অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कवकसंसर्ग रोग

कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) मानवात दोन प्रकारचे रोग होतात. एक स्थानिक स्वरूपाचा असून त्यामुळे त्वचा, नखे व केश-पुटक (केस ज्यांतून वाढतात अशा नलिका) या ठिकाणी रोगोत्पत्ती होते व दुसरा सार्वदेहिक असून शरीरातील विविध अवयवांत व घटकांत रोगोत्पत्ती होते.

याखेरीज पशुपक्ष्यांमध्ये कवकामुळे उद्‌भवणारे स्थानिक स्वरूपाचे तसेच दैहिक रोग आहेत. यांमध्ये प्रामुख्याने पक्ष्यांत होणारा गदाकवक रोग [→ गदाकवक रोग], गाईबैलांत आढळणारा किरणकवक रोग [→ किरणकवक रोग], डुकरांच्या पिलांमध्ये दिसणारा म्युकॉरमायकोसीस, मेंढ्यांमधील लोकरीच्या गठळ्या होणारा (लंपी वुल) रोग, गाईतील स्तनशोथ व सर्व पशूंमध्ये व कोंबड्यांमध्ये होणारा ⇨गजकर्ण हे कवकजन्य रोग आहेत.

त्वचेचे रोग

हे रोग उत्पन्न करणार्‍या कवकांचे तीन मुख्य वंश आहेत. (अ) लघुबीजाणू (मायक्रोस्पोरम), (आ) केशकवक(ट्रायकोफायटॉन) आणि (इ) अधिचर्मक (एपिडर्मोफायटॉन). यांमुळे होणाऱ्‍या त्वचेच्या रोगांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

शिर:कवक रोग

(टीनिया कॅपिटीस). हा रोग डोक्याच्या केसाळ भागात होतो. त्याचे कवक केशकवक व लघुबीजाणू (लहान लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) या वंशांतील असून तो एका व्यक्तीपासून दुसर्‍यास कपडे वगैरेंच्या संपर्कामुळे होतो. केसाच्या मुळास सूज आल्यामुळे तेथे लाली येते. केस ताठ व उंच उचलल्यासारखा दिसतो. त्याची चकाकी व मृदुता नाहीशी होते व त्यामुळे तो लवकर तुटतो. सूज आलेल्या भागावर केसांचे खुंट दिसतात. पुढे केस नष्ट झाल्यामुळे तेथे चाई झाल्यासारखा किंवा टक्कल पडल्यासारखा तो भाग तुळतुळीत दिसतो. तीव्र प्रकारांमध्ये ठणका, फोडांतून लस वाहणे वगैरे लक्षणे होतात.

खवडा

हा प्रकारही डोक्याच्या केसाळ भागातच होतो व त्याचे मूळ कारण म्हणजे केशकवक जातीचे कवक होय. त्यापासून कित्येक वेळा शरीरातील इतर भागांच्या त्वचेवर व नखांवरही परिणाम होतो. प्रथम केसाच्या मुळाशी पांढरट गाठ येते. तिच्यावर पांढरा कोंडा जमल्यासारखे वाटते, पण लवकरच ही गाठ मोठी होत जाऊन तिच्यावर पिवळट रंगाची खपली धरते व ती काढली असता तिच्याखाली त्वचेवर व्रण झालेला दिसतो. या व्रणातून रक्त व पूमिश्रित लस येते व तिचीच खपली धरलेली असते. डोक्यात अशा गाठी व पिवळट खपल्या धरलेल्या आढळतात व त्यामुळे टक्कल पडलेले दिसते.

पाददद्रू

(अॅथलेट्स फूट, डर्‌मॅटोफायटॉसीस). केशकवक वंशातील जातींच्या व एपिडर्मोफायटॉन फ्लोकोसम व कँडिडा अल्बिकान्स या जातींच्या कवकांमुळे हातापायांच्या बेचक्यांत होणारा गजकर्णाचा प्रकार. नेहमी बूट वापरणार्‍या व्यायामपटूत हा रोग आढळत असल्यामुळे त्याला व्यायामपटूचा पाददद्रू असे म्हणतात. बेचक्यात सूज येऊन तेथे कोंडा निघाल्यासारखा पांढरट पदार्थ जमतो, खाज सुटते व इतर जंतूंचा प्रवेश झाल्यास जखम होऊन पू व रक्त येऊ लागते. जखमेच्या कडा जाड होतात व मध्ये मोठी भेग पडून तिला ठणका लागतो. चालण्यासही त्रास होतो. सदोदित पाण्यात वावरल्यामुळेही रोग होतो व तेव्हा त्याला चिखल्या रोग म्हणतात.

जंघीय दद्रू

जांघेत, काखेत, मांड्या व नितंब भागावर जेथे त्वचा ओली राहते अशा भागात रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. अधिचर्मक वंशातील कवकांमुळे होणार्‍या या प्रकारात मुख्य लक्षण म्हणजे खाज सुटून त्या जागी लहानलहान फोड येतात व ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे तयार होतात. यांच्या कडा उचललेल्या, लालसर व फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट व कोंडा असलेला असा दिसतो.

