उष्ण आणि दमट वातावरणात शरीरातील उष्णता वाढू न देण्यासाठी अधिक घाम बाहेर टाकला जातो, रक्तप्रवाह वाढतो आणि तोंडातून उष्ण हवा बाहेर पडते. सामान्य तापमानाला शरीरातील तापमान मर्यादेत राखले जात नसेल, तर शरीराचे तापमान मर्यादेबाहेर वाढून ऊष्माघात होतो. ऊष्माघातात शरीराचे तापमान एवढे वाढू शकते की, त्यामुळे शरीरातील इंद्रियांमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. उष्णकटिबंधात ऊष्माघाताचे प्रमाण अधिक दिसते. सामान्यपणे उन्हाळ्यात एखादी व्यक्ती अधिक वेळ उन्हात राहिली अथवा अतिश्रम किंवा व्यायाम करीत राहिली तर ऊष्माघात होतो. अतिखाणे, अतिमद्यपान आणि रक्तप्रवाह व श्वसन नीट मोकळेपणे होणार नाही इतके घट्ट कपडे वापरणे अशा बाबी ऊष्माघात होण्यास कारणीभूत ठरतात. लहान मुले, वृद्ध, मधुमेहाचे रुग्ण आणि मद्यपान करणार्या व्यक्ती यांना हा विकार तरुणांपेक्षा लवकर होऊ शकतो.
या विकारात घाम येण्याचे कमी-कमी होत जाऊन शेवटी घाम येण्याचे बंद होते, एकाएकी घेरी येऊ लागते; ओकारी किंवा अतिसार होतो, मन:स्थिती क्षुब्ध होऊन व्यक्ती बेशुद्ध पडते; चेहरा लाल होतो, त्वचा गरम व लाल होते आणि कोरडी पडते; शरीराचे तापमान ४२-८० से. पेक्षा अधिक वाढते; नाडीचे ठोके वाढतात आणि श्वासोच्छवास सुरुवातीला वेगाने होऊन नंतर मंदावतो, शरीराचे तापमान वाढत राहिल्यास मेंदूवर परिणाम होतो. वेळेवर योग्य उपचार न झाल्यास त्या व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो.
पहिल्या २४ ते २८ तासांत योग्य उपचार केल्यास ऊष्माघात झालेली व्यक्ती बरी होऊ शकते. मात्र अस्वस्थता, बेशुद्धी व वात उद्भवणे ही लक्षणे काही काळ टिकतात. ऊष्माघात झालेल्या व्यक्तीची योग्य काळजी न घेतल्यास पुन्हा ऊष्माघात होऊ शकतो. ऊष्माघात तीव्र स्वरूपाचा असल्यास नाक, यकृत, मेंदू, हृदय, वृक्क (मूत्रपिंड) इत्यादींतून रक्तस्त्राव होतो. ऊष्माघात झालेल्या व्यक्तीला आडवे झोपवून सर्व बाजूंनी थंड हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करावी. शरीर थंड पाण्याने पुसावे. शक्य झाल्यास ऊष्माघात झालेल्या व्यक्तीचे शरीर गळ्यापर्यंत पाण्यात ठेवावे. याबरोबरच वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावेत.
ऊष्माघात टाळण्यासाठी तीव्र उन्हात जाणे टाळावे. जाणे आवश्यक असल्यास डोके व चेहरा कपड्याने झाकावा. विशेषत: उन्हाळ्यात कामे सकाळी व संध्याकाळी करावीत, रोज थंड पाण्याने स्नान करावे व पाणी भरपूर प्यावे.
टिळवे, दयास्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/8/2020
उन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या...
ऊष्माघात झालेल्या व्यक्तिला आवश्यक असणाऱ्या उपचारा...
वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळ...
उन्हाळ्यात हिरव्या वैरणीची टंचाई, पिण्याच्या पाण्य...