उतारवयात दाताचे आयुष्य संपल्याने, जंतुदोषामुळे किंवा त्याला मार लागल्याने मुळे जबडयातून सैल होतात. यामुळे दात हलायला लागतो. मार लागल्याने दात हलू शकतो. थोडा हलत असल्यास बहुधा काही दिवसांनंतर आतली फट व जखम भरून येते. यामुळे दात पुन: पक्का होतो. मात्र खूप हलत असल्यास दात पडून जाईल. जंतुदोष किंवा जुना झाल्याने दात हलत असेल तर तो परत पक्का होत नाही. असा दात पडून जाईल. कधीकधी दाताला मार लागल्याने आत मुळाला मार बसून तो तुटू शकतो. अशा वेळी दातावर दबाव आला की तो दुखतो, पण दात हलेलच असे नाही. हे दुखणे थांबले नाही तर दंतवैद्याला दाखवावे. कदाचित हा दात काढून टाकावा लागतो. दाताचे मूळ तुटले आहे की नाही हे त्यावर चमच्यासारखी वस्तू वाजवून आवाजाने कळते. याला थोडा अनुभव लागतो. इतर चांगल्या दातांच्या खणखणीत आवाजाशी तुलना केल्यास फरक स्पष्ट जाणवतो.
दात उपटणे
घरगुती पध्दत
दंतवैद्याच्या सेवा फारशा नसल्यामुळे दात उपटण्यासाठी एक सोपी पध्दत प्रचलित आहे. थोडया मजबूत दो-याचा दुहेरी फास दाताच्या बुडाशी अडकवून दमदार झटका दिल्यास हलणारा दात समूळ निघून येतो. खूप हलणारा दात असा काढल्यावर फारसा रक्तस्राव होत नाही. जे काही थोडे रक्त येते ते कापसाच्या बोळयाच्या दाबाने लगेच थांबते. या पध्दतीने दात निघू शकेल की नाही याचा अंदाज आधी घ्यावा. दात थोडाच हलत असेल तर हे तंत्र वापरु नये.
वैद्यकीय पध्दत
खूप हलणारे दात (म्हातारपणात किंवा दुधाचे दात) आपल्याला चिमटयाने काढता येतात. कोठल्याही दाताला वापरता येईल असा एक चिमटा मिळतो, तो वापरून थोडा झटका देऊन दात काढता येतो. याला थोडा अनुभव लागतो आणि दंतवैद्याबरोबर 10-15दिवस काम करून हे शिकता येईल. जबडयाला भूल देणे हे मात्र जरा कौशल्याचे काम आहे. यासाठी 1% झायलोकेन हे इंजेक्शन जबडयाच्या शेवटी कोनात देतात. इथे जरा जास्त अनुभव व निरीक्षण लागते. भूल दिल्यावर मात्र दात काढताना दुखत नाही. हे काम वैद्यकीय तंत्रज्ञ किंवा दाताच्या डॉक्टरने केलेले चांगले. दात काढताना कधी कधी मूळ तुटून आत राहते. असे तुटके मूळ शस्त्रक्रियेनेच काढावे लागते. दात निघाल्यावर त्याची मुळे शाबूत आहेत की नाही हे दात तपासून ठरवतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/2/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.