অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओकारी


जठरातील पदार्थ परत तोंडावाटे जोराने फेकले जाण्याच्या क्रियेला वमन, उलटी, वांती किंवा ओकारी असे म्हणतात. हे पदार्थ तोंडावाटे फेकून देताना ‘ओ’ म्हटला जातो म्हणून त्याला ओकारी हे नाव पडले असावे. तोंडात अन्नपान घातल्यानंतर त्याची दिशा शरीरामध्ये खालीच असते. पचनादी व्यापार होऊन त्यातील किट्ट (निरूपयोगी पदार्थ) गुदद्वारामार्गे फेकून देईपर्यंत ते खाली जात असते. पण ओकारीमध्ये ही गती ऊर्ध्व म्हणजे उलटी होते म्हणून तिला उलटी असे म्हणतात. ओकारी ही प्रतिक्षेपी क्रिया (बाह्य उद्दीपनामुळे आपोआप होणारी क्रिया) असून तिचे नियंत्रण करणारे केंद्र लंबमज्‍जेमध्ये (मेंदूच्या सर्वांत मागच्या व खालच्या भागामध्ये) असते. त्या केंद्राकडे येणाऱ्या अभिवाही (मेंदूकडे जाणाऱ्या) संवेदना अनेक इंद्रियांतील तंत्रिकामार्गाने (मज्‍जतंतूमार्गाने) येतात. त्यांपैकी प्रमुख म्हणजे जठरादी अनेक अंतस्त्यांतून (पोट व छातीतील इंद्रियांतून) प्राणेशा (मेंदूपासून निघणारी दहावी व अंतस्त्ये व हृदय ह्यांकडे जाणारी) व अनुकंपी तंत्रिका [→तंत्रिका तंत्र] या होत. केंद्रापासून निघणाऱ्या अपवाही (मेंदूकडून खाली जाणाऱ्या) प्रेरणा, प्राणेशा, मध्यपटल (छाती व पोट यांच्यामध्ये असलेल्या स्‍नायुमय पडद्यातील) तंत्रिका व अनुकंपी तंत्रिकामार्गाने जठर, ग्रहणी (लहान आतड्याचा सुरूवातीचा भाग), ग्रसनी (घसा) वगैरे ठिकाणच्या स्‍नायुंचे आकुंचन घडवून आणतात. या केंद्राच्या जवळच, लालास्त्रावक (लाळ सुटण्याची केंद्रे), श्वसन व वाहिनीप्रेरक (रक्तवाहिन्यांचे आकुंचन करणारी) केंद्रे असल्यामुळे ओकारीच्या वेळी तोंडाला पाणी सुटणे, श्वास रोखला जाणे व रक्तवाहिन्यांचे प्रसरण दृष्टीस पडते.

ओकारीच्या आधी मळमळू लागून तोंडाला पाणी सुटते. प्रथम ग्रहणी व रिक्तात्र (लहान आतड्याचा दुसरा भाग) यांच्या भित्तीतील स्‍नायुंचे प्रदीर्घ आकुंचन होते. नंतर उदरद्वार बंद होऊन उदरभित्तीतील स्‍नायुंचा खालून वर असा क्रमसंकोच (पुढे पुढे सरकत जाणारे स्‍नायुंचे संकोचन होतो. त्याच वेळी जठर-बुध्‍‌नातील (जठराच्या पहिल्या फुगीर भागातील) स्‍नायू शिथिल होऊन रिक्तांत्र, ग्रहणी व जठर या भागांतील सर्व पदार्थ जठर-बुध्‍‌नात जमा होतात. नंतर ग्रासनलिकेचे (घशापासून जठरापर्यंत अन्न नेणाऱ्या नळीचे) जठरातील द्वार उघडून ग्रासनलिकाही शिथिल होते. उदरांतील स्‍नायू व मध्यपटलातील इच्छानुवर्ती स्‍नायू आकुंचित होऊन ते पदार्थ तोंडावाटे बाहेर फेकले जाता. त्यावेळी स्वरयंत्र बंद होते.

कारणेओकारी एक लक्षण असून तिला अनेक कारणे असू शकतात. या कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे : (१) स्थानिक, (२) विषजन्य, (३) प्रतिक्षेपी, (४) तंत्रिकोत्पन्न व (५) रोधजन्य.