कायिक दद्रू

(गजकर्ण). अधिचर्मक व लघुबीजाणू या दोन्ही वंशांतील कवकांमुळे हा रोग होत असून सर्व शरीरभर पसरू शकतो. रुपयाएवढ्या आकारापासून पाच ते दहा सेंमी. व्यासापर्यंत याचा आकार असतो. यालाच व्यवहारात ‘गजकर्ण’ असे म्हणतात [→ गजकर्ण].

शिबे

एक विशिष्ट प्रकारचा सौम्य त्वचा रोग. हे त्वचेच्या अगदी वरच्या थरांत दिसते. मूळ कारण लघुबीजाणू कवक असून सुरुवातीस त्वचा पिवळट पिंगट होते व पुढे पांढरट रंगावर दिसू लागते. त्यामुळे श्वेतकुष्ठ (पांढरे कोड) असल्याचा संशय येतो. हा प्रकार चेहरा, खांदे, छाती, पाठ व बगला या ठिकाणी विशेषतः आढळतो.

वरील सर्व रोगांवर उपचार म्हणजे स्वच्छता ठेवणे, विशिष्ट औषधीयुक्त मलमे लावणे. क्ष-किरण चिकित्सा व पोटात ग्रिझिंओफलव्हीन हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषध देणे हा होय. चिकाटीने उपाय योजना केल्यास सर्व रोग पूर्णपणे बरे होतात.

सार्वदेहिक कवक रोग

हे रोग उत्पन्न करणार्‍या कवकांच्या कित्येक जाती आहेत. त्या सर्वांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्यासंबंधी शारीरिक अधिहृषता (ऍलर्जी) फार लवकर होते व त्यामुळे चिकित्सा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. या सर्व रोगांवर क्ष-किरण व पोटॅशियम आयोडाइड यांचा उपयोग चांगला होतो.

किरणकवक रोग

(अॅक्टिनोमायकोसीस). अॅक्टिनोमायसीस बोव्हिस या कवकामुळे होणाऱ्‍या या चिरकारी (दीर्घकालिक) रोगात कणार्बुदासारखी (दाण्यासारख्या पेशीसमूहामुळे तयार झालेल्या गाठीसारखी) सूज येते. या कवकामुळे चेहर्‍यावर, छातीवर, फुप्फुसांत व पोटात रोग उत्पन्न होतो. प्रथम सूज येऊन ती वाढत जाऊन फुटते व त्यातून गंधककण (कवकांचे पिवळट गुच्छ) बाहेर पडतात. बीजाणू हवा व अन्न यांच्याद्वारे शरीरात प्रवेश करतात व ज्या भागात जातात तेथे रोग उत्पन्न होतो. पूर्वी क्ष-किरण, पोटॅशियम आयोडाइड इत्यादींचा उपचारार्थ उपयोग करीत असत तथापि शस्त्रक्रिया केल्यासच त्वरित गुण येतो [→ किरणकवक रोग].

मदुराकवक रोग

(मदुरापाद रोग). हा रोग उष्णकटिबंधात होतो. भारतात मुख्यत: तमिळनाडू राज्यात विशेषतः मदुरा येथे आढळतो म्हणून त्याला मदुरापाद रोग असे नाव देण्यात आले आहे. निरनिराळ्या जातींच्या कवकांमुळे होणार्‍या या रोगात पाय पुष्कळ सुजतो त्यामुळे तळवा, पाऊल यांची जाडी फार वाढते. वारंवार व जागोजागी गळवे होऊन, फुटून त्यांतून रक्तमिश्रित पू बाहेर पडतो. अशा गाठी जवळजवळ झाल्यामुळे घोट्यापर्यंतचा सर्व पायच रोगव्याप्त होतो. वेळीच उपचार न झाल्यास पाय कापून काढावा लागतो.

मणिकवक रोग

लहान अशक्त मुलांच्या तोंडात जिभेवर मणिकवक (मोनिलिया किंवा कँडिडा या वंशातील) कवकांमुळे सूज येऊन जीभ पांढरी दिसते. तसेच फुप्फुसांवरही परिणाम होऊन खोकला वगैरे लक्षणे होतात. रोग त्वचेवर होतो तेव्हा बोटांच्या बेचक्यात, काखेत, छातीखाली व जांघेतही आढळतो.

यांशिवाय इतर अनेक वंशांतील कवकांमुळे रोग होतात. या सर्वांमध्ये स्थानिक सूज, गाठ येणे वगैरे लक्षणे दिसतात. काही प्रकारांत विशेषत: बदरकवकांमुळे (कॉक्सिडिऑयडीस वंशातील कवकांमुळे) फुप्फुसात सूज येऊन ताप, खोकला वगैरे लक्षणे होतात. त्वचेतून बाहेर पडणाऱ्‍या लशीत किंवा कफात विशिष्ट कवक सापडल्यामुळे रोगनिदान करणे शक्य होते.

ढमढेरे, वा. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate