भारत सरकारकडून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच क्रमात आता Aarogya Setu नावाचे एक स्मार्टफोन अॅप लाँच करण्यात आले आहे. तुम्ही जर एखाद्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या जवळून जात असाल किंवा त्याच्या संपर्कात आला असाल तर हे अॅप याबाबत तुम्हाला सूचित करेल. आरोग्य सेतू अॅप अँड्राईड स्मार्टफोन्स आणि आयफोन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप ब्लू टूथ, लोकेशन आणि मोबाइल नंबरच्या मदतीने तपासून तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात का हे सांगेन. या अॅपमध्ये महत्त्वाची माहिती जसे की कोविड-१९ मदत केंद्र आणि सेल्फ असेसमेंटचा (स्व चाचणी) समावेश आहे. या माध्यमातून तुम्ही स्वतःला संक्रमणाचा धोका आहे की नाही, हे तपासू शकता. आरोग्य सेतूची माहिती पुढीलप्रमाणे.
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी अँड्राईड स्मार्टफोन युजर्सला प्ले स्टोअर आणि आयफोन युजर्सला अॅप स्टोअरमध्ये जाऊन आरोग्य सेतू (स्पेस न देता) सर्च करायचे आहे. हे अॅप हृदयाच्या आयकॉनसह दिसेल. ते तुम्ही इन्स्टॉल करुन घ्या.
आरोग्य सेतूशी मिळते-जुळते अनेक अॅप्स असल्याने तुम्ही अधिकृत अॅपच इन्स्टॉल करा. हे अॅप एनआयसीने विकसित केले आहे. अॅप आयकॉनच्या खाली विकसकाचे नाव NIC eGov Mobile Apps (अँड्राईड युजर्सला) आणि NIC (आयफोन युजर्सला) दिसेल.
आरोग्य अॅप इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला ते ओपन केल्यानंतर काही परवानग्या मागितल्या जातील. हे अॅप तुमचा मोबाइल नंबर, ब्लू टूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने तुम्ही सुरक्षित आहात की संक्रमणाचा धोका आहे, हे सांगेल आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी ब्लू टूथ आणि जीपीएसचे अॅक्सेस दिल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. या नंबरवर येणाऱ्या ओटीपीच्या मदतीने स्वतःला व्हेरिफाय करता येईल. त्यानंतर तुम्ही नाव, वय, व्यवसायसारखी काही माहिती भरु शकता. पण ही माहिती भरणे अनिवार्य नाही. जर तुम्हाला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी स्वयंसेवक व्हायचे असेल तर त्यासाठीही नाव नोंदवू शकता.
लोकेशन डिटेल्स आणि सोशल ग्राफच्या आधारावर आरोग्य सेतू अॅप सांगेल की, तुम्ही लो-रिस्क किंवा हाय-रिस्क यापैकी कोणत्या श्रेणीत आहात. जर तुम्ही हाय-रिस्कमध्ये असाल तर तुम्हाला अलर्ट करत टेस्ट सेंटरला भेट देण्याचा सल्लाही देईल.
आरोग्य सेतू अॅपमध्ये तुम्हाला स्व चाचणीचा पर्यायही देण्यात आला आहे. अत्यंत सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे जाणून घेता येईल. जर तुमच्यात संक्रमणाशी निगडीत ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे अॅप तुम्हाला काय करायचे आहे, याची माहिती देईल. सेल्फ आयसोलेशनबाबतही यात माहिती देण्यात आली आहे.
कोरोना विषाणू ट्रॅकर आरोग्य सेतू अॅप ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, मराठी, बांग्ला आणि पंजाबीचा समावेश आहे.
अॅप डाउनलोड करण्यासाठी
Android app - इथे क्लिक करा
iOS app - इथे क्लिक करा
स्रोत- हिंदुस्तान टाईम्स मराठी
अंतिम सुधारित : 6/21/2020