स्थानिक

जठारात काही क्षोभक पदार्थ गेल्यास त्या पदार्थामुळे जठाराच्या अंतस्तराचा (आतल्या बाजूच्या पेशींच्या थरांचा) क्षोभ होऊन उलटी होते. विषारी पदार्थ, तीव्र अम्‍ले व क्षार (अल्कली), कुजलेले व आंबलेले अन्न, मद्य, मसाल्याचे व तेलकट पदार्थ फार खाल्ले तर किंवा एकाच वेळी फार अन्न खाल्ले तर ओकारी होते. या प्रकारात बहुधा तो क्षोभकारी पदार्थ पडून गेला म्हणजे रोग्याला बरे वाटते.

विषजन्य शरीरातच उत्पन्न होणारे विषारी पदार्थही ओकारी करणारे असतात. उदा., मूत्रविषरक्तता (मूत्रातून बाहेर पडणारे धातुक पदार्थ बाहेर न पडल्यामुळे होणारा विकार), गर्भिणीविषबाधा (गर्भाच्या अस्तित्त्वामुळे गरोदर स्त्रीला होणरी विषबाधेची लक्षणे), यकृत तंत्त्वात्मक (यकृतात तंतू उत्पन्न झाल्यामुळे यकृताचे कार्य बिघडते तो रोग) रोग वगैरे.

प्रतिक्षेपी

अंतस्त्यांत एकाएकी वेदना उत्पन्न करणाऱ्या विकारात ओकारी होते. उदा., वृक्कशूल (मूत्रपिंडाच्या वेदना), पित्तशूल (पित्तामुळे होणारी वेदना), पचनज व्रण, पर्युदरशोथ (पोटातील इंद्रियांवर असलेल्या पातळ थराची दाहयुक्त सूज) वगैरे विकारांत अभिवाही संवेदना उत्पन्न होऊन तिचा प्रतिक्षेप म्हणून ओकारी होते. प्रावासजन्य विकारांतील ओकारी प्रतिक्षेप असते.

तंत्रिकोत्पन्न

मस्तिष्कावरील (मेंदूवरील पातळ वेष्टनावर) कोणत्याही कारणामुळे दाब वाढला तर ओकारी होते. उदा., मस्तिष्कार्बुद (पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेली मेंदूतील गाठ), मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज), परिमस्तिष्कशोथ (मेंदूच्या वेष्टनाला आलेली सूज) वगैरे. अर्धशिशी, उन्माद (मन आणि तंत्रिका यांच्या कार्यामध्ये उत्पन्न होणारा एक रोग) या रोगांतील ओकाऱ्या याही तंत्रिकोत्पन्न असतात. भीती, किळस, उद्वेग वगैरे भावनोद्रेकांमुळे होणारी ओकारी याच प्रकारात मोडते.

रोधजन्य

आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) रोध (अडथळा) झाल्यास तेथील अन्न व इतर पदार्थ परत येऊन ओकारीवाटे तोंडातून बाहेर पडतात. ही ओकारी जोराने व लांबपर्यंत होते म्हणून तिला प्रक्षेपी ओकारी म्हणतात.

ओकारीवाटे खाल्लेले व अर्धवट पचलेले पदार्थ व श्लेष्मयुक्त (बुळबुळीत) लाळ पडते. काही रोगांत रक्तही पडते. ते लाल असेल तर ग्रास नलिका किंवा जठरातून आलेले असते. कॉफीसारखा रंगाचे किंवा डामराच्या रंगाचे असल्यास ते आंत्रातून आलेले असते.

ओकारीची चिकित्सा तिच्या कारणांवर अवलंबून असल्यामुळे ती शोधून काढून त्यावर चिकित्सा करतात. तात्पुरता उपाय म्हणून ओकारीविरोधी व शामक औषधांचा उपयोग होतो.

