ब-याच वेळा अंगावर गांध येते, खाज सुटते व पुरळ येतात, ती जागा लाल होते. याला पित्त उठणे असे म्हटले तरी पित्तरसाचा व या घटनेचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा हा एक 'वावडया' चा (ऍलर्जी) प्रकार असतो. शरीरास नकोशा पदार्थाच्या ऍलर्जी (वावडे) मुळे त्वचेचा दाह होतो. या पदार्थाचा प्रत्यक्ष संबंध कातडीशी येतो किंवा इंजेक्शन अथवा अन्नातून तो पदार्थ शरीरात जातो. अशा नकोशा पदार्थाविरुध्द शरीराची प्रतिक्रिया येते. यालाच 'वावडे' म्हणतात. पेनिसिलीन या औषधाला येणारी रिऍक्शन (प्रतिक्रिया) अशीच असते. वावडे कोठल्याही पदार्थाचे येऊ शकते. ऊन, वातावरणातील बदल, फुलांचे बहर,औषधे, कीटकनाशके, प्राणी, कीटक, वनस्पती, आहारातले पदार्थ यांपैकी कोठलेही पदार्थ वावडयाला कारणीभूत ठरू शकतात. तसेच आज ज्या वस्तू शरीराला चालतात त्यांचे काही काळाने 'वावडे' येऊ शकते. तात्पुरते वावडे असेल तर गांध, पित्त उठणे अशा नावाने ते ओळखले जाते. जुनाट वावडयाच्या आजारात बरीच खाज सुटते. संबंधित त्वचा लाल होते, पुरळ येतात व खाजवल्यावर पाणी व रक्त सुटते. काही लोक यालाच 'इसब' म्हणतात. वावडयाचे प्रमाणही कमीअधिक असू शकते.
उपचार
(अ) नुसती गांध असेल तर ओली चिकणमाती (लेप) लावल्यास बरे वाटते. (ब) वावडे असलेल्या पदार्थाचा संबंध टाळणे. (क) खाज थांबवण्यासाठी सी.पी.एम. नावाची गोळी द्यावी. या गोळीने तासाभरात खाज थांबते. मात्र त्याचा परिणाम चार-सहा तासच टिकतो. म्हणूनच दिवसातून दर सहा-आठ तासांनी एक गोळी घ्यावी लागते. बहुधा एक-दोन दिवसांत हा त्रास थांबतो. मात्र या गोळीने झोप येते. म्हणून जोखमीचे काम (वाहन चालवणे, यंत्रावर काम करणे) करणा-याने ही गोळी रात्री झोपतानाच घ्यावी. किंवा गोळी घेतल्यावर विश्रांती घ्यावी. सिट्राझिन प्रकारच्या गोळयांमध्ये हा दोष सौम्य असतो. त्यामुळे त्या सी.पी.एम. पेक्षा जास्त चांगल्या ठरतात. (ड) जंतुदोष (पुरळ) झाला असेल तर सोबत 5 दिवस कोझाल उपचार आवश्यक आहे.
होमिओपथी निवड
एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, कल्केरिया कार्ब, सीना, कॉस्टिकम, फेरम फॉस, हेपार सल्फ, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया,सल्फर
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या