অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राणिजन्य मानवी रोग

प्राणिजन्य मानवी रोग

पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे. प्रचलित व्याख्येप्रमाणे मानवाशिवाय इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग तसेच मानवाचे इतर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये होणारे रोग या दोहोंचाही समावेश प्राणिजन्य मानवी रोग या संज्ञेत केला जातो.

दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी सर्वप्रथम कुत्रा हा प्राणी माणसाळविण्यात आला. त्यानंतर क्रमाने शेळ्या व मेंढ्या (ख्रि. पू. ९२००), डुकरे (ख्रि. पू. ५५००), गाईगुरे (ख्रि. पू. ३०००) व त्यानंतर गाढव, घोडे व उंट हे प्राणी माणसाळविण्यात आले. मांजर हा प्राणी इतिहासपूर्व काळापासून माणसाळविण्यात आला आहे. या प्राण्यांच्या सान्निध्यात मनुष्य राहू लागल्यानंतर साहजिकच त्यांना होणाऱ्या रोगांचा संपर्क त्याला अधिकाधिक पोहोचू लागला.

वर्गीकरण

या रोगांचे वर्गीकरण रोगकारकानुसार सूक्ष्मजंतुजन्य, व्हायरसजन्य व जीवोपजीवीजन्य [दुसऱ्या सजीवांपासून प्रत्यक्षपणे अन्नपाणी घेऊन उपजीविका करणाऱ्या सजीवांपासून होणारे; ⟶ जीवोपजीवन] असे करीत असत. त्यानंतर ज्या प्राण्यापासून रोग होई त्यानुसार म्हणजे माणसाळलेल्या प्राण्यापासून, वन्य प्राण्यापासून व ज्यांना या दोन्ही संज्ञा लावता येत नाहीत; परंतु माणसाच्या सान्निध्यात असणाऱ्या कृंतक (उंदरासारख्या कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यापासून होणारे असे तीन वर्ग पाडण्यात आले. अलीकडे रोगसंपर्क होण्यासाठी ज्या प्रकारच्या प्राण्यांची आवश्यकता असते, त्यावरून वर्गीकरण करण्यात येऊ लागले असून पुढील चार वर्ग मानण्यात येतात.

(१) नैसर्गिक रीत्या एका जातीच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये होणारे व त्या प्राण्यांपासून सरळ मानवाला होणारे रोग; उदा., ⇨ अलर्क रोग.

(२) माणसामध्ये रोगसंसर्ग होण्यापूर्वी दोन पृष्ठवंशी प्राण्यांमधून रोगकारकाचा प्रवास घडणारे रोग; उदा., पट्टकृमी बाधा [⟶पट्टकृमि; कृमि].

(३) पृष्ठवंशी प्राण्यांशिवाय मानवाला रोगसंपर्क होण्यासाठी एका अपृष्ठवंशी प्राण्याची जरूरी असणारे रोग; उदा., ⇨ निद्रारोग.

(४) पृष्ठवंशी प्राण्यांशिवाय विशिष्ट परिस्थितीत निसर्गामध्ये रोगकारकांचा साठा असल्यामुळे तेवढ्या परिसरातच होणारे रोग; उदा., ऊतकद्रव्यी कवकजन्य रोग; [ ⇨जालिका अंतःस्तरीय तंत्रातील कोशिकांत (पेशींत) ऊतकद्रव्यी कवक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील द्रव्यात संक्रामण करणारी बुरशीसारखी हरितद्रव्यरहित वनस्पती; हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम) शिरल्यामुळे होणारा हा विशिष्ट रोग आहे. पक्ष्यांची विष्ठा मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या जमिनीत हे कवक भरपूर प्रमाणात असते आणि अशा जमिनीचा संपर्क येणाऱ्या माणसांच्या शरीरात ते प्रवेश करते].

प्राणिजन्य मानवी रोगांची संख्या आज दीडशेच्या आसपास असून प्रतिवर्षी त्यांत सतत भर पडत आहे. यांपैकी काही रोग प्राणघातक आहेत, तर काही नुसतेच त्रासदायक आहेत. यांशिवाय मानवाला होणाऱ्या काही रोगांचा संबंध पृष्ठवंशी प्राण्यांशी लागत असला, तरी ते सांसर्गिक रोगांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्यांना प्राणिजन्य मानवी रोग अशी संज्ञा लावीत नाहीत. उदा., सर्पदंशजन्य विषबाधा किंवा विशिष्ट जातीचे मासे खाल्ल्यामुळे होणारी विषबाधा [⟶ विषविज्ञान]. यांशिवाय मूलतः मानवामध्येच होणारे परंतु संसर्गाने इतर प्राण्यांत तात्पुरते उद्‌भवणारे व त्या प्राण्यांपासून पुन्हा माणसात उद्‌भवणाऱ्या रोगांचा समावेश प्राणिजन्य मानवी रोगांत करीत नाहीत. थोडक्यात कनिष्ठ वर्गीय प्राण्यांमध्ये जैव दृष्ट्या अनुकूल परिस्थिती असल्यामुळे नेहमी आढळणारे व काही परिस्थितींतच मानवातही उत्पन्न होणारे रोग म्हणजे प्राणिजन्य मानवी रोग होत.