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा

उलटीमध्ये गती सुलटी करणे या दिशेने उपचार करावयाचा असतो. म्हणून बलवान मनुष्याला सारखी उलटी होत असेल आणि उलटीत दोष पुष्कळ प्रमाणात बाहेर घालवले जात असतील, तर ह्या पुरूषाच्या प्रयत्‍नाला मदत करण्याकरिता गेळफळ देऊन ती आमाशयातील अनिष्ट द्रव्ये बाहेर काढून टाकावी. नंतर स्वादू अशा फळांच्या रसाबरोबर किंवा मद्याबरोबर किंवा दुधाबरोबर अवस्थांना अनुसरून रेचक द्यावे. त्यामुळे शिल्लक राहिलेले थोडे विष खाली नेऊन गुदद्वाराने बाहेर काढावे. नंतर सोसवेल तसे लंघन द्यावे. रोगी जर रूक्ष व दुर्बल असेल तर वांतिशामक औषध स्वादिष्ट अशा अनुपानातून द्यावे.

अन्न

गहू, भात इत्यादींच्या लाह्या, लाडू, कोरडे आवडणारे सवयीचे स शरीराला त्रासदायक न होणारे असे हलके अन्न द्यावे. धान्याची कढणे, मांसाचे रस, पन्ही, सांभारी, कोशिंबीरी, भाज्या, चटण्या, अवहेल, पापड, चिवडा इ. कोरडे व स्वादिष्ट दोषशामक प्रकृतीला अनुरूप आहार द्यावा. खारीक, जरदाळू वगैरे सुकी फळे, सुगंधी फळे, फुले, तेले, अत्तरे यांनी युक्त अर्क व आसवे द्यावीत. स्‍नान करावे. जेवण झाल्याबरोबर रोग्याच्या तोंडावर त्याला न कळता थंड पाण्याचे शिपके मारावे. वातज वांती असेल आणि खोकला व छातीत धडधड होत असेल तर कोमट तुपाबरोबर सैंधव पिण्यास द्यावे किंवा सुंठ, मिरे, पिंपळी, सैंधव, पादेलोण व बिडलोण हे कोमट तुपात भरपूर घालून किंवा डाळिंबाच्या रसात सिद्ध केलेले तूप द्यावे. नेहमी स्‍निग्ध आहार द्यावा. विष्किर पक्षी म्हणजे कोंबडा वगैरे पक्ष्यांचा रस, सैंधव आणि तूप तसेच आंबट फळांचा रस द्यावा. सुंठ, दही, डाळिंब ह्यांनी युक्त स्‍निग्ध आहार द्यावा. एरंडेलामध्ये सैंधव घालून रेचक द्यावे. पित्तज वांती असेल तर द्राक्ष, ऊस ह्यांच्या रसाबरोबर रेचक म्हणून तेड द्यावे. तैल्वक तूप द्यावे. आमाशयात पित्त जास्त असेल तर मधुर आणि कडू द्रव्याबरोबर गेळफळ देऊन ओकारी करवून वरच्या बाजूने पित्त बाहेर काढावे. लाह्या, मद्य आणि साखर घालून पेज पाजावी. मूग, जांगल प्राण्यांचा मांसरस, वर निरनिराळ्या चटण्यांबरोबर चांगला भात खावा. मातीचे ढेकूळ तांबडे लाल तापवून पाण्यामध्ये विझवावे व ते पाणी गाळून द्यावे. मूग, काळा वाळा, पिंपळी व धणे रात्रभर पाण्यात भिजत घालून ते पाणी द्यावे. मनुका व असाणा खावा. गुळवेलीचा काढा किंवा दूध पाजावे. आवळ्याच्या रसाबरोबर मुगाचे कढण, बोराचे बी, खडीसाखर, लाह्या, पिंपळी, रसांजन पाजावे. हिरडा, मनुका किंवा बोर मधाबरोबर चाटवावे. कफज वांती असेल तर पिंपळी, मोहऱ्या आणि गेळफळ ह्यांनी वांती करवावी. दुर्बल असेल तर उपवास द्यावा. आरग्वधादी गणाचा काढा मद्य घालून थंड करून द्यावा. जवाला ओकारीनाशक औषधांच्या भावना देऊन त्याचे पेय करून द्यावे. कफघ्‍न आणि रूचकर असे अन्न द्यावे. आजवाला, रोहिश गवत घालून ह्यांची पन्हे करून प्यावीत. मन:शील, पिंपळी, मिरी महाळुंगाच्या रसात किंवा कवठाच्या गरात घालून चाटावी. त्यात मध घालावे. सुंठ, मिरी, पिंपळी व मध घालून कवठाबरोबर खावे किंवा मधाबरोबर धमासा चाटवावा.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate