निलंगा तालुक्यातील सहाशे ते सातशे लोकसंख्या असणारी आनंदवाडी (गौर) ग्रामपंचायत सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असून नवनवे उपक्रम राबविण्यात गावातील महिला यशस्वी ठरल्या आहेत.
आनंदवाडी गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘महिलाराज’ चालते. गावच्या सरपंच श्रीमती भाग्यश्री चामे यांच्या सहकार्यातून संपूर्ण गावातील लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून अवयवदानाचा संकल्प केलेल्या गावकऱ्यांची संख्या सुमारे 650 इतकी आहे. सर्व गावकऱ्यांची साथ असून त्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, शेती, वीज, पाणी या मूलभूत गरजाच्या बाबतीत आनंदवाडी स्वयंपूर्ण बनले आहे. जि.प. शाळेनेही डिजिटल शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत स्वारस्य आणले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ज्ञान अवगत करण्याच्या तंद्रीत शिकणारी मुलं बघितल्यावर वाटते की तादात्म्य वृत्तीने मुलांनी शिक्षण घेणे म्हणजे यावेगळे काहीच नाही. यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे कौतुकच आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारुन आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाण ठेवून स्वत:च्या, कुटुंबाच्या आणि गावाच्या, पर्यायाने राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या येथील महिला ह्या खऱ्या अर्थाने समाजातील आदर्श कारभारणी झाल्या आहेत. त्यांचा विकास आणि त्यांच्या गुण कर्तृत्वाला समान संधी देऊन त्यांना प्रोत्साहन मिळाले तर समाजातील विधायक कार्याला अभिनव यश प्राप्त होते, हे आनंदवाडीच्या महिलांच्या कार्यातून सिद्ध होते. आनंदवाडीच्या महिला सर्वच कार्यात अग्रभागी असतात. लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आनंदवाडी हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. तंटामुक्त गाव म्हणून हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर परीचित आहे. कुटुंबातील महिलांचे वाद आणि सासूसुनांचे वाद तर येथे होतच नाहीत. संवाद आणि सामंजस्यातून फक्त आनंद आणि सर्वांचा विकास याच भावनेतून प्रेरीत झालेला या गावातील प्रत्येक गावकरी दिसतो.
आत्तापर्यंत फक्त पुरुषांकडेच संपत्तीचा अधिकार होता आणि आहे, पण आनंदवाडीतील सर्व घरे आणि शेती ही कुटुंबातील महिलांच्या नावे आहेत. ग्रामीण भागातील प्रथेला छेद देत या गावातील सर्व घरांचा मालकी हक्क महिलांच्या नावे आहे. महिलांच्या नावे घर आणि शेती असल्याने एक शाश्वत विश्वास निर्माण करणारे आणि पुरुषी मानसिकतेतून बाहेर येणारे हे गाव खरंच महिला इतकंच पुरुषांच्या सहकार्यासाठी देखील कौतुकास पात्र आहे. प्रत्येक अडचणीच्यावेळी एक कुटुंब म्हणून येथील पुरुष गावातील इतर महिलांच्या पाठी एक भाऊ म्हणून उभे राहतात. त्यातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊराया ओवाळणी म्हणून गावातील महिलांची आरोग्य तपासणी ही अनमोल भेट म्हणून देतो. सर्वार्थाने एकमेकांची काळजी, प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याची भावना बघून पृथ्वीवरील नंदनवन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असं म्हणावं वाटतं.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सर्व सण, उत्सव, विवाह, समारंभ एकत्र साजरे करतात. हुंडाबंदी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी या गावात केली जाते. गरिब आर्थिक- दृष्टया कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी सर्वजण मदत करतात. जात-पात,धर्म-पंथ हा भेद मनात न ठेवता सर्वांच्या सुखाचा विचार येथे केला जातो. विधवा महिलांना आपल्या दु:खाची जाणिव होऊ नये म्हणून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून एकमेकांना सहभागी करुन घेण्याची समन्यायी भावना या गावात वृध्दींगत होत आहे.यामध्ये गावच्या महिला मोठया प्रमाणात यासाठी प्रयत्न करतात. ही राज्यातील आदर्श ग्रामसंस्कृतीतील महिलांच्या विधायक कार्याचा आणि विचारांची अभिमानाची बाब आहे. आनंदवाडी (गौर) या गावाचे हे चित्र बघून आजूबाजूच्या गावातदेखील स्त्रियांच्या कार्याचा आणि क्षमतांचा सन्मान केला जात आहे. महिलाराज असलेली आनंदवाडी (गौर) हे गावातील महिलांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे.
- मीरा ढास
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...