आलर्क हा मानवाला आणि सस्तन प्राण्यांना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होणारा एक संसर्गजन्य, जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या (उदा., कुत्रा, मांजर इ. ) चावण्यामुळे या रोगाचे विषाणू लाळेतून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात. शरीरात प्रवेश केल्यानंतर हे विषाणू केंद्रीय चेतासंस्थेवर हल्ला करतात. मानवामध्ये या विषाणूंचा परिपाककाल २१ ते १२० दिवस इतका असतो. परिपाककालानंतर प्राण्याच्या चावण्यामुळे झालेली जखम भरून आलेल्या ठिकाणी खाज व वेदना सुरू होतात. रोग्याला नैराश्य व चिडचिडपणा येतो. ही अवस्था दोन दिवस टिकते.
रोग्याच्या दुसर्या अवस्थेत ( याला उन्मादकाल म्हटले जाते) रोगी अतिशय संवेदनशील बनतो; त्याच्या वागण्यात विचित्रपणा वाढतो. त्याला श्वसनास व गिळण्यास त्रास होऊ लागतो. रोग्याला तहान लागलेली असते पण पाणी गिळता येत नाही. म्हणूनच या अवस्थेला जलद्वेष (जलसंत्रास) म्हटले जाते. त्याचबरोबर या काळात उलटी येणे व ३९० से. पर्यंत ताप वाढणे ही लक्षणे दिसून येतात. तोंडात व घशात श्लेष्मा जमा होतो आणि त्यामुळे खोकला येतो. ही अवस्था साधारणपणे ३ ते ५ दिवस असते. त्यानंतर बव्हंशी येणारा मृत्यू हृदयविकार किंवा श्वसनविकार यामुळे होतो.
प्राण्यांमध्ये आलर्क रोगाचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात
(१) तीव्र उत्मादक,
(२) पक्षाघाती.
तीव्र उन्मादक आलर्क हा मानवामध्ये होणार्या आलर्क रोगासारखाच असतो. आलर्कग्रस्त प्राणी इतर प्राण्यांना चावतो. पक्षाघाती आलर्क रोगात उन्मादकाल कमी असतो किंवा जवळजवळ नसतोच. पाळीव प्राण्यांना या रोगाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्यामुळे कुत्रा, मांजर यांना आलर्क प्रतिबंधक लस देणे, हे कायद्याने बंधनकारक आहे.
इ.स. १८०४ पर्यंत आलर्क रोगाचा प्रसार कसा होतो याची माहिती नव्हती. १८८४ साली लुई पाश्चर यांनी आलर्क रोगावर सर्वांत प्रथम लस शोधून काढली व मानवाचे या रोगापासून रक्षण केले. आधुनिक उपचारपद्धतीत प्रथम ज्या ठिकाणी कुत्रा चावला आहे ती जखम स्वच्छ करून तिथे आलर्क प्रतिबंधक लस दिली जाते. पूर्वी दररोज एक अशी चौदा अंत:क्षेपणे (इंजेक्शने) पोटाच्या त्वचेखाली दिली जात. त्यानंतर दोन वेळा संवर्धक डोस १० दिवसांच्या अंतराने दिले जात असत. या लशीमध्ये निष्क्रिय केलेले विषाणू बदकाच्या अंड्यात वाढवून वापरले जात असत. आता ही लस मानवी पेशींमध्ये विषाणूंचे संवर्धन करून तयार केली जाते.
ही लस अधिक सुरक्षित व परिणामकारक आहे. या पद्धतीत दिल्या जाणार्या एकूण अंत:क्षेपणांची संख्या कमी आहे. कुत्रा चावल्यानंतर तिसर्या व सातव्या दिवशी ही नवीन लस टोचतात. कुत्रा पिसाळलेला असल्यास अधिक (पाचपर्यंत) अंत:क्षेपणे ठराविक दिवसांच्या अंतराने देतात. एकदा आलर्क रोगाची लक्षणे दिसायला लागल्यानंतर लस देऊन उपयोग होत नाही. पाळीव प्राण्यांच्या बरोबर माकड, लांडगा, कोल्हा व वटवाघूळ यांच्या चावण्यामुळेही आलर्क विषाणूंचा प्रसार होतो.
लेखक - मेधा तेंडुलकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...