आयुर्वेदामध्ये संसर्गजन्य रोग हे ‘जनपदोध्वंस’ या नावाने चरकसंहितेत सांगितले आहेत. भूमी, काल, वायू आणि पाणी हे दुषीत झाल्यामुळे, हे रोग होतात. याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक गावांमध्ये एकाचवेळी हा आजार पसरतो. जनपद म्हणजे गाव याचा उद्ध्वंस होतो, म्हणजे गावातील जास्तीत जास्त लोक एकदम आजाराला बळी पडतात, म्हणून या संसर्गजन्य आजाराला ‘जनपदोध्वंस’ असे म्हटले आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना या आजाराची लागण जास्त प्रमाणात होते.
जे साथीचे आजार आहेत त्याचे एकापासून दुसऱ्याला संक्रमण होते असे आयुर्वेद ही मानतो. “औपसर्गिक रोगाश्च संक्रामन्ति नरान्नरम” अर्थात संसर्गजन्यरोग एकापासून दुसऱ्याला होतात. असा आयुर्वेदातील सुश्रुतसंहितेत स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे केवळ त्यावरील औषधोपचार करुन चालणार नाही तर त्याचा प्रसार थांबवण्यासाठीचे उपाय देखील तेवढेचे, किंबहुना अधिक महत्त्वाचे ठरतात.
प्राचीनकाळी कोणत्याही भौतिक, रासायनिक, जीवशास्त्रीय अद्ययावत सुविधा उपलब्ध नसताना सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन आयुर्वेदाने सांगितलेले रोगप्रसाराचे मार्ग हे नक्कीच आज ही जसेच्या तसे लागू पडतात.
“प्रसंगात गात्र संस्पर्शात नि:श्वासात सह भोजनात एकशय्यासनस्यापि वस्त्रमाल्यानुलेपनात”
दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे, वारंवार एकमेकांच्या शरीराचा एकमेकांना स्पर्श होणे, एकमेकांच्या श्वासाचा परस्परांशी वारंवार संपर्क येणे, एकत्रितरित्या वारंवार जेवण केले जाणे, वारंवार एकत्र झोपले जाणे, एकमेकांचे कपडे, सौदंर्यप्रसाधने याचे आदानप्रदान केले जाणे, त्यामुळे सांसर्गिक आजार होतात. यामध्ये ज्वर, त्वचारोग, ताप, राजयक्ष्मा, डोळे येणे, गोवर, कांजण्या आदी आजारांचा समावेश होतो.
प्रसंगात – गात्रसंस्पर्शात - मुंबईत बसमध्ये किंवा लोकलमध्ये प्रवास करताना एकमेकांच्या शरीराच्या अवयवाचा स्पर्श परस्परामध्ये होतो. तसेच वेगवेगळ्या समारंभ- कार्यक्रमाच्या वेळी आपण एकमेकांना भेटतो त्यावेळी पाश्चात्य पद्धतीप्रमाणे हस्तांदोलन करतो. यामुळे आपल्या हाताचा स्पर्श दुसऱ्या हाताला होतो. एका हातावरील जंतुसंसर्ग लगेच दुसऱ्या हाताला होतो. मग त्या हाताचा स्पर्श रुमालाला, घरात गेल्यावर मुलाबाळाला होतो.
भारतीय परंपरेप्रमाणे आपली लांबूनच हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत अतिशय योग्य आहे. त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. केवळ स्वाईनफ्लूच्या काळात नव्हे तर, नेहमीसाठी “रामराम” करायची सवय केली तर साथरोग टाळण्याचा हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकतो.
नि:श्वासात – काही देशात एकदम जवळ येऊन, डोक्याला डोके भिडवून स्वागत करण्याची पद्धती आहे. त्यामुळे एकमेकांचे श्वासदेखील अगदी जवळ येतात आणि जंतुसंसर्ग लगेच होतो. तसेच मुंबईत लोकल मध्ये प्रवास करतानाही हीच परिस्थिती आढळून येते.
दुषीत व्यक्तीच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या नि:श्वासातून जी हवा बाहेर येते त्यापासून दम लागणे, सर्दी, खोकला इ. लक्षणे होऊ शकतात. नाकातोंडावाटे जंतुचे संक्रमण झाल्यास श्वसनमार्गाचे आजार होतात. यालाच ‘ड्रापलेट इन्फेक्शन’ असे म्हणतात. याचा उल्लेख सुश्रुतटीकाकार डल्हणाचार्यानी हजारो वर्षापूर्वी केलेला आहे.
“तत्र नासारंध्रानुगतेन वायुना श्वासकास प्रतिश्याय त्वगिंद्रियगतेन मसूरिकादय”
यामुळे खोकलताना रुमाला ठेवावा. येणारी शिंक थांबवू नये यावेळी ही रुमालाचा वापर करावा. रुमालाच्या टोकाला कापूराची वडी बांधून ठेवून त्याचा वास अधून मधून घ्यावा रुमाल स्वच्छ धुवून त्यावर इस्त्री फिरवून घ्यावी त्यामुळे जंतुसंसर्ग दूर व्हायला मदत होते.
घरात कपड्यामध्ये कापूराच्या वड्या ठेवाव्या. कपडे धुतल्यावर ते 10 मिनिटे कापूराच्या पाण्यात भिजत ठेवावे. मोबाईल किंवा दूरध्वनीवरुन बोलून झाले की त्याचा तोंडावरील भाग नीट पूसून घ्यावा. नाकाला रुमाल बांधावा.
याचा अर्थ एकाच ताटात केलेले भोजन. आई मुलाला भरवताना आईला जंतुसंसर्ग झाला असेल तर कदाचित आईची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तिला आजार होणार नाही तर याउलट बाळाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे उष्टे, एकत्र भोजन टाळावे. एकाच ग्लासातील पाणी दोघांतिघांनी पिऊ नये. एकच ग्लास सरबत, दारुसाठी वापरु नये. एकाची सिगारेट, बीडी एकमेकांनी ओढू नये.
म्हणजे एकमेकाचे कपडे उदा. रुमाल, टाय, शर्ट, टॉवेल, साडी, ओढणी इ. वापरु नयेत. तसेच पेन्सील, पेन, खोडरबर, पाण्याची बादली वापरताना काळजी घ्यावी. महिलांच्या बाबतीत विशेषत: बिंदी, टिकली, मेंदीचे कोन, लिपस्टीक, गळ्यातील माळा, बांगड्या इ. सौदंर्य प्रसाधने स्वत:ची स्वत:च वापरावीत.
‘एकशय्यासनात’ रुग्णांच्या बिछान्यावर बसू नये, झोपू नये शासकीय दवाखान्यात रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णाजवळ न जाण्याबाबत सांगितले जाते. पण नातेवाईक ऐकत नाहीत. याबाबत डॉक्टर- सिस्टरला वारंवार सांगणे कठीण होते. सतत रुग्णाचे नातेवाईक बदलतात. त्यापेक्षा एकच नातेवाईक ठेवावा जेणे करुन त्याचे पथ्य आहाराबाबत त्याला नीट सांगता येईल.
अशाप्रकारे हे संसर्गजन्य आजार कसे पसरतात हे आपण पाहिले. आता या आजाराच्या प्रतिबंधक उपायाचा आपण विचार करु या.
संसर्गजन्य आजार हे हवा, पाणी, जमीन व काल यात बिघाड झाल्यामुळे होतात. त्यामुळे हे चारही घटक सुस्थितीत राहतील या दृष्टीने करावयाची उपाययोजना म्हणजे प्रतिबंध होय. हवेच्या शुद्धीसाठी धूपन चिकित्सा, पाण्याच्या शुद्धीकरणासोबत ते औषधी द्रव्यांनी सिद्ध करुन घेणे, जमिनीच्या शुद्धीसाठी परिसर स्वच्छ ठेवणे व कालानुरुप आहार विहार करणे हे संसर्गजन्य आजार टाळण्याची गुरुकिल्ली आहे.
प्रामुख्याने ऋतुनुसार आहार, विहार घ्यावा. सध्या वर्षाऋतु चालू आहे. या ऋतुत जल महाभूताचे अधिक्य असते. तेव्हा उष्ण व द्रवशोषक असा रुक्ष आहार विहार घ्यावा. एकंदर आयुर्वेदाच्या दृष्टीने पचायला हलका, बलवर्धक असा आहार असावा. यामध्ये रोजच्या जेवणात गाईचे तूप व जेवणानंतर ताक घ्यावे. मूगाचे वरण घ्यावे. 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा सूंठ पिठात टाकून त्याची केलेली भाकरी किंवा पोळी जेवणात घ्यावी. आले, पुदीना याची चटणी, ताकाची कढी असा आहार घ्यावा.
पेय द्रव्यांत पेयांचा वापर अत्यल्प गरजेपुरता करावा. अनावश्यक वापर करु नये. पेय पदार्थात पावसाळ्यात दूध, ताक, दही, लस्सी, फळांचा रस कमीत कमी घ्यावा. लिंबू सरबत, फ्रीजमधील पाणी, लोणी, बटर, चीझ, पनीर इ. पदार्थाचा वापर कमी करावा किंवा करुच नये. तांदूळ भाजूनच घ्यावा, भात शिजवताना किमान दोन तीन वेळा पाणी काढून टाकावे, म्हणजे त्यातील अभिष्यंद निघून जातो. यानंतरच तो पचायला हितकर ठरतो. कुकर मध्ये शिजवलेला भात टाळावा. इतर धान्य सुद्धा भाजून घ्यावीत.
स्नेहाचा वापर अतिमात्रेत करु नये. विशेषत: रात्री तर अजिबात करु नये. विशेषत: दूध, सायीचे दही, ताक, शेंगदाणे, भात हे वर्ज्य करावे. रात्री जेवणात वा जेवणानंतर द्रव पदार्थाचा वापर कमीत कमी करावा. अगदीच घ्यायचे असतील तर ते गरम करुन घ्यावेत.
