देशातील सर्व शहरामधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार हे अभियान 2 ऑक्टोबर 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामधील सर्व शहरामधील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबाना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरामधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राहील. महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत करण्यात येत आहे.
स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश उघड्यावरील शौचविधी बंद करणे, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्ती, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयीमध्ये बदल, स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करून त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे आणि भांडवली खर्च आणि ऑपरेशन आणि देशभाल यासाठी खाजगी संस्थांच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे हा आहे. हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नगरपालिकांनी संपूर्ण स्वच्छतेच्यादृष्टीने पावले टाकली आहेत.
राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केलेली आहे. 42 नगरपरिषदा/नगरपंचायतीपैकी 30 स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. उर्वरित बारापैकी आठ स्थानिक स्वराज्य संस्थांनी हागणदारीमुक्तीची घोषणा करणारे ठराव केले आहेत. त्याची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी सुरु आहे. विभागातील एकूण 42 नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये 20 हजार 383 वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून त्यापैकी 15 हजार 6 शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली असून 3 हजार 239 शौचालये बांधकामे प्रगतीपथावर आहेत. कोकण विभागाने शौचालये बांधकामाचे 73.62 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असून जून अखेर 100 टक्के शौचालये पूर्ण होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी 95.28 टक्के उद्दिष्टपूर्तींसह आघाडीवर असून ठाणे 94.22 टक्के, पालघर 77.42 टक्के, सिंधुदूर्ग 71.72 टक्के व रायगड 60.28 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. संपूर्ण विभागात सिंधुदुर्ग व ठाणे हे जिल्हे पूर्णपणे हागणदारीमुक्त झाले आहेत.
राज्यामध्ये एकूण 11 जिल्हे आज अखेर हागणदारी मुक्त झालेले आहेत. त्यापैकी कोकण विभागातील 5 जिल्ह्यांपैकी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे हागणदारीमुक्त (ODF) घोषित झालेले आहेत. राज्यातील गुणानुक्रमांकानुसार पहिल्या 15 जिल्ह्ंयामध्ये कोकण विभागातील सर्व 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण विभागातील एकूण 45 तालुक्यांपैकी 38 तालुके आज अखेरीस हागणदारीमुक्त घोषीत झालेले आहेत. कोकण विभागातील एकूण 2 हजार 968 ग्रामपंचायतीपैकी 2 हजार 737 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. 231 ग्रामपंचायती शिल्लक आहेत. 2012 च्या बेसलाईन सर्वेनुसार एकूण 13 लाख 31 हजार 561 कुटूंब संख्या आहे. दि.31 मे 2017 अखेर वैयक्तिक शौचालय असलेली एकूण 12 लाख 60 हजार 962 कुटुंब संख्या आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यात सुरु आहेत. यामुळे शहरे स्वच्छ होत आहेत. शौचालयांची निर्मिती होत आहे. शासकीय पातळीबरोबरच सामाजिक संस्था, लोकसहभाग स्वच्छ महाराष्ट्रासाठी प्रयत्न करत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र हे आता अभियान राहिले नसून तिला चळवळीचे रुप प्राप्त झाले आहे.
- विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
स्वच्छ भारत अभियानात एक वेगळी ओळख.