অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक औषधे

विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती

होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे. ऍलोपथीमध्ये प्रभावी, निर्धोक अशी औषधे 19 व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही फारशी नव्हती. विसाव्या शतकात, विशेषतः गेल्या पन्नास-साठ वर्षांत मात्र या शास्त्रात अत्यंत वेगाने प्रगती झाली. गुणकारी व तुलनेने निर्धोक अशी शेकडो औषधे आता बहुसंख्य रोगांसाठी उपलब्ध आहेत. याचे श्रेय एकतर सर्वसाधारण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आहे. कारण निरनिराळया विज्ञान-क्षेत्रांतील प्रगतीच्या आधारेच आधुनिक औषधशास्त्र उभे राहिले आहे. त्याचबरोबर आधुनिक औषधशास्त्राची एक पध्दत, शिस्त तयार झाली आहे. जगभर ती शिस्त मानली जाऊन त्या आधारे संशोधन होते. त्याचा फायदा सर्व मानवजातीला मिळतो हेही महत्त्वाचे आहे. नवीन औषध शोधताना ते प्रभावी  व तुलनेने निर्धोक आहे याची खात्री एका समान पध्दतीच्या आधारे करतात. औषध उत्पादक कंपन्यांनीही संशोधन करून अनेक नवी औषधे तयार केली आहेत.

औषध संशोधन

वनस्पती, प्राणी, जीवजंतू, क्षार, खनिज यांवर गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया करून आधुनिक औषधे तयार केली जातात.

  • प्राण्यांमध्ये विशिष्ट विकार निर्माण करून त्यावर एखादे औषध उपयोगी पडते का ते पाहिले जाते. एकाच वेळी अनेक उंदीर वा तत्सम प्राणी निवडले जातात. पैकी निम्म्यांना हे नवीन औषध दिले जाते तर निम्म्यांना वरून तशाच दिसणा-या कॅपसूलमध्ये  निरुपद्रवी पदार्थ घालून दिली जाते. आजार बरे होण्याचे प्रमाण हे औषध दिलेल्या गटामध्ये जास्त आढळले तरच हे औषध प्रभावी  ठरते.
  • तसेच औषधाच्या नेहमीच्या डोसच्या अनेकपट डोस प्राण्याला देऊन त्याचे दुष्परिणाम अभ्यासतात. सध्या अस्तित्त्वात असलेल्या औषधांच्या मानाने हे नवीन औषध प्राण्यांमध्ये प्रभावी व तुलनेने निर्धोक ठरले तरच संशोधक पुढे जातात.
  • यानंतर मानवी स्वयंसेवकांमध्ये त्याची चाचणी घेतली जाते. या चाचणीत ते पुरेसे परिणामकारक, पुरेसे निर्धोक ठरले तरच सर्वसामान्य वापरासाठी ते खुले केले जाते. या सर्व चाचण्या योग्य पध्दतीने पार पाडण्याचे, त्याचे निष्कर्ष तपासण्याचे शास्त्रशुध्द निकष असतात. या सर्व निकषांना एखादे औषध उतरले तरच ते शास्त्रीय दृष्टया सिध्द झाले असे समजतात. हे सर्व करायला दहा ते वीस वर्षे व कोटयवधी रुपये खर्ची पडतात.

या सर्व चाचण्यांना उतरलेली सुमारे हजारभर पुरेशी गुणकारी व पुरेशी निर्धोक औषधे शास्त्रज्ञांना आतापर्यंत सापडली आहेत. पैकी जागतिक आरोग्यसंघटनेने सुमारे तीनशे औषधांना आवश्यक औषधे (बहुसंख्य आजार बरे करण्यासाठी आवश्यक) म्हटले आहे. ही औषधे पुरेशा प्रमाणात, सर्वत्र व नेहमी उपलब्ध असलीच पाहिजेत अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.

आधुनिक औषधशास्त्र

नवनवीन औषधांचा शोध कायम चालूच राहणार आहे. पण प्रत्येक औषध शास्त्रीय कसोटीला तावून सुलाखून उतरले पाहिजे. नाहीतर एखादे औषध बाजारात येऊन लाखो लोकांनी वापरल्यावर लक्षात आले, की ते खरोखर गुणकारी नाही (कारण अनेकदा आजार आपोआप शमतात) किंवा त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत तर ते फार महागात पडते. पूर्वी असे अनेकदा झाले आहे. त्यामुळे नवीन औषधांबाबतचे निर्णय आता अधिक काटेकोर कसोटीवर घेण्याची प्रथा आहे.

नवीन, अधिक परिणामकारक, स्वस्त, अधिक निर्धोक औषधे उपलब्ध होत आहेत. या तुलनेत दृष्टीने डावी जुनी औषधे कालबाह्य समजून त्यांचे उत्पादनच बंद व्हायला हवे असे आधुनिक औषधशास्त्र सांगते. पण भारतात मात्र अनेक कालबाह्य औषधे सर्रास खपवली जातात.

आधुनिक औषधशास्त्र हे अत्यंत प्रगत, गतिशील शास्त्र आहे. औषधशास्त्र हे वैद्यकशास्त्राचे एक अत्यंत महत्त्वाचे उपांग आहे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate