कोट्यवधी माता - भगिनींची आपली ठरलेली आणि त्यांना एकाचवेळी धुरापासून सुटका देताना आरोग्य वर्धन करणारी योजना म्हणून उज्ज्वला योजनेचा उल्लेख करता येईल. यात केवळ आरोग्यच नाही तर ग्रामीण भागातील महिलांची रोजच्या चुलीसाठी होणारी पायपीट आणि वन्य प्राणी व इतर बाबींपासून असणारा धोका यातूनही महिलांची सुटका झाली आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर चुलीचा वापर होतो. या चुलीसाठी सरपण गोळा करणे व अन्नधान्य शिजवणे आजही महिलांची जबाबदारी मानली जाते. ग्रामीण भागात महिला आणि मुलींची पायपीट या चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी होते. यासाठी अनेकदा जंगलात जावे लागते. यात सापासारख्या जीवांपासून जंगल क्षेत्रात अस्वल, बिबट आणि प्रसंगी वाघाचा हल्ला या बाबींना महिलांना सामोरे जावे लागते अशा सर्व धोक्यापासून संरक्षण देण्याचे काम एकाप्रकारे उज्ज्वला गॅस योजनेने केले आहे.
ग्रामीण भागात महिला चुलीसाठी साधारणपणे लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्या, कोळसा आणि शेतांमधील काडीकचरा यांचा वापर करतात. यातून निघणारा धूर हा अतिशय घातक असा असतो. आरोग्यासाठी तुलना करायची तर एक महिला स्वयंपाकासाठी जे धुराचे प्रदूषण तयार करते ते दिवसाला चारशे सिगारेटींइतके घातक आहे. यावरुन महिलांना याचा असणारा आरोग्याचा धोका आपणास लक्षात येईल.
ग्रामीण भागात सातत्याने चुलीचा वापर करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणावर श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागते. यातून सुटका करण्याचे काम या उज्ज्वला गॅस योजनेतून झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे या महत्वाकांक्षी अशा उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर महिलांच्या आरोग्यासोबत गावांनाही प्रदुषणमूक्त करण्याचे आगळे पर्व सुरु झाले.
या योजनेत गॅस कनेक्शन साठीचा वाटा शासन स्वत: देत असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ दिला जात आहे. ही रक्कम प्रतिकुटुंब 1600 रुपये इतकी आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्रीय गॅस आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे.
आज दिनांक 15 जुलै 2017 पर्यंत 2 कोटी 50 लाख जोडण्या देण्यात आल्या. देशात या उज्ज्वला गॅस योजनेचे उद्दिष्ट 8 कोटी 50 लाखांहून अधिक आहे. उर्वरित उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यात एकूण 93 लाख 22 हजार 931 कनेक्शन दिले जाणार आहे. पहिल्या वर्षात यापैकी 9 लाख 84 हजार 341 कनेक्शन देण्यात आले. पहिल्या वर्षात देण्यात आलेले उद्दिष्ट राज्याने 84.9 टक्के इतके पूर्ण केले आहे.
या उज्ज्वला योजनेत लोकसहभाग मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबसिडी सोडण्याचे आवाहन सर्वांना केलेले आहे. त्याला देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. चालू वर्षात नव्याने 4 कोटी कनेक्शनचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि त्यादृष्टीने कामकाज उत्तमरित्या होतांना दिसत आहे.
प्रदूषण मुक्ती आणि आरोग्य वृद्धी देणारे हे उज्वला गॅस अभियान निश्चितपणे यशस्वितेकडे वाटचाल करीत आहे.
लेखक: प्रशांत दैठणकर, संपर्क- 9823199466
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020