संप्राप्ती

इतर ⇨संसर्गजन्य रोगांप्रमाणे प्राणिजन्य मानवी रोग सूक्ष्मजंतू, व्हायरस, रिकेट्‌सिया (सूक्ष्मजंतूंपेक्षा लहान परंतु व्हायरसांपेक्षा मोठ्या आकारमानाचे सूक्ष्मजीव), कवके [⟶ कवकसंसर्ग रोग] व जीवोपजीवी या रोगकारकांमुळे होतात.

प्राण्यांमधील काही जीवोपजीवींच्या जीवनचक्रातील विशिष्ट अवस्थांच्या वाढीसाठी मानव हा नैसर्गिक मध्यस्थ पोषक (आश्रय देणारा सजीव) आहे. या अवस्थांमुळे मानवात जरी काही आजार उद्‌भवत असले, तरी त्यांचा समावेश प्राणिजन्य मानवी रोगांत करणे योग्य होणार नाही; परंतु मध्यस्थ पोषक नसताना नकळत किंवा हलगर्जीपणामुळे उद्‌भवणाऱ्या अशा जीवोपजीवीजन्य रोगांचा समावेश मात्र प्राणिजन्य मानवी रोगांत करतात. कुत्र्याच्या एका पट्टकृमीची अंडी माणसाच्या आंत्रमार्गात (आतड्यांत) गेल्यामुळे होणारा द्राक्षार्बुद रोग (फुप्फुसे, यकृत, अस्थी या अवयवांत लहान लहान द्रवार्बुदे-द्रवयुक्त पिशव्या-तयार होणारा रोग), जलतरणजन्य कंड (पाणबदकाच्या रक्तामधील पर्णकृमींच्या डिंभावस्था-अळीसारख्या अवस्था-पोहणाऱ्या माणसाच्या त्वचेमध्ये शिरल्यामुळे होणारा व कंड अथवा खाज हे प्रमुख लक्षण असणारा त्वचारोग), काही कीटक व वन्य पशूंतील ट्रिपॅनोसोमा क्रूझायनावाच्या सूक्ष्म जीवोपजीवीमुळे मानवात होणारा शागास रोग (कार्लस शागास नावाच्या ब्राझिलियन शास्त्रज्ञांनी कारण शोधल्यामुळे त्यांचे नाव दिलेला रोग) ही जीवोपजीवींमुळे होणाऱ्या प्राणिजन्य मानवी रोगांची काही उदाहरणे आहेत.

रोगसंसर्ग

इतर संसर्गजन्य रोगांप्रमाणेच या रोगांचा संसर्ग मानवाला होण्याचे अनेक मार्ग आहेत. यांपैकी चार प्रमुख मार्ग असे आहेत : (१) प्रत्यक्ष शारीरिक संपर्क, (२) हवा, (३) अन्न आणि (४) कीटक. या मार्गांनी होणाऱ्या रोगांची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

(१) प्रत्यक्ष संपर्कामुळे रोगी जनावरापासून होणारे पाददद्रू [⟶ कवकसंसर्ग रोग] व ⇨गजकर्ण यांसारखे त्वचारोग. खाटीकखान्यात काम करणाऱ्यांच्या त्वचेतून किंवा श्लेष्मकलेतून (आतडी, श्वासनाल यांसारख्या नलिकाकार पोकळ्यांच्या बुळबुळीत अस्तरातून) प्रत्यक्ष संपर्कामुळे ⇨ आंदोलज्वराचे सूक्ष्मजंतू मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.

(२) शुकरोग हा ‘बेडसोनीया’ गटातील सूक्ष्मजंतूमुळे होणारा आणि न्यूमोनिया हे प्रमुख लक्षण असलेला पोपट व तत्सम पक्ष्यांमुळे उद्‌भवणारा रोग आहे. हे सूक्ष्मजंतू रोगट पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडतात आणि अशी जंतुयुक्त कोरडी विष्ठा कणरूपाने श्वसनक्रियेबरोबर मानवाच्या फुप्फुसांत शिरल्यामुळे हा रोग उत्पन्न होतो. [⟶ शुकरोग].

(३) क्षयी गुरांचे अर्धेकच्चे मांस खाण्यात येऊन उद्‌भवणारा क्षयरोग आणि बहुतेक सर्व पाळीव प्राण्यांत व वन्य प्राण्यांत आढळणाऱ्या व अनेक प्रकार असलेल्या साल्‌मोनेला वंशाचे सूक्ष्मजंतू मानवाच्या जठरांत्र मार्गात (जठर, लहान आतडे व मोठे आतडे मिळून बनणाऱ्या अन्नमार्गात) तोंडाने गिळले जाऊन उद्‌भवणारे काही विशिष्ट रोग उदा., [जठरांत्रशोथ; ⟶ जठरांत्र मार्ग] ही अन्नावाटे होणाऱ्या रोगसंसर्गाची उदाहरणे आहेत.

(४) काही सूक्ष्मजंतू व व्हायरस मानवात कीटकांद्वारे प्रवेश करतात. ⇨ प्रलापक सन्निपात ज्वर, ⇨ पीतज्वर आणि ⇨ प्लेग ही अशा रोगांची उदाहरणे आहेत. कीटक व इतर संधिपाद (ज्यांच्या पायांना सांधे असतात असे) प्राणी रोगवाहक असतात; परंतु मूळ रोग एखाद्या पृष्ठवंशी प्राण्यात असतो; उदा., प्लेग हा रोग मूळ उंदरात असून रोगवाहकाचे काम पिसवा करतात.

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate