भूमिका
शलभ म्हणजे टोळ. या आसनात शरीराची स्थिती काहिशी टोळाप्रमाणे दिसते म्हणून याला शलभासन म्हणतात. पोटावर झोपून दोन्ही पाय सरळ स्थितीत वर उचलून स्थिर ठेवणं म्हणजे शलभासन.
पूर्वस्थिती
विपरित शयन स्थिती. (पोटावर झोपणं)
आसनस्थिती घेणे
या स्थितीमध्ये श्वास घेत पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवून कमरेपासून सावकाश वर उचला. चवडे मागच्या दिशेने ताणा.
आसनस्थिती सोडणे
श्वास सोडत संथपणे पाय एकमेकांना चिकटलेले ठेवूनच सावकाश खाली आणा आणि जमिनीवर टेकवा.पाय जास्त उचलल्यामुळे पायांमध्ये कंप होतो. अशा वेळी पाय किंचित खाली आणल्यास कंप कमी होतो. पायामध्ये कंप न होता पाय जास्तीत जास्त वर उचलले गेले पाहिजेत. पाय स्थिर ठेवणं आवश्यक आहे. आसनस्थिती घेतल्यावर पायाचे आणि पोटाचे स्नायू वगळता अन्य स्नायू शिथिल सोडण्याचा प्रयत्न करावा. पाय वर उचलताना हनुवटी जमिनीवर चिकटवून ठेवावी. तसंच हातांनी जमिनीवर रेटा देऊ नये. दोन्ही पायांचे अंगठे, टाचा-गुडघे एकमेकांना चिकटवून आणि पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवणं आवश्यक आहे. पाय गुडघ्यात वाकवल्यास कमरेच्या तसंच मांड्यांच्या स्नायूंवरचा ताण कमी होतो. अशाने आसनाचे अपेक्षित लाभ मिळत नाही.कालावधी - कमीतकमी १५ सेकंद आसन टिकवावं. १ ते ३ आवर्तनं करावीत.
परिणाम
या आसनाचा ताण पाठीच्या कण्यातले शेवटचे काही मणके, ओटीपोटाचे स्नायू आणि मांड्यांचे स्नायू यावर येतो. त्यामुळे त्या भागातलं रक्ताभिसरण वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. या ताणांचे परिणाम लहान आणि मोठं आतडे, गर्भाशय, अंडाशय, मूत्राशय यांच्यावर होऊन त्यांचं कार्य सुधारतं.
विशेष दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार, हनिर्या, आतड्यांचा क्षयरोग, आतड्यांना सूज येणं, अपेंडिसायटिस, गर्भाशय आणि ओटीपोटात सूज येणं, जलोदर तसंच गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. ज्यांच्या पाठीचा कणा ताठर आहे त्यांनी फार सावकाश कोणत्याही प्रकारचे हिसके न देता झेपेल तेवढाच ताण घ्यावा.(तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आसनांचा अभ्यास करावा.) - डॉ. राजन जोशी योगशिक्षक, योग विद्याधाम, डोंबिवली
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स