ग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला ह्या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. उर्वरीत महिलांना सॅनिटरी नॅपकीनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करणे गरजेचे आहेत. तसेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठीच ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. येत्या महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून अस्मिता योजना सुरु होत आहे.
पहिल्या टप्प्यात ७ लाख मुलींना मिळणार अस्मिता कार्ड
अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट ५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करुन त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकीन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण ७ लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना ५ रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रुपयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देणार आहे. किशोरवयीन मुलींना वर्षभरात १३ पाकीटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आला असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून महिला बचतगट हे सॅनिटर नॅपकीनची मागणी ऑनलाईन नोंदवतील. नोंदवलेल्या मागणीनुसार वितरक त्यांना पुरवठा करतील. या योजनेचा लोगो आणि डिजिटल अस्मिता कार्ड यांचेही अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आले. ॲप, अस्मिता कार्ड, वेबपोर्टल हे येस बँक, महाऑनलाईन व केपीएमजी यांच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे.
महिलांनाही मिळणार माफक दरात सॅनिटरी पॅड
अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिलांना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २४ रुपयांना तर २८० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. बचतगट हे वितरकांकडून सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट खरेदी करुन परस्पर विक्री करणार आहेत.
मुख्यमंत्री ठरले पहिले अस्मिता प्रायोजक
अस्मिता फंडाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी लोक अस्मिता स्पॉन्सर (अस्मिता प्रायोजक) होऊ शकतील. या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी लोकसहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना ५० मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग करुन या ५० मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारली. अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारणारे मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे पहिले ठरले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी १५१ मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग करुन या १५१ मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारली.
अस्मिता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करु – मंत्री पंकजा मुंडे
यासंदर्भात बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोबाईल ॲप, डिजिटल अस्मिता कार्ड यांच्या माध्यमातून अस्मिता योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार असून योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. अस्मिता फंडासाठी https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या वेबपोर्टलवर sponsor online या मेनूवर जाऊन लोक मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी अस्मिता स्पॉन्सर होऊ शकतील. लोकांनी अस्मिता फंडाला सहयोग करुन अस्मिता स्पॉन्सर व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
- इर्शाद बागवान
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020