दाट लोकवस्तीच्या भागात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने, खबरदारीच्या उपायांसाठी सोपी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्या भागात स्वच्छतागृहे,स्नानगृहे सामायिक आहेत अशा भागांसाठी प्रामुख्याने या मार्गदर्शक सूचना आहेत.
स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपायांवर भर देणे आणि या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील असे उपाय सुचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या समुदायातल्या रहिवाश्यांनी नियमित हात धुवावेत यासाठी अधिक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन डू इट युअरसेल्फ हॅंड वॉशिंग स्टेशन तातडीने बसवण्याचा यामध्ये प्रस्ताव देण्यात आला आहे. महामारी आटोक्यात आणण्यासाठी, जगभरात याचा उपयोग करण्यात येत आहे.
पायाने सुरु करण्याच्या या स्टेशनमुळे, संसर्ग पसरण्याची मोठी शक्यता असणाऱ्या भागाशी थेट संपर्क टाळला जातोच त्याच बरोबर हात धुण्यासाठी पाण्याचा वापरही कमी होतो.
स्थानिक पातळीवर आणि लॉक डाऊनच्या काळातही सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या दरातले साहित्य वापरून समुदायातले स्वयंसेवकही स्वतः हे तयार करू शकतात.
पायाने सुरु करण्याचे स्टेशन सार्वजनिक स्वच्छता गृहात बसवल्याने हात धुण्याला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच यासाठी पाणीही कमी वापरले जाते.
अशा हात धुण्याच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी क्लोरिनचा वापर केला तर ते अधिक प्रभावी ठरते, हा मुद्दा विचारात घेता येईल. समुदायात स्वच्छता आणि आरोग्यासाठी उत्तम सवयी राखण्यावरही यात स्पष्ट भर देण्यात आला आहे.स्वच्छता गृहात जाताना नेहमी पायात चप्पल, फेस कव्हर घालून जाणे, स्वच्छता गृहातून आल्यानंतर लगेच हात धुणे, सोशल डीस्टन्सिंग राखणे यासारखे सोपे उपाय ठळकपणे मांडण्यात आले आहेत. सार्वजनिक भाग निर्जंतुक राखणे, घरे स्वच्छ आणि जंतुरहित ठेवणे याबाबतही तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
सातत्य राखण्यासाठी, प्रशासन, स्वयंसेवक आणि समुदायांनी, या बाबी अमलात आणल्या जात आहेत याची खातरजमा करावी यावर या मार्गदर्शक तत्वात भर देण्यात आला आहे. या रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी आघाडीवर राहून काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याकडून संपूर्ण सहकार्यावरही भर देण्यात आला आहे.
सार्वजनिक स्वच्छता गृहे, सामायिक स्नानगृहे यावर यामध्ये ठळकपणे लक्ष पुरवण्यात आले आहे. समुदायाचे नेते,स्वयंसेवी संस्था ,नगरसेवक यांनी या आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. नगरसेवक,स्वयंसेवी संस्थानी, प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या भागात,या मार्गदर्शक तत्वात सुचवलेल्या उपायांचा अंगीकार करावा, प्रोत्साहन द्यावे आणि यांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवक आणि समुदायाबरोबर काम करावे असे सुचवण्यात आले आहे.
संपूर्ण मॅन्युअल वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 7/29/2020