थोडक्यात अजीर्ण, अपचन, आम्लपित्त इ. आजार होणार नाहीत असा हलका आहार घ्यावा. कारण पचनसंस्थेचे आजार झाल्यास श्वसनसंस्थेचे आजार अधिक बळावतात असा आयुर्वेदाचा सिद्धान्त आहे. कडकडून भूक लागल्यावरच भोजन घ्यावे. जेवणात तळीव, गोडपदार्थ इ. जड आहार टाळावा.
या काळात सिद्धजन प्यावे. सिद्धजल म्हणजे पाणी अर्धे आटेपर्यंन्त उकळवून ते पिणे. ते उकळायला ठेवण्यापूर्वी त्यात तुळशीची पाने, आर्द्रकाचा तुकडा, बेलाची पाने यापैकी जे हाताशी आहे ते टाकावे. सिद्धजला प्रमाणे सिद्ध दूध करुन प्यावे. यामध्ये सुंठ, जेष्ठमध, हळद, आर्द्रक टाकावे. शेळीचे दूध मिळाल्यास अधिक उत्तम!
हळद, मीठ, त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून गरम करुन त्या पाण्याच्या सहाय्याने गुळण्या कराव्यात, साधी पाण्याची वाफ घ्यावी. छातीला, चेहऱ्याला तेल लावून चोळून शेकावे. आयुर्वेदात यालाच स्नेहान स्वेदन म्हणतात. सर्दी, पडसे इ. आजारात याचा उपयोग होते.
तुळस ही भूक वाढवणारी, पचन करणारी, पोट साफ करणारी आणि कृमीघ्न गुणांची आहे. तुळशीचा 2 चमचे रस आणि मध सर्दी-पडसे खोकल्यावर उत्तम औषध आहे. तुळशीची आठ-दहा पाने मधात बुडवून खावी. आद्रकाचा रस आणि मध एकत्र करुन चाटण घ्यावे.
सुंठीचे पावडर आणि साखर एकत्र करुन खावी. दुध, लसनाच्या 5/6 पाकळ्या, पिंपळी व वावंडीग टाकून उकळून घ्यावे. आवळा पावडर 2/2 चमचे 2 वेळा घ्यावी.
गुळवेल ही ग्रामीण भागात उपलब्ध असणारी वेल असून ही दीपक, पाचक, रक्तवर्धक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. डायबेटीस असलेल्या लोकांना तर ही अधिक फायदेशीर आहे. गुळवेलीचे कांड आणून त्याच बारीक तुकडे करुन त्याचा काढा घ्यावा. याने रोगप्रतिकारशक्ती वाढते याला आयुर्वेदात रसायन असे म्हटले आहे.
वातावरण शुद्धी साठी धूपन चिकित्सा महत्त्वाची आहे. अग्निवर हळद, हिंग, कडूनिंबाची पाने, लसूण आणि कांद्याचा पाचोळा, लवंग, वेलची, राळ, गुग्गुळ, तुप लावलेले तांदूळ इ. टाकून या द्रव्याचा धूर सर्वत्र पसरेल याची काळजी घ्यावी. शक्य असेल त्यांनी तव्यावर प्रियंगु, शतपुष्पा ही द्रव्ये टाकून त्याचा धूर घ्यावा, घरात राळेचे धूपन करावे. कडूनिंब सर्वत्र उपलब्ध आहे. मुळात निंब याचा अर्थच आरोग्य सवंर्धन करणारा वृक्ष असा होतो. ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करताना त्यातील एखाद्या गोवरीवर हे पदार्थ टाकून केलेली धूरी ही उत्तम लाभदायक ठरते. साई बाबांची धूरी देखील वातावरण शुद्धीसाठी सांगितली आहे.
सूर्योदयापूर्वी उठून भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम हे प्राणायाम करावे. तरुणांनी सूर्यनमस्कार तर वयस्कांनी आसने, पायी चालणे असा व्यायाम अर्धशक्तीपेक्षा कमी मात्रेत करावा. हा व्यायाम सकाळी करणे महत्त्वाचे. त्यामागचे कारण रात्रीच्या झोपेत संवहनाचा वेग कमी झाल्याने क्लेद जमा होतो. तो व्यायामाने व प्राणायामाने कमी होऊन संवहनामध्ये येतो. त्यानंतर आवश्यक वाटल्यास चहा घ्यावा. तो कमीत कमी दूधाचा घ्यावा. नुसत्या दूधाचा चहा वा दूध पिऊ नये.
एकंदर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदोक्त दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, व्यायाम व रसायन (च्यवनप्राश) इत्यादीचा अवलंब करुन आपण आज संसर्गजन्य रोगनिवारण दिनाच्या निमित्ताने काही प्रमाणात संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्याचा संकल्प करु या.
लेखक - व्यंकट पु. धर्माधिकारी,
सहायक संचालक आयुर्वेद, मुंबई
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/22/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...