अवयवातील रोहिणीचा आकस्मिक रोध झाला तर रक्तपुरवठा थांबल्यामुळे तेथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांचा) मृत्यू होतो, त्या अवस्थेला ‘अभिकोथ’ असे म्हणतात. असा रोध रोहिणामध्ये अंतर्कीलन (रक्ताची गुठळी किंवा इतर बाह्य पदार्थ अकस्मात अडकून रक्तप्रवाह बंद पडणे, ® अंतर्कीलन) अथवा वाहिनीक्लथन झाल्याने उत्पन्न होतो.
शरीरातील बहुतेक अवयवांना भरपूर पार्श्वपरिवहनाची (जेव्हा मुख्य नीला किंवा रोहिणी यांमधून रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा नजिकच्या वाहिनीतून लहान वाहिन्यांच्या जाळ्यांमार्फत रक्तपुरवठा सुरू होण्याची) सोय असते. हाताच्या पंजामधील रोहिणीचाप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या चापाच्या दोन्ही बाजूंस दोन मोठ्या रोहिण्या मिळत असल्यामुळे एका रोहिणीत रोध झाला, तरी त्या भागाचा रक्तपुरवठा थोड्याच वेळानंतर पूर्ववत सुरू होतो. हृद्स्नायू, फुप्फुस, प्लीहा, वृक्क (मूत्रपिंड) व थोड्या प्रमाणात आंत्र (आतडे) या अंतस्त्यांत (अंतर्गत इंद्रियांत) अशा पार्श्वपरिवहनाची सोय नसल्यामुळे त्यांच्या एखाद्या भागाची रोहिणी रुद्ध झाली तर त्या भागाचा अभिकोथ होतो.
अभिकोथ झालेल्या भागाचा आकार त्रिकोणाकृती असून त्रिकोणाचे शीर्ष रोधस्थळी आणि त्याचा पाया त्या अंतस्त्याच्या परिघीय भागांकडे असतो.
मुख्य रोहिणीचा आकस्मिक रोध झाल्याबरोबर संबंधित ऊतकांचा रक्तपुरवठा एकदम बंद होतो. पार्श्वपरिवहन लौकर सुरू झाले नाही तर त्या ग्रस्त भागातील ऊतकांचा मृत्यु होतो. ग्रस्त भागाभोवताली रक्तपुरवठा नेहमीसारखा चालू असल्यामुळे तेथे जाड व लाल रंगाची कड दिसू लागते. काही वेळा ग्रस्त भागात बाजूकडून रक्त गेल्याने तो भाग लाल दिसू लागतो. असे बाजूचे रक्त तेथे न गेल्यास तो भाग पांढरट फिकट (पांडुर) दिसू लागतो. म्हणून अभिकोथाचे ‘लाल’ व ‘पांडुर’ असे प्रकार दिसतात. फुप्फुस व प्लीहा या अंतस्त्यांत अभिकोथ झाला तर तो बहुधा लाल अभिकोथ असतो. हृदय, वृक्क वगैरे अंतस्त्यांत झालेला अभिकोथ बहुधा पांडुर असतो.
रोहिणीचा अवरोध झाल्यानंतर काही वेळ त्या ग्रस्त भागात रक्त अधिक साठल्यासारखे वाटते पण नंतर ती जागा रक्तहीन व फिकट दिसू लागते. पार्श्वपरिवहनामुळे भोवती अधिक रक्त असलेली कड दिसू लागते. ज्या भागाला पार्श्वपरिवहन होऊ शकत नाही त्या भागाचा क्लथनकोथ (गोठून कुजणे) होऊन तेथील सर्व कोशिकांचा नाश होतो. असा नाश रोध उत्पन्न झाल्यापासून ४८ तासांत होतो. त्यानंतर नष्ट झालेल्या कोशिका हळूहळू शोषिल्या जाऊन त्यांची जागा तंत्वात्मक (तंतुमय) ऊतकाने भरून येते. कालांतराने अभिकोथाच्या जागी तंतूंचा बनलेला असा व्रण दिसतो.
हृद्वाहिनीच्या शाखांमध्ये रोध उत्पन्न झाल्यामुळे अकस्मात् छातीत दुखू लागून ‘हृदयविकार-झटका’आल्याची उदाहरणे अलीकडे अधिक प्रमाणात दिसतात; त्यामुळे हृद्वाहिनी-अभिकोथाला फार महत्त्व आहे. हृद्वाहिनीच्या मोठ्या शाखेचा रोध झाल्यास अगदी थोड्याच वेळात मृत्यु येतो, परंतु लहान शाखेत रोध झाल्यास कालांतराने अभिकोश झालेले हृद्स्नायू शोषिले जाऊन त्यांच्या जागी तंत्वात्मक ऊतकांनी बनलेला व्रण तयार होतो.
लेखक : ना. रा. आपटे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/7/2020