे, स्नायू कमजोर होणे, हाडे दुखणे आणि कमजोर होणे तसेच ताठर झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढणे आदी समस्या होऊ शकतात.
कुठल्या आहारात अधिक फॉस्फरस असल्यामुळे असा आहार कमी घेतला पाहिजे वा पूर्णपणे टाळला पाहिजे ?
जास्त फॉस्फरसयुक्त आहार पुढीलप्रमाणे
- दुधापासून बनवलेले पदार्थ, पनीर, आईसक्रिम, मिल्कशेक, चॉकलेट
- काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, सुके खोबरे
- शीतपेये : कोका-कोला, फँटा, माझा, फ्रुटी
- शेंगदाणे, आळूची पाने, रताळे, मक्याचे दाणे, हिरवा मटार
- दैनंदिन आहार : किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी दर दिवशी कुठच्या प्रकारच्या आणि किती प्रमाणात आहार तसेच पाणी घेतले पाहिजे, ह्याचा तक्ता नेफ्रॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार डायटीशिअनद्वारा तयार केला जातो. परंतु आहारासंदर्भात सर्वसाधारण सूचना पुढीलप्रमाणे
- पाणी आणि द्रवपदार्थ : डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणानुसारच पेये आणि द्रवपदार्थ घेतली पाहिजेत. रोज वजन करून टिपून ठेवले पाहिजे. जर वजन एकाएकी वाढू लागले तर, जास्त पाणी घेतले गेले असे समजावे.
- कार्बोहायड्रेटस : शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज मिळाव्यात यासाठी धान्य आणि डाळींबरोबरच (मधुमेह नसेल तर) साखर, ग्लुकोज अधिक प्रमाण असलेला आहार घेता येईल.
- प्रथिने : मुख्यतः दूध, डाळी, धान्य, अंडी, कोंबडी ह्यांच्यात जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात. जेव्हा डायलिसीसची गरज नसते, तेव्हा किडणी फेल्युअरच्या रोग्यांना थोडे कमी प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो. तर नियमित हीमोडायलिसीस आणि CAPD करणाऱ्या रोग्यांना जास्त प्रथिने घेणे अत्यंत आवश्यक असते. CAPD चा द्राव जेव्हा पोटातून बाहेर पडतो तेव्हा त्याचबरोबर प्रथिने निघून जातात. त्यामुळे जर जेवणातून जास्त प्रथिने गेली नाहीत तर शरीरातले प्रथिनांचे प्रमाण कमी होते आणि ते हानिकारक ठरते.
- चरबीवाले पदार्थ :- चरबीवाले पदार्थ कमी घेतले पाहिजेत. तूप, लोणी वगैरे कमी खाल्ले पाहिजे. मात्र हे खाणे पूर्णपणे बंद करणेसुद्धा हानिकारक आहे. तेलांमध्ये शेंगदाणा किंवा सोयाबीनचे तेल शरीरासाठी फायदेशीर असले तरी ते कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो.
- मीठ : बहुतेक रोग्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पदार्थावर वरतून घालता कामा नये. खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर असलेले पदार्थ कमी किंवा मुळीच खाता कामा नये. सैंधव मीठ किंवा लोना कमी वा खाताच कामा नये.
- धान्ये : धान्यांमध्ये तांदूळ व त्यापासून बनवलेले पोहे यासारख्या वस्तूंचा वापर केला पाहिजे. दररोज एका धान्याऐवजी गहू, तांदूळ, पोहे, साबुदाणा, रवा, मैदा, ताजा मका, कॉर्नफ्लेक्सचा वापर करावा. ज्वारी, मका आणि बाजरी कमी प्रमाणात घ्यावे.
- डाळी : वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींच्या योग्य प्रमाणात वापर करावा, ज्यामुळे खाण्यात विविधता राहते. डाळीबरोबर पाणी असल्यास त्याचे प्रमाण कमी ठेवावे. शक्यतो डाळ घट्ट असावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळीचे प्रमाण असावे. डाळींतील पोटॅशियम कमी करण्यासाठी, ती जास्त पाण्याने धुवून नंतर गरम पाण्यात भिजवून ते पाणी फेकून दिले पाहिजे. तसेच जास्त पाण्यात डाळ शिजवून, वरचे पाणी फेकून देऊन स्वादानुसार डाळ बनवावी. डाळ आणि तांदळाच्या जागी खिचडी, डोसा वगैरे खाता येईल.
- भाज्या-पालेभाज्या : आधीच सांगितल्याप्रमाणे, पोटॅशियम कमी असलेल्या भाज्या-पालेभाज्या कुठल्याही त्रासाशिवाय वापरता येतील. जास्त पोटॅशियम असलेल्या भाज्या-पालेभाज्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे पोटॅशियमचे प्रमाण कमी करून बनवता येतील आणि स्वादासाठी डाळीत / भाजीत लिंबू पिळता येईल.
- फळे : सफरचंद, पपई, पेरू, बोरे या सारखी कमी पोटॅशियमवाली फळे दिवसातून एकदाच खावीत. डायलिसीस करावयाच्या दिवशी डायलिसीसच्या आधी कुठलेही एक फळ खाता येईल. पण नारळपाणी किंवा फळांचा रस घेता कामा नये.
- दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ : दररोज ३०० ते ३५० मिली दूध किंवा खीर, आईसक्रिम, दही, ताक यांसारखे दुधापासून बनवलेले पदार्थ खाता येतील. मात्र त्याचबरोबर पाणी कमी पिण्याची सूचना लक्षात ठेऊन ताक कमी प्यायले पाहिजे.
- शीतपेये : पेप्सी, फँटा, फ्रूटी यांसारखी शीतपेये घेता कामा नयेत. फळांचा रस वा नारळपाणीही घेऊ नये.
- सुकामेवा : सुकामेवा, शेंगदाणे, तीळ, ओला नारळ किंवा सुके खोबरे खाता कामा नये.
स्त्रोत : Kidney Education Foundation