पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू दरात घट होत आहे. दुर्गम भागातील कुपोषित बालकांवर उपचार करुन त्यांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. सावरोली पाडा येथील जुळ्या बालकांवरील मातेचे छत्र जन्मताच हरपले. त्यातच या बालकांचा जीव दुर्धर त्वचा विकार आणि कुपोषणामुळे धोक्यात आला होता. मात्र आरोग्य यंत्रणेने अथक परिश्रम करुन परिणामी खासगी रुग्णालयाचे सहकार्य घेऊन या बालकांना जीवनदान दिले.
डिसेंबर 2017 मध्ये घडलेल्या या घटनेच्या तीन महिन्यानंतर या बालकांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर सावरोली उद्यान पाडा, अंगणवाडीमध्ये नियमित पोषण आहार व आमगाव आरोग्य केंद्राद्वारे औषधोपचार केला जात आहे. त्यामुळे दोन्ही बालके तीव्र कुपोषित गटातून मध्यम कुपोषित गटात आली आहेत. नियमित औषधोपचारामुळे त्यांचे वजनदेखील वाढले आहे. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी आमगावला भेट देऊन या जुळ्या बालकांची प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. गेल्या दोन वर्षात पालघरमधील बालमृत्यू कमी करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
पालघर कुपोषण निर्मुलन टास्क फोर्स आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली असून आरोग्यमंत्री 15 दिवसांतून या भागाचा दौरा करतात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला. गेल्या दोन वर्षाच्या अनुभवावरुन या भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध प्रयोग करीत आहे. त्यात यश येत असून या वर्षी या भागातील बालमृत्यूचे प्रमाण तुलनेने घटले आहे.
कुपोषित बालकांवर योग्य उपचार होत आहेत की नाहीत याबाबत सरपंचांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक असून त्यासाठी दरमहा ग्रामसभेमध्ये गाव, पाड्यावरील मध्यम आणि तीव्र कुपोषित बालकांची यादी वाचून दाखवावी. त्याचबरोबर या बालकांवर होणाऱ्या उपचाराबाबत माहिती देखील एएनएम, आशा कार्यकर्ती आणि मलेरिया वर्कर यांनी द्यावी. जेणेकरुन बालकांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती ग्रामसभेतून नागरिकांना मिळेल. कुपोषित बालकांबाबत सरपंचांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राला माहिती द्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या भागात स्थानिकांना आहे तेथेच रोजगार मिळाल्यास स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी कार्यक्रमात गवत कापणीचा कार्यक्रम घेतल्यास स्थानिक आदिवासी नागरिकांना रोजगारासाठी अन्यत्र जावे लागणार नाही. घरपोच धान्य वितरण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचबरोबर पुनरागमन आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याद्वारे स्थलांतरीत झालेल्या आणि परत आलेल्या बालकांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
या भागात दैनंदिन वापरासाठी ओल्या लाकडांचा वापर होतो. त्यामुळे धूर होऊन त्याचा संसर्ग बालकांना होतो. ते टाळण्यासाठी या भागात शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले धूरमुक्त कोरडे सरपण दिल्यास धुरामुळे होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होईल. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात पाचपेक्षा जास्त बालमृत्यू आहेत तेथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कुपोषित बालकांची काळजी घेणारे आई-वडील तसेच अन्य नातलगांचे आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अजय जाधव
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/18